"आज मस्तशा हॉटेलमध्ये जाऊया. तुझं आवडतं मंचुरियन खायला! माझी खूप दिवसांची इच्छा आहे," वीणा त्याला मस्का लावत होती.
"होय का...! मग चलच, आज एकदा तरी जाऊया..." असं म्हणत पाच किलोमीटर दूर असलेल्या ग्रीनलंड हॉटेलच्या दाराशी त्यानं रिक्षा थांबवली. वीणा वॉशरूमला जाऊन येईपर्यंत त्याने वेटरला बोलावून घेत ऑर्डरही दिली...
"आपण दुपारच्या शोला जाऊया का, तीनच्या? छान पिक्चर लागलाय..." वॉशरूममधून परतलेल्या वीणाने त्याला आल्या आल्या प्रश्न केला. वीणा आता मनाने बरीचशी मोकळी झाल्यागत वागत होती.
"अगं, जाऊया ना आपण... बऱ्याच काळाचं राहिलेलं फिरणं... निदान एकदा तरी फिरून घेऊ पोट भरेपर्यंत, मनसोक्त!" आकांक्षाच्या डोक्यावरून मायेचा हात फिरवीत अमोल म्हणाला...
मंचुरियन खाऊन झाल्यावर हॉटेलबाहेर येत अमोल वीणासोबत इकडे तिकडे बाजारात फिरून तिच्या शोला येऊन बसला.
"माझ्या हातात आता कोणताच पर्याय राहिलेला नाही यातून बाहेर येण्याचा, सेटल होण्याचा...! म्हणून ठरवलं की आपण आपलं एकदा तरी वीणाचं मन जपावं. तिचं मन का मारायचं...? निदान एकदा तरी..." थिएटरच्या काळोखात तो आपल्याच विचारात गढला होता.
"कसला विचार करताय एवढा...?" इंटरव्हलला लाईट्स ऑन झाल्यावर अमोलकडे पाहत तिने विचारलं.
"कसला नाही गं... सहज आपलं..." तिला टाळत अमोल उद्गारला...
शो संपल्यावर बराच वेळ पाय थकेस्तोवर मॉलमध्ये फिरून विंडो शॉपिंग केले. संध्याकाळनंतर हॉटेलमध्ये दोघांच्या आवडीचा मेनू घेत ते घराकडे जायला वळले. आकांक्षा मध्ये मध्ये झोपत होती, जागी होत होती...
"बा... बा! म... मा..." असे शब्द ती अलीकडे उच्चारू लागली होती.
सोसायटीच्या गेटकडे पोहोचताच मोबाईलचा टॉर्च चालू करून जिन्याच्या पायऱ्या चढून वर येत अमोलने कुलूप काढलं...
"आज कित्येक दिवसांनी असं, मनाप्रमाणे दोघांना एकमेकांसाठी वेळ देता आला. आणि काय हवं...!" असं म्हणत आकांक्षाला त्याच्या बाजूला झोपवत ती किचनकडे जायला वळली.
अंगावर गाऊन चढवत ती केस नीट करून बेडरूममध्ये आली. त्यांच्यात होणाऱ्या वादामुळे तिचं आवरणं, कपडे चेंज करणं, सर्व काही किचनमध्येच व्हायला लागलं होतं...
"आज बऱ्याच दिवसांनी मला शांत झोप लागेल," असं म्हणत तिनं बेडवर पडताक्षणी डोळे मिटले. थकल्यामुळे तिला डोळा लागला होता...
आता आपण वीणासकट आपल्या सर्वांचं जीवन कसं संपवायचं, या विचारात अमोल ताटकळत जागा राहिला...
मनाला होणाऱ्या वेदनांना थोपवत तो टेबलाकडे वळला...
"पावलोपावली चालणारी निराशा, घरगुती वाद, आर्थिक परिस्थिती, कर्जाचा बोजा... या सगळ्याला कंटाळून बायको आणि मुलीचा गळा दाबून खून करून आत्महत्या करीत आहे. या घटनेबद्दल कोणालाही जबाबदार धरू नये. ही घटना मी स्वतः केलेली आहे..." असा मजकूर टाकून त्याने सही केली...
लेटरपॅडवर लिहिलेली चिठ्ठी टेबलावर ठेवत त्यावर पेपरवेट ठेवला आणि तो वीणाकडे वळला. इतक्यात मोबाईलची रिंग वाजली. वीणा जागी होऊ नये म्हणून तो तात्काळ मागे वळून फोनजवळ आला...
"राकेशचा फोन रात्री कसा काय...?" असं म्हणत त्याने फोन घेतला...
"काँग्रॅच्युलेशन्स, अमोल...! तुला प्रमोशन मिळालं... वेल डन! काय रे, पण तुझा फोन का लागत नव्हता दिवसभरात...? कुठे गेलेलास...? ऑफिसलाही आला नाहीस...! काही विशेष...?" राकेश उत्साहाच्या भरात कौतुकाने विचारत होता...
"खरंच...! खरंच मला प्रमोशन मिळालं...?" अमोल आपल्याच नादात, विश्वास न बसून पुन्हा पुन्हा विचारत चालला होता...
"होय... अगदी खरं! उद्या आल्यावर ऑर्डर मिळेलच तुला... आज वाट पाहत होते सारे ऑफिसात! पण तू आला नाहीस. असो... आता बरे दिवस येतील तुझ्या जीवनात. काळजी नको करू... चल..." असं म्हणत राकेशने फोन ठेवला...
अमोलला आनंदाच्या भरात दोन क्षण काहीच कळेना. त्याने एकदा वीणाकडे पाहिलं. ती शांत झोपली होती...
'आपण काय करणार होतो हे...!' टेबलावरील चिठ्ठीकडे लक्ष जाताच त्याच्या मनात आलं. त्याने ती चिठ्ठी फाडून डस्टबिनमध्ये टाकली नि स्वस्थपणे बेडवर वीणाशेजारी आडवा झाला. डिमलाइटच्या प्रकाशाकडे एकटक पाहत तो विचारात गढला होता...
'आता आपल्याला चांगले दिवस नक्की येतील... आणि आज एकदा तरी छान घालवलेला असा हा सुंदर दिवस पुन्हा पुन्हा अनुभवता येईल... नव्या आनंदाने, समाधानाने...!' या विचारातच त्याला डोळा लागला...



