एलोपीशिया म्हणजे काय?

साधारणपणे एखाद्या व्यक्तीचे दररोज ५० ते १०० केस गळतात व नवीन केस त्यांच्या जागी वाढत राहतात. पण जर आपल्या केसांची रेषा अधिक रुंद होत असेल, टक्कल पडत असेल, टाळूवरील केस गळत असतील किंवा दररोज १२५ पेक्षा जास्त केस गळत असतील तर ते चिंताजनक असू शकते.

Story: आरोग्य |
30th November, 03:59 am
एलोपीशिया  म्हणजे काय?

केस कोणाचे गळत नाहीत? महिला आणि पुरुष दोघांमधेही आजकाल केस गळण्याची समस्या म्हणजे अगदी सामान्य बाब झालेली आहे. वाढते वय, मानसिक ताण, हार्मोन्सचे असंतुलन, पोषक तत्वांची कमतरता, हवेतील प्रदूषण आणि इतर शारीरिक आजार ही केस गळतीची काही मुख्य कारणे आहेत. एरवी केस गळणे ही एक सामान्य शारीरिक प्रक्रिया आहे, ज्यामधे जुने केस गळतात आणि त्यांच्या जागेवर नवीन केस येतात. पण, जेव्हा केस गळण्याचे प्रमाण जास्त असते किंवा केस गळण्याच्या प्रमाणात नवीन केस येत नाहीत, तेव्हा ती एक समस्या होऊन बसते.

जरी इतर वेळी केस गळण्याकडे फारसे लक्ष दिले जात नसले, पण जेव्हा त्याचे प्रमाण वाढते, टक्कल दिसू लागते किंवा केस खूपच पातळ दिसू लागतात, तेव्हा स्वाभाविकपणे केस गळणे थांबवण्यासाठीचे उपाय शोधले जातात. गळणारे केस सौंदर्यात बाधा आणू लागतात व अनेकांचा आत्मविश्वास कमी होतो.

केस गळणे हा नैसर्गिक संतुलनाचा भाग आहे. साधारणपणे एखाद्या व्यक्तीचे दररोज ५० ते १०० केस गळतात व नवीन केस त्यांच्या जागी वाढत राहतात. पण जर आपल्या केसांची रेषा अधिक रुंद होत असेल, टक्कल पडत असेल, टाळूवरील केस गळत असतील किंवा दररोज १२५ पेक्षा जास्त केस गळत असतील तर ते चिंताजनक असू शकते.

केसगळती म्हणजे एलोपीशियाचे प्रकार पुढीलप्रमाणे असतात

एलोपीशिया एरियाटा : हा सर्वात सामान्य प्रकारचा अलोपेसिया आहे ज्यामध्ये केस नाण्यांच्या आकाराच्या पॅचमध्ये पडतात.
एलोपीशिया टोटालिस : या प्रकारात तुमच्या डोक्यावरील केस पूर्णपणे गळतात.
एलोपीशिया युनिव्हर्सलिस : हा एक दुर्मिळ प्रकार आहे. याच डोके, चेहरा आणि शरीराच्या इतर भागातले केस पूर्णपणे गळतात.
डिफ्यूज एलोपीशिया एरियाटा : हे केस गळतीच्या पॅटर्नसारखे दिसते, सामान्यतः कोणतेही पॅच नसतात आणि संपूर्ण टाळूवर केस पातळ होतात.
ओफियासिस एलोपीशिया : केस गळणे हे टाळूच्या मागील आणि खालच्या बाजूने होते.

एलोपीशिया एरियाटा म्हणजे काय? 

