पाण्यात फ्लोराईड मिसळण्याच्या धोरणावरून वाद

Story: विश्वरंग |
16th April, 12:08 am
पाण्यात फ्लोराईड मिसळण्याच्या धोरणावरून वाद

अमेरिकेत पिण्याच्या पाण्यात फ्लोराईड मिसळण्याच्या धोरणावर सध्या मोठा वाद सुरू आहे. या वादाच्या केंद्रस्थानी आरोग्याशी संबंधित नवीन संशोधन, न्यायालयीन निर्णय आणि राजकीय हस्तक्षेप आहेत. दातांच्या आरोग्यासाठी अमेरिकेसह जगातील अनेक देशांमध्ये पिण्याच्या पाण्यात फ्लोराईडचा वापर केला जातो. मात्र, आता अमेरिकेत सार्वजनिक पाणीपुरवठ्यातून फ्लोराईडचा वापर बंद करण्याचा मुद्दा मांडला जात असून अमेरिकेच्या आरोग्य सचिवांनीच केलेल्या वादग्रस्त मुद्द्यांमुळे हा विषय आता ऐरणीवर आला आहे.

पिण्याच्या पाण्यातील फ्लोराईड्सवर बंदी घालणारे 'युटाह' हे अमेरिकेतील पहिले राज्य ठरले आहे. यासंदर्भात मुलांच्या आणि प्रौढांच्या दातांवर होणाऱ्या गंभीर परिणामाबद्दल डेंटिस्टनी (दंतवैज्ञ) दिलेल्या इशाराकडे युटाह राज्याने दुर्लक्ष केले आहे.

अलीकडेच एका विश्लेषणात असे आढळून आले आहे की, गर्भवती महिला आणि लहान मुलांमध्ये फ्लोराईडच्या संपर्कामुळे हाडांची ताकद, थायरॉईड कार्य आणि मेंदूच्या विकासावर नकारात्मक परिणाम होऊ शकतो. या अभ्यासानुसार, फ्लोराईडचा गर्भ आणि नवजात शिशूंना फारसा फायदा होत नाही, आणि सार्वजनिक पाण्यात फ्लोराईड मिसळण्याचा धोका-फायदा गुणोत्तर प्रतिकूल ठरू शकतो.

अमेरिकन डेंटल असोसिएशन आणि अमेरिकन अकॅडमी ऑफ पेडियाट्रिक्स यांसारख्या संस्थांनी फ्लोराईडच्या सध्याच्या पातळीचे समर्थन केले आहे, असे नमूद केले आहे की, योग्य प्रमाणात फ्लोराईड दातांचे सडणे राखण्यास मदत करते.

स्वीडन आणि डेन्मार्कमध्ये फ्लोराईडचं पाण्यातील प्रमाण अमेरिकेतील पातळीइतकेच आहे. तिथे करण्यात आलेल्या इतर अभ्यासांमध्ये, फ्लोराईडचा कोणताही संबंध बुद्ध्यांक कमी होण्याशी दिसून आला नाही. अमेरिकन कॅन्सर सोसायटीसह इतर पुनरावलोकनांमध्ये एकमत आहे की पाण्यातील फ्लोराईड आणि कर्करोग यांचा एकमेकांशी संबंध असल्याचा कोणताही भक्कम पुरावा नाही. विशेषकरून, यूएस सेंटर्स फॉर डिसीज कंट्रोल अँड प्रीव्हेन्शनने म्हटले आहे की, त्यांच्या तज्ज्ञांना सार्वजनिक पाणी पुरवठ्यातील फ्लोराईडचा आरोग्यावर प्रतिकूल परिणाम होत असल्याचे दाखवणारे कोणतेही विश्वासार्ह वैज्ञानिक पुरावे सापडलेले नाहीत.

- गणेशप्रसाद गोगटे