देशी, विदेशी पर्यटकांच्या वावटळीत पालये गावचा चेहरा शिल्लक राहील का? ग्राम्य संस्कृती तग धरेल का? असे असंख्य प्रश्न निर्माण झाले आहेत. तेरेखोल नदीत असलेले छोटेखानी बेट पूर्वी भात शेतीसाठी नावारूपाला आले होते.
गोव्यात पालये नावाची गावे पेडणे, बार्देश तालुक्यात आहेत. तुयेत पालये, बार्देशातील उसकई येथे पालये नावाची गावे आहेत. पालये हे ग्रामनाम लोकवस्तीने युक्त वाड्याशी संबंधित आहे. अथांग, निळ्याशार अरबी सागराच्या किनारी आणि केरी, हरमल आणि कोरगाव या पेडणेतील तीन गावांच्या कुशीत असलेला पालये हा गाव निसर्गसुंदर आहे. सदासर्वकाळ निसर्ग या छोट्या गावावर प्रसन्न असल्याने शेकडो वर्षांपूर्वी हा गाव मानवी समाजाने आपल्या वास्तव्यासाठी निवडला. इथल्या सुपीक जमिनीच्या आणि जलस्त्रोतांच्या आधारे त्यांनी आपले जीवन समृद्ध केले.
पेडणेतील सत्तावीस महसुली गावांपैकी ९९९.६४ हेक्टर क्षेत्रफळ असलेल्या या गावाला एका बाजूने तेरेखोल नदीच्या खाडीने तर दुसऱ्या बाजूने अरबी सागराने वेढलेले आहे. समुद्राचे खारे पाणी तेरेखोल नदीत घुसत असल्याने पालये परिसरात खारफुटीचे वैभव अनुभवता येते आणि त्यामुळे येथे नाना तऱ्हेचे मासे, कोळंबी, खेकडे, खुबे यांची एकेकाळी पैदास व्हायची. शेती, मासेमारी, भाजीमळे ही इथल्या कष्टकरी समाजाला उपजीविकेची साधने परंपरेने प्राप्त झाली होती. आजच्यासारखी वाहतूक आणि दळणवळणाची साधने नव्हती तेव्हा पालये गाव स्वयंपूर्ण होता. इथली शेतजमीन नदीची खाडी जगण्यासाठी आवश्यक बाबी पुरवत होती.
इथल्या मातीने शेतमळ्यांना सुपीकता प्रदान केली होती आणि त्यासाठी इथल्या कुळवाड्यांनी शेकडो वर्षांपूर्वी भूमातेची पूजा मृण्मयी वारुळाच्या रुपात तर दर्याच्या सम्राटाला आग्यो आणि गेरखो बेताळाच्या रुपात पूजलेले आहे. या गावची आदिमाया भूमका एकेकाळी जंगलसदृश परिसरात होती. दरवर्षी तिचे वारूळ वाढत होते. कृमिकिटकांना जगवणारे हे वारूळ पालयेचे भूषण होते. आज सिमेंट काँक्रिटमध्ये त्याला बंदिस्त केल्याने त्याची वाढ खुंटलेली आहे. सुरंगी, बकुळी, पिंपळ, पायरी आंबा, फणस आणि महाकाय घोटींग व त्यावर लोंबकळणाऱ्या वेली यांनी संपन्न असलेले जल्मी देवाचे आदिस्थान पालये गावातल्या देवराईच्या इतिहास आणि संस्कृतीची स्मृती जागृत करत आहे. मिर्झलवाड्यावरची झर, मळ्यातली तळी, राष्ट्रोळीच्या नावाने उभे असलेले विस्तीर्ण वड आणि धालो, शिमग्याच्या पारंपरिक मांडावर म्हटली जाणारी गाणी या गावातल्या निसर्ग आणि पर्यावरणीय संस्कृतीचा वारसा सजीव करतात.
