स्त्री: समाजातील एक दुर्लक्षित पान

महिला सक्षमीकरण हा आजच्या काळाचा कळीचा मुद्दा आहे. समाजाच्या प्रगतीसाठी महिलांना शिक्षण, समान हक्क आणि संधी मिळणे गरजेचे आहे. त्यांचे योगदान समाजाला सुदृढ करते, पण अजूनही अनेक अडथळे दूर करणे आवश्यक आहे.

Story: लेखण​ी |
06th June, 06:20 pm
स्त्री: समाजातील एक दुर्लक्षित पान

बदलत्या आजच्या काळात महिला सक्षमीकरण हा महत्त्वाचा विषय चर्चेत आहे. महिला सक्षमीकरण म्हणजे नेमके काय? महिलांचे जागृत होणे... पंडित जवाहरलाल नेहरू म्हणायचे, "जनतेला जागृत करण्यासाठी, महिलांनी जागृत होणे गरजेचे आहे." दरवर्षी ८ मार्च या दिवशी संपूर्ण जगभरात जागतिक महिला दिन मोठ्या आनंदाने साजरा केला जातो. महिलांबद्दल आदर, अभिमान आणि सन्मान व्यक्त करण्यासाठी, महिलांचे हक्क, शिक्षण याबाबत जागरूकता निर्माण करण्यासाठी जागतिक महिला दिन साजरा केला जातो. जागतिक महिला दिनानिमित्त देशभरात वेगवेगळ्या कार्यक्रमांचे आयोजन केले जाते.

कधी न थकणारी आई, कधी जिवापाड जपणारी बहीण, कधी आज्ञाधारक कन्या, कधी साथ न सोडणारी पत्नी तर कधी अपार लाड करणारी आजी ही स्त्रीच असते. सकाळी पाच वाजता उठून धुणी-भांडी, स्वयंपाक करते. आपल्या मुलांना शाळेत पाठवण्याची घाई त्या स्त्रीला सतत असते. ती खूप मेहनतीने आणि लक्षपूर्वक नोकरी सुद्धा करते. आनंददायी आयुष्य जगण्याचा लढा खूप कठीण होता आणि आजही आहे. महिलांना शिक्षणातून आत्मविश्वास प्राप्त झाला. त्या बलवान व धाडसी झाल्या. पण त्यांचे सक्षमीकरण स्वीकारण्यासाठी लोक आणि त्यांची मानसिकता अजूनही समाजात तयार झाली नाही. देश खूप वेगाने आणि उत्साहाने प्रगती करत आहे, परंतु आपण ती तेव्हाच टिकवून ठेवू शकतो जेव्हा आपण लैंगिक असमानता दूर करू.

आजची स्थिती पाहता 'स्त्री' कोणत्याही क्षेत्रात मागे राहिलेली दिसत नाही. एकेकाळी फक्त घरात राबणारी स्त्री आज विमानसुद्धा चालवायला मागे राहत नाही. आज समाजात महिला सक्षम झाल्या आहेत पण त्यांना अजून अधिक सक्षम बनवण्याची गरज आहे. महिला सक्षमीकरणाच्या मदतीने कुटुंबातील प्रत्येक व्यक्तीचा विकास होत असतो. समाजाचा विकास होण्यासाठी स्त्रियांकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलला पाहिजे. कोणत्याही कुटुंबाचे कल्याण फक्त घरातील स्त्रीमुळे होत असते. महिलांनी फक्त घर सांभाळण्याकडे लक्ष न देता देशाच्या प्रगतीकडे लक्ष केंद्रित करणे आवश्यक आहे. त्यांना पुरुषांच्या बरोबरीने समान वागणूक मिळायला हवी. समाजातील हुंडाप्रथा, अत्याचार, लैंगिक भेदभाव, असमानता, महिलांवरील घरगुती हिंसा, बलात्कार असे अनेक जाच तिला सहन करावे लागतात. या सर्व गोष्टींमुळे महिलांच्या जीवनात सांस्कृतिक, सामाजिक, आर्थिक आणि शैक्षणिक क्षेत्रात प्रभाव पडत आहे.