एलोपीशिया एरियाटा ही एक स्वयंप्रतिकार स्थिती (ऑटोइम्यून आजार) आहे ज्यामधे शरीराच्या पांढऱ्या रक्तपेशी केसांच्या कूपांच्या पेशींवर हल्ला करू लागतात. ज्यामुळे ते आकुंचन पावतात आणि केसांचे उत्पादन कमी होते. केस गळत असले तरी सुरुवातीला ते लक्षात येत नाही किंवा विचित्र वाटू शकते. परंतु, जेव्हा केस गळणे व नवीन येण्यामधले संतुलन बिघडते म्हणजे जेव्हा जास्त केस गळणे सुरू असते पण नवीन केस त्यांच्या जागी उगवत नाहीत आणि टक्कल पडू लागते, तेव्हा त्या स्थितीला एलोपीशिया एरियाटा म्हणतात. हे केस गळणे अनेकदा टाळूवर होत असले तरी, भुवया, पापण्या आणि चेहऱ्यावरील केसांवरही याचा परिणाम होऊ शकतो. एलोपीशिया एरियाटा कोणालाही आणि कोणत्याही वयात होऊ शकतो व संपूर्ण केसांमध्ये असण्याऐवजी पॅचच्या स्वरूपात असते. ही स्थिती जगभरातील सुमारे १४७ दशलक्ष लोकांना प्रभावित करते.

निदान कसे करतात? 

केस गळतीची निदाने सुरुवातीचे वय, केस गळण्याचे प्रमाण, नखांमधील बदल आणि इतर वैद्यकीय परिस्थिती अशा वेगवेगळ्या घटकांवर अवलंबून असतात. ट्रायकोस्कोपी आणि त्वचेची बायोप्सी यासारख्या चाचण्या तज्ञांना केस गळण्याचे प्रकार आणि कारण अधिक चांगल्या प्रकारे निर्धारित करण्यात मदत करतात. 

एलोपीशियावर उपचार

उपचारांमध्ये रोगप्रतिकारक शक्तीला केसांच्या कूपांवर हल्ला करण्यापासून रोखणे व केसांची वाढ उत्तेजित करणे समाविष्ट असते. उपचार पद्धती पुढीलप्रमाणे असू शकतात.

कोर्टिसोन किंवा मेथोट्रेक्झेट आणि सायक्लोस्पोरिन यांसारखे ओरल इम्युनोसप्रेसंट्स अलोपेसियासाठी मोठ्या प्रमाणात वापरल्या जातात.

टॉपिकल इम्युनोथेरपी - हे थेट टाळूवर लावले जाते. यामुळे रोगप्रतिकारक शक्ती उत्तेजित होते आणि केस वाढण्यास मदत होते.
मिनोक्सिडिल - हे २ किंवा ५ टक्के ताकदीमध्ये येतात, ज्यामुळे ते थेट टाळूवर लावले जाऊ शकते. हे केसांच्या फोलिकल्समध्ये रक्तप्रवाहाला प्रोत्साहन देऊन, सुप्त कूपांना उत्तेजित करून आणि केसांच्या वाढीस मदत करून कार्य करते.
लेझर थेरपी - हे केसांची घनता वाढवण्यास किंवा सुधारण्यास मदत करू शकते.

केस प्रत्यारोपण 

फॉलिक्युलर युनिट ट्रान्सप्लांटेशन - यामध्ये दात्याच्या भागातून कलमाची पट्टी घेतली जाते.

फॉलिक्युलर युनिट एक्स्ट्रॅक्शन - केसांचे कूप एक एक करून काढले जातात आणि नंतर प्रत्यारोपण केले जातात.

स्टिरॉइड इंजेक्शन - स्टिरॉइड्स लहान सुयाद्वारे टक्कल पडलेल्या ठिपक्यांवर त्वचेमध्ये टोचल्या जातात.

नैसर्गिक उपचारांतील अरोमाथेरपी, एक्यूपंक्चर, मायक्रोनेडलिंग, प्रोबायोटिक्स, झिंक आणि बायोटिन सारखे व्हिटॅमिन, कोरफड जेल, रोझमेरी, लव्हेंडर, पेपरमिंट तेल यासारखी काही आवश्यक तेले, इतर तेल जसे नारळ, जोजोबा, ऑलिव्ह ऑइल हे केस गळतीवर बऱ्याच प्रमाणात उपयोगी ठरते. 


डॉ. श्वेता राऊत मुळगावकर