गोवा विधानसभेत भाजपाचा प्रथमच प्रवेश...

भाजपा नेते मनोहर पर्रीकर यांना पणजीतून निवडणूक लढवायची होती. पणजीतील अनेक जुन्या जाणत्या नेत्यांना हे मान्य नव्हते. त्यांनी म्हापशातून निवडणूक लढवावी असे त्यांचे म्हणणे होते. या वादात अखेर मनोहर पर्रीकर यांनी बाजी मारली.

Story: इतिहासाची पाने चाळताना... |
13th April, 03:32 am
गोवा विधानसभेत  भाजपाचा प्रथमच प्रवेश...

१९८९ च्या निवडणुकीत मगो बरोबर निवडणूक युती करण्याचा प्रस्ताव बाल्यावस्थेत असलेल्या भाजपाने मगो पक्षाला दिला होता. मगो पक्ष नेत्यांनी तो धुडकावून लावला. मराठी राजभाषा प्रश्नावर आपल्याला मोठ्या प्रमाणात पाठिंबा मिळणार असा मगो नेत्यांचा होरा होता व विधानसभा निवडणुकीत काँग्रेस एवढ्याच म्हणजे १९ जागा मिळाल्याने मगोचा निर्णय योग्यच होता हे सिद्ध झाले. काँग्रेसने तिकीट नाकारल्याने बंड करून अपक्ष म्हणून निवडून आलेले डॉ. कार्मो पेगादो यांनी निवडून येताच मगो पक्षाला पाठिंबा जाहीर केला होता. पण दोन्ही पक्षांना समान जागा मिळाल्याने काँग्रेसने डॉ. पेगादो यांच्यावर दडपण आणले आणि गोव्यात काँग्रेसचे सरकार आले.

१९८९ च्या प्रकाराची १९९४ मध्ये पुनरावृत्ती होऊ नये म्हणून आता तरी युती करुया असा आग्रह भाजपाचे राष्ट्रीय नेते प्रमोद महाजन व गोपीनाथ मुंडे यांनी मगो नेते रमाकांत खलप यांच्याकडे धरला. हिंदुत्ववादी मतांचे विभाजन होत असल्याने काँग्रेसच सत्तेवर येणार, त्यामुळे मगो पक्षाला सत्ता काबीज करायची असल्यास मगो भाजपा युती अपरिहार्य असल्याचे मत ‘चक्रव्यूह’ या माझ्या राजकीय सदरात व्यक्त केले होते. मडगाव येथील ज्येष्ठ पत्रकार सीताराम टेंगसे व मित्रमंडळी याच विचारांची होती व त्यांनीही प्रयत्न चालविले होते. मगो भाजपाची ही युती आपणच घडवून आणली होती असा दावा आणखी एका ज्येष्ठ पत्रकाराने अलिकडेच केला आहे. मगोने युती करण्यास नकार दिल्याने १९८९ मध्ये भाजपाने स्वबळावर निवडणूक लढविली होती. भाजपाचे ७ ज्येष्ठ नेते कमळ घेऊन निवडणूक आखाड्यात उतरले होते मात्र एकही उमेदवार आपली अनामत वाचवू शकला नव्हता. लक्ष्मीकांत पार्सेकर-मांद्रे (३६०), विश्वनाथ आर्लेकर-धारगळ (८४), माधव धोंड-पणजी (२६९), श्रीपाद येसो नाईक-कुंभारजुवे (४५१), रामनाथ देसाई-डिचोली (२२१), सुनील देसाई-फोंडा (५७३), आशा साळसकर -मुरगाव (२२२), शिवराम लोटलीकर-वास्को (१६५) अशी नगण्य मते भाजपा उमेदवारांना मिळाली होती.