भारतीय समाज हा असाच एक समाज आहे, ज्यात अनेक प्रकारच्या रूढी, श्रद्धा आणि परंपरांचा समावेश आहे. यापैकी काही जुन्या समजुती आणि परंपरा अशाही आहेत ज्या भारतातील महिला सक्षमीकरणात अडथळा ठरतात. महिला आणि पुरुषांमधील असमानता अनेक समस्या निर्माण करू शकते, ज्या राष्ट्राच्या विकासात मोठा अडथळा बनू शकतात. महिला सक्षमीकरणाचा उद्देश महिलांना प्रोत्साहन देणे हा आहे जेणेकरून त्या वेगवेगळ्या क्षेत्रात प्रगती करतील. आजच्या समाजात अनेक भारतीय महिला राष्ट्रपती, पंतप्रधान, प्रशासकीय अधिकारी, डॉक्टर, वकील आणि इतर झाल्या आहेत, पण तरीही आजही अनेक महिलांना सहकार्य आणि मदतीची गरज आहे. त्यांना आजही शिक्षण, मुक्तपणे काम करण्यासाठी, सुरक्षित प्रवास, सुरक्षित काम आणि सामाजिक स्वातंत्र्यासाठी अधिक समर्थनाची गरज आहे.

आपल्या इतिहासात शूर महिलांनी पुढाकार घेऊन समाजासाठी लढा दिला. सावित्रीबाई फुले, वात्सल्य कीर्तने, कल्पना चावला यांसारख्या शूर महिला प्रेरणादायक ठरल्या. अनेक महिला आजही शिक्षणापासून वंचित आहेत. शिक्षणाअभावी महिलांना प्रगती करता येत नाही. महिलांनी प्रगती करण्यासाठी सुशिक्षित होण्याची गरज आहे. शिक्षणानेच महिलांमध्ये आत्मविश्वास निर्माण होऊ शकतो. जेव्हा महिला काम करू शकतात आणि पैसे कमवू शकतात, तेव्हा त्या त्यांच्या कुटुंबांना आधार देऊ शकतात आणि अर्थव्यवस्थेच्या वाढीस मदत करू शकतात. त्या नवीन कल्पना आणि ऊर्जा आणतात, जे व्यवसाय आणि समुदायांसाठी चांगले आहे. तसेच, जेव्हा महिलांना सक्षम केले जाते, तेव्हा त्या त्यांच्या मुलांना चांगले शिक्षण आणि आरोग्यसेवा मिळण्याची खात्री करण्याची शक्यता जास्त असते, ज्यामुळे प्रत्येकाचे भविष्य चांगले होते.

सरकार शिक्षणाचे महत्त्व पटवून देण्यासाठी कार्य करत आहे त्यामुळे मुलींचे शिक्षण आणि महिला सक्षमीकरण याविषयी लोकांमध्ये जागरूकता वाढत आहे. देशाच्या विकासात महिलांचे महत्त्व आणि अधिकार याबाबत समाजात जागरूकता आणण्यासाठी आंतरराष्ट्रीय महिला दिन यांसारख्या अनेक कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. महिला या देशाचे भविष्य ठरवणारी शक्ती आहे आणि त्यामुळे ही शक्ती सुदृढ आणि सक्षम बनवणे ही समाजाची जबाबदारी आहे.

महिला सक्षमीकरण हे फक्त स्त्रियांसाठीच नाही तर समाजासाठी सुद्धा समान गरजेचे आहे. शैक्षणिक, आर्थिक आणि राजकीय इत्यादी क्षेत्रात महिलांना समान अधिकार प्राप्त व्हायला हवेत. त्यांना त्यांच्या आवडीनुसार प्रत्येक क्षण जगता यायला हवा आणि त्यासाठी आपण त्यांना प्रत्येक क्षेत्रात सकारात्मकता दाखवली पाहिजे. आजच्या काळाची गरज म्हणून स्त्रियांचे सक्षमीकरण हा विषय प्रत्येकापर्यंत पोहोचवायला हवा. स्त्रीवादाचा, स्त्री स्वातंत्र्याचा आणि समान अधिकाराच्या कितीही चर्चा केल्या तरी महिलांवर होणारे अत्याचार आपण नाकारू शकत नाही. महिला आत्मनिर्भर असून सुद्धा तिच्या सक्षमीकरणाची नितांत गरज आहे. स्त्रियांच्या आयुष्यात त्यांनी घडवून आणलेल्या या सकारात्मक मानसिक परिवर्तनाला समर्थन देण्याची नितांत गरज आहे.


मनीषा गोविंद बिरामणेकर