पूजाविरुद्ध फोंडा न्यायालयात ५ महिन्यांपूर्वी याचिका
फोंडा : सरकारी नोकरी देण्याचे आश्वासन देऊन लाखो रुपयांची फसवणूक केल्याचे प्रकरण राज्यात गाजत आहे. म्हार्दोळ पोलिसांनी अटक केल्यावर नुकत्याच जामिनावर सुटका झालेल्या पूजा नाईक (जुने गोवा) व अजित सतरकर (आपेव्हाळ- प्रियोळ) यांच्याविरुद्ध फोंडा न्यायालयात ५-६ महिन्यांपूर्वी ४ लाख रुपयांचा चेक बाऊन्स झाल्याची याचिका दाखल झाल्याची धक्कादायक माहिती उघड झाली आहे. रक्कम घेऊन फसवणूक झाल्याचे समजताच दोन पालकांनी अजित सतरकर यांच्याकडून रक्कम परत देण्याचे लेखी आश्वासन तर पूजा नाईक यांच्याकडून ४ लाख रुपयांचा घेतलेल्या चेकचे प्रकरण सध्या न्यायालयात पोहचले आहे.
फोंडा परिसरातील दोन पालकांना अजित सतरकर यांनी दोन मुलांना सरकारी नोकरी देण्याचे आश्वासन २०२० साली दिले होते. दोन युवकांना एलडीसी नोकरी देण्यासाठी १० लाख रुपये देण्याचे ठरले होते. पूजा नाईक यांच्यामार्फत दोन्ही युवकांना नोकरी देण्याचे आश्वासन देण्यात आले होते. नोकरीसाठी दोन्ही पालकांकडून ४ लाख रुपये घेण्यात आले. आगाऊ रक्कम घेतल्यानंतर अवघ्या ४०-४५ दिवसांत सरकारी नोकरी मिळाल्यानंतर उर्वरित ६ लाख रुपये पालकांकडून घेण्याचे ठरले. उर्वरित ६ लाख रुपये पूजा नाईक व अजित सतरकर यांना देण्यासाठी दोन्ही पालकांनी बँकेतून कर्ज घेतले. पण दोन वर्षे उलटले तरी सरकारी नोकरी मिळाली नाही. दोन्ही पालक वारंवार पूजा नाईक व अजित सतरकर यांना फोन करून थकले.
शेवटी २०२४ च्या वर्षाच्या सुरुवातीला दोन्ही पालकांनी सतरकर यांच्या घरी जावून ४ लाख रुपये मागितले. पण रक्कम न मिळता पुन्हा आश्वासन मिळाले. संतापलेल्या पालकांनी ८ लाख रुपये परत करण्याचे लेखी आश्वासन अजित सतरकर यांच्या कडून घेतले. त्यानंतर पूजा नाईक यांच्याकडून ४ लाख रुपयांचा चेक घेतला. चेक बँकेत काही दिवसांनी जमा करण्याची विनंती पूजा हिने केली होती. पण संतापलेल्या पालकांनी चेक बँकेत घालून बाऊन्स केला. त्यानंतर प्रकरण वकिलामार्फत फोंडा येथील न्यायालयात नेले. या याचिकेवर अजूनपर्यंत दोन सुनावणी झाल्या आहेत. त्यामुळे पूजा नाईक व अजित सतरकर यांचे प्रकरण यापूर्वीच उघडकीस आल्याचे दिसून येत आहे.
नोकरीच्या आमिषाने फसवणुकीचे वाढले प्रकार
राज्यात सरकारी नोकरीच्या बदल्यात रक्कम घेऊन फसवणूक होत असल्याच्या प्रकारांत वाढ झाली आहे. फोंडा तालुक्यात अनेक युवक आमिषांना बळी पडलेले आहेत. पण बळी पडलेल्या युवकांनी कोणत्याही खात्यात नोकरीसाठी अर्ज केला नसल्याचे पोलीस चौकशीत स्पष्ट झाले आहे.