१९८९ मधील या निवडणुकीचा निकाल पाहता स्वबळावर निवडणूक लढविणे मुर्खपणाचे ठरले असते. त्यामुळे कोणत्याही परिस्थितीत ही युती झालीच पाहिजे असा आग्रह होता. मगो पक्षाचे नेते युती करण्यास राजी नव्हते. मात्र भाजपा नेते तसेच इतर काही गटांनी असे वातावरण निर्माण केले की युती मान्य केल्याशिवाय गत्यंतर राहिले नाही. भाजपाचे नेते प्रमोद महाजन यांनी आपले सर्व बुद्धिचातुर्य पणाला लावून मगो नेत्यांना युती करण्यास भाग पाडले. मतदारसंघ वाटपाबाबत मगो पक्षाने घातलेल्या सर्व अटी मान्य केल्या. मगोचा बालेकिल्ला मानला जाणारा मडकई मतदारसंघ रवी नाईक यांच्या पक्षांतरामुळे रिक्त होता. भाजपाचे ज्येष्ठतम नेते श्रीपाद नाईक यांच्यासाठी सोडण्यात आला. बऱ्याच वाटाघाटीनंतर मगो किंवा भाजपाचे फारसे बळ नसलेल्या सासष्टी तालुक्यातील सर्व मतदारसंघासह गोव्यातील चाळीसही मतदारसंघात निवडणूक लढविण्याचा निर्णय घेण्यात आला. मगोला २५, भाजपा १२ आणि शिवसेना ३ अशी मतदारसंघाची विभागणी करण्यात आली.

बाणावली मतदारसंघातून काँग्रेस तिकीट मिळणे शक्य नसल्याने चर्चिल आलेमाव यांनी पणजीतील एक उद्योजक रघुराय तांबा यांनी ‌स्थापन केलेल्या युनायटेड गोवन्स डेमोक्रॅटिक पार्टी (यूजीडीपी) या नोंदणीकृत पक्षावर ताबा मिळवला व या पक्षाचे तब्बल २० उमेदवार उभे केले. काँग्रेसने मात्र ४० उमेदवार उभे केले होते. मगो, भाजपा आणि शिवसेना युती असल्याने हिंदुत्ववादी मते संघटित होऊन या युतीला बहुमत मिळून मगो नेते रमाकांत खलप यांचे मुख्यमंत्री बनण्याचे स्वप्न साकार होईल असे खलप यांच्या मित्रमंडळींना वाटत होते. मात्र हे स्वप्नच त्यांना महागात पडले. खलप मुख्यमंत्री होऊ नयेत म्हणून  कटकारस्थान करुन त्यांचे पंख छाटण्यात आले असा गंभीर आरोप निवडणुकीनंतर खलप समर्थकांनी केला होता. १९७३ पासून मांद्रे मतदारसंघातून सतत निवडून येणारे रमाकांत खलप मगो-भाजपा युती असूनही काँग्रेस उमेदवार सौ. संगीता परब यांच्याकडून ६३३ मतांनी पराभूत झाले. मतांचे एवढ्या मोठ्या प्रमाणात ध्रुवीकरण कसे झाले? या प्रश्नाचे उत्तर अजून खलप यांना मिळालेले नाही. पक्षाच्या नेत्यांनी युती केली होती पण निवडणूक लढवू इच्छिणाऱ्या नेत्यांनी बंडखोरी करून अपक्ष बनून निवडणूक आखाड्यात उडी मारल्याने निवडूनही  येणारच याची खात्री अ़सलेल्या अनेक उमेदवारांची दांडी पडली.

साळगांव मतदारसंघातून मुख्यमंत्री डॉ. विली डिसोझा यांच्याविरुद्ध निवडणूक लढविणारे शिवसेना उमेदवार दिलीप कळंगुटकर मुख्यमंत्री डॉ. विली यांना पाडणार याची खात्री सर्वांनाच होती. मात्र मगोचे माजी आमदार श्रीकांत मळीक यांनी युती धुडकावून लावून अपक्ष म्हणून निवडणूक आखाड्यात उडी मारली. लोकांनीही युतीचा विचार न करता त्यांना भरभरून मते दिली. त्यांना २३६९ मते पडली. ही मते युतीचे उमेदवार दिलीप कळंगुटकर यांना मिळाली असती तर डॉ. विलींचा गणपती बाप्पा मोरया झाला असता.

