मायना कुडतरी पोलिसांनी अवघ्या १२ तासांत आवळल्या संशयितांच्या मुसक्या
मडगाव : राय सोनारवाडा येथील गोल्डन हाऊस चाळीत भाड्याने राहणार्या खगेश्वर साबर (३८, रा. जुनागड, ओडिशा) याचा खून झाला होता. याप्रकरणी माहिती मिळाल्यापासून १२ तासांच्या आत मायना कुडतरी पोलिसांनी पलायनाच्या तयारीत असलेल्या मूळ ओडिशातील संशयित सशिबंत बिभीषण मांझी (४३) व रबी मांझी (२८) यांना अटक केलेली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, खगेश्वर साबर हा ओडिशा येथील ओळखीच्या सशिबंत मांझी व रबी मांझी यांच्यासोबत सोनारवाडा राय येथील भाड्याच्या खोलीत राहत होता.१३ एप्रिल रोजी सकाळी खगेश्वर साबर याच्या खोलीतून रक्त बाहेर येत असल्याचे शेजार्यांना दिसून आल्यावर त्यांनी याची माहिती पोलिसांना दिली. त्यानंतर खगेश्वर याचा खून झाल्याचे समजले. मायना कुडतरी पोलिसांनी ई-साक्ष अॅपच्या सहाय्याने पंचनामा केला. श्वानपथकासह फॉरेन्सिक पथकालाही पाचारण करत पुरावे गोळा करण्यात आले. यानंतर खोलीत आलेला एक सहकारी घटनेच्या आधीच बाहेर गेल्याचे समजले. हे कामगार आपापसात बेटींग करायचे. दरम्यान त्यांच्यात काहीतरी बिनसले. यातच मद्याच्या नशेत मारहाणीचा प्रकार घडला व त्यावेळी डोक्यावर लाकडी दांडा मारल्याने जखमी खगेश्वर साबर याचा मृत्यू झाल्याची माहिती मिळाली होती.
मायना कुडतरी पोलिसांनी तीन पथके स्थापन करत मडगाव रेल्वेस्थानक, कदंब बसस्थानक व इतर परिसरात तपासाला सुरुवात केली. गावी जाण्याच्या तयारीतील संशयित सशिबंत मांझी याला मडगाव रेल्वेस्थानकाच्या आसपास फिरताना ताब्यात घेण्यात आले. रबी मांझी हा देखील बसच्या माध्यमातून गावी जाण्याच्या तयारीत होता. त्याला बांबोळी परिसरातून त्याला ताब्यात घेण्यात आले. दोन्ही संशयितांना अटक करत त्यांची पोलीस कोठडीत रवानगी करण्यात आली आहे. घटनेची माहिती मिळाल्यापासून अवघ्या १२ तासांच्या आत पोलिस निरीक्षक अरुण गावस देसाई यांच्या मार्गदर्शनाखाली मायना कुडतरी पोलिसांनी या प्रकरणातील संशयितांना अटक केली.