हणजूण पोलिसांकडून असीम विजला पंजाबमध्ये अटक
म्हापसा : हणजूणमध्ये राहणाऱ्या उत्तराखंडमधील युवकाला विदेशात हॉस्पिलिटी कंपनीमध्ये नोकरी देण्याचे भासवून ४.७० लाखांचा गंडा घालण्यात आला. याप्रकरणी पोलिसांनी असीम विज (३७, रा. पंजाब) या संशयित आरोपीला चंदीगडमधून अटक केली. संशयित हा सराईत सायबर क्राईम गुन्हेगार आहे.
फसवणुकीची घटना ९ जुलै २०२४ रोजी घडली होती. प्रवेश सिंग यांनी या प्रकरणी हणजूण पोलिसांत तक्रार दिली होती. त्यानुसार पोलिसांनी अज्ञात संशयिताविरुद्ध भा.न्या.सं.च्या ३१८ (४०) व माहिती व तंत्रज्ञान प्रतिबंधक कायदा कलम ६६ - ड नुसार गुन्हा नोंद केला होता.
विदेशात हॉस्पिलिटी उद्योग क्षेत्रात नोकरी असल्याची जाहिरात इन्स्टाग्रामवर आली होती. या जाहिरातीवरील संबंधित मोबाईलवर संपर्क साधला असता संशयिताने त्याला नोकरीच्या बदल्यात आपल्या खात्यात रक्कम जमा करण्यास सांगितले. नंतर संशयिताने फिर्यादी प्रवेश याच्या खात्यातून अनधिकृतरित्या व्यवहार करुन रक्कम काढली. आपल्या बँक खात्यातून एकूण ४ लाख ७० हजार रुपये रक्कम अज्ञात संशयिताने काढल्याचे आढळून आल्यावर प्रवेश सिंग याने पोलिसांत धाव घेतली.
या तक्रारीच्या आधारे पोलिसांनी ९ महिने तपशीलवार डिजिटल फॉरेन्सिक आणि डिजिटल उपकरणांच्या माध्यमातून तपास करीत संशयिताची ओळख पटवली व त्याच्या मुसक्या आवळल्या.
पोलीस निरीक्षक सूरज गावस यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक नितेश शिंगाडी यांच्या नेतृत्वाखालील पथकाने पंजाब पोलिसांच्या सहाय्याने चंदीगड येथे संशयिताला पकडून अटक केली. संशयिताला म्हापसा न्यायालयाने चार दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.
हरियाणा, उत्तराखंडमध्ये संशयितावर गुन्हे
संशयित आरोपी असीम वीज हा सराईत सायबर क्राईम गुन्हेगार आहे. विदेशात नोकरी देण्याचे भासवून इच्छुक युवकांची आर्थिक फसवणूक संशयित करीत होता. हरियाणा व उत्तराखंड राज्यातील अशाच प्रकारच्या गुन्ह्यांमध्ये संशयिताचा सहभाग आहे.