डिचोलीतही असाच प्रकार घडला. ही जागा मगोला मिळाली होती. मगोने अॅड कालिदास परब यांना तिकीट दिली होती. मात्र पांडुरंग राऊत यांनी बंडखोरी करून मगोचे अधिकृत उमेदवार कालिदास परब  यांच्यापेक्षा ६३० मते अधिक मिळविली. त्यामुळे काँग्रेसचे उमेदवार पांडुरंग भटाळे आरामात विजयी झाले. भाजपा नेते मनोहर पर्रीकर यांना पणजीतून निवडणूक लढवायची होती. पणजीतील अनेक जुन्या जाणत्या नेत्यांना हे मान्य नव्हते. त्यांनी म्हापशातून निवडणूक लढवावी असे त्यांचे म्हणणे होते. या वादात अखेर मनोहर पर्रीकर यांनी बाजी मारली. मात्र काँग्रेसचे सुरेंद्र फुरतादो यांनी बंडखोरी केली नसती तर मनोहर पर्रीकर यांना पहिल्याच निवडणुकीत पराभवाला सामोरे जावे लागले असते. मनोहर पर्रीकर यांच्याशी दोन हात करण्यासाठी काँग्रेसने केशव प्रभू यांना आखाड्यात सोडले होते. मवाळ स्वभाव असलेले प्रभू पर्रीकर  यांच्या तुलनेत बरेच कमकुवत होते. तरीही केशव प्रभू यांनी चांगली लढत दिली. संघ कार्यकर्ते, मगो कार्यकर्ते आणि भाजपा कार्यकर्ते असा मोठा परिवार असूनही पर्रीकर यांना केवळ ४६०० मते मिळाली व प्रभूवर त्यांनी १०६६ मतांनी मात केली. पण या विजयात काँग्रेसचे बंडखोर उमेदवार सुरेंद्र फुरतादो यांचा फार मोठा वाटा आहे. पणजी पालिका आणि महापालिकेचे महापौर म्हणून काम पाहिलेले सुरेंद्र फुरतादो विधानसभा निवडणूक लढविण्यास इच्छुक होते. मात्र काँग्रेसने त्यांचा दावा फेटाळून काँग्रेसची उमेदवारी केशव प्रभूंच्या पदरात टाकल्याने भडकलेले फुरतादो यांनी बंड पुकारले. त्यांनी आपली सगळी प्रतिष्ठा पणाला लावली आणि स्वबळावर ११३९ मते मिळवली. फुरतादो यांनी बंड केले नसते तर त्यांना मिळालेली बरीच मते केशव प्रभू यांना मिळाली असती तर कोणी सांगावे कदाचित सुरेंद्र फुरतादो पणजीचे आमदार बनले असते!?

काँग्रेसमधील मोठ्या प्रमाणातील बंडखोरीमुळे किमान ६ जागांवर पाणी सोडावे लागले. यूजीडीपीमुळे बाणावलीतून फ्रान्सिस मोंत क्रूझ, कुडतरीतून फ्रान्सिस सार्दिन आणि कुंकळीतून शांताराम नाईक हे काँग्रेसचे तीन मोहरे नेस्तनाबूत झाले. काँग्रेसने तिकीट नाकारल्याने मानू फर्नांडिस (वेळी) जॉन वाझ (मुरगांव) आणि श्रीमती व्हिक्टोरिया फर्नांडिस यांनी बंड पुकारले आणि श्रीमती फॅरेल फुर्टाडो आणि शेख हसन आणि व्हिक्टर गोनसालव्हीस या काँग्रेसच्या तीन माजी आमदारांना पराभूत व्हावे लागले.

काँग्रेसला केवळ १८ जागा मिळाल्या. मगोला १२ आणि भाजपाला ४ जागा मिळाल्या आणि भाजपाचा विधानसभेत प्रवेश झाला. मनोहर पर्रीकर (पणजी) श्रीपाद नाईक (मडकई) दिगंबर कामत (मडगाव) आणि नरहरी हळदणकर (वाळपई) या चार आमदारांनी घातलेल्या पायाचे गेल्या ३० वर्षात वटवृक्षात रुपांतर झाले आहे.


गुरुदास सावळ

(लेखक ज्येष्ठ पत्रकार आहेत.)