पालयेच्या ग्रामसंस्थेने भूमका, वेताळ, रवळनाथ, भगवती, महादेव, ब्राह्मण आणि वाटेराम पुरुष या लोकदैवतांचे आशीर्वचन धारण करून इथले लोकजीवन विकसित केले होते. म्हारिंगण, जल्मी, राष्ट्रोळी ही लोकदैवते या गावाची सांस्कृतिक संचिते आहेत. ढोल-ताशांच्या गजरात दसऱ्याला रंगणारा तरंगोत्सव असो अथवा लोकगीतांच्या पार्श्वभूमीवर होणारा मर्दानी बाण्याचा रोमटा मेळातील आविष्कार, इथल्या कष्टकरी समाजाची नाळ या मातीत घट्ट पुरलेली आहे याचा साक्षात्कार घडवतो.
गावातील सिरसाट टेंबावर महालक्ष्मीचे मंदिर आहे. पोर्तुगीज अमदानीत सिरसाटाच्या आदिमायेला पालयेने आसरा दिला. पालये गाव हा शूरवीरांचा. एकेकाळी या गावाने अस्मितेच्या रक्षणासाठी प्रसंगी आपला जीव ओवाळून टाकणारे वीरपुरुष जन्माला घातले. वाटेराम कुलपुरुषांच्या छोट्या देवळीत असलेले वीरगळ आणि बाहेर असलेली सती पाषाणे गावाच्या क्षात्रतेजाचा इतिहास सांगतात.
आज पालयेत बहुसंख्य हिंदूबरोबर ख्रिस्ती समाज गुण्यागोविंदाने नांदत आहे. भंडारवाडा येथे छोटे कपेल यांच्यासाठी प्रार्थना मंदिर ठरलेले आहे. गावात आज एकही मुस्लिम धर्मीय नाही. परंतु बावाखानवाडा हे नाव आणि मधलावाडा येथे असणारे पिराचे थडगे एकेकाळी इथे असलेल्या मुस्लिम वस्तीची आठवण करून देतात.
अंतरीचा ज्ञानदिवा मालवू नको रे... अशा अभंगाद्वारे भगवद्भक्तीचा प्रसार करणाऱ्या संत सोहिरोबानाथ आंबिये यांचा १७१४ साली पालयेत जन्म झाल्याचे मानले जाते. अभंग, पदे, श्लोक त्याचप्रमाणे सिद्धांत संहिता, अक्षयबोध, पूर्णाक्षरीसारखी ग्रंथनिर्मिती करणाऱ्या या संत पुरुषाच्या वास्तव्याने पुनीत झालेला हा गाव आजही तितकाच दिव्यत्वाची प्रचिती देणारा आहे.
पेडणेतून येताना भालखाजन, मांद्रेतून येताना हरमलमार्गे तर महाराष्ट्र आरोंदा - किरणपाणीतून येताना जलमार्गे पालयेत येणे शक्य होते. मराठी नाट्य परंपरा, ढोलकी भजनाचा वारसा मिरवणारा पालये पर्यटकांच्या वर्दळीमुळे आपले गतवैभव हरवत चालला आहे. ४५० हेक्टर जमीन एकेकाळी लागवडी योग्य होती. खाजन शेती केली जात होती. उडीद, कुळीथ इतिहासजमा झालेले आहेत. १९९४ मध्ये हरमल-पालयेच्या पठारावरील ३०० हेक्टर जागेत जपानग्राम गोल्फ कोर्स विकसित करण्याचे योजिले होते. परंतु तो बेत म्हणून पाडला. देशी, विदेशी पर्यटकांच्या वावटळीत पालये गावचा चेहरा शिल्लक राहील का? ग्राम्य संस्कृती तग धरेल का? असे असंख्य प्रश्न निर्माण झाले आहेत. तेरेखोल नदीत असलेले छोटेखानी बेट पूर्वी भात शेतीसाठी नावारूपाला आले होते. टेकडीवरचे टुमदार काशीविश्वेश्वराचे मंदिर समृद्ध संस्कृतीचे दर्शन घडवते. भोमवाड्यावरचा विस्तीर्ण वड आणि गावात ठिकठिकाणी असलेले पवित्र वृक्ष पर्यावरणीय लोकधर्माचे वैभव दर्शवते. आज बेशिस्त सागरी पर्यटनाचा फटका या गावाला बसलेला आहे.
प्रा. राजेंद्र केरकर
(लेखक ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते
असून पर्यावरणप्रेमी आहेत.) मो. ९४२१२४८५४५