भुतानी प्रकल्पाविरोधात साखळी उपोषण ठेवणार सुरूच
वास्को : सांकवाळ येथे गेले दहा दिवस उपोषण करणारे माजी सरपंच प्रेमानंद नाईक यांना दिवाळी साजरी करता यावी यासाठी दक्षिण गोव्याचे खासदार कॅ. विरियातो फर्नांडिस यांनी केलेल्या विनंतीला मान देऊन नाईक यांनी फादर केनेथ तेलीस यांच्या हस्ते सरबत पिऊन बुधवार, दि. ३० रोजी सकाळी उपोषण सोडले. मात्र, भुतानी प्रकल्पाला विरोध कायम राहावा यासाठी दिवाळी काळात तेथे ख्रिश्र्चन बांधव उपोषणाला बसणार आहेत.
प्रेमानंद नाईक यांच्या उपोषणाला गोव्यातील विविध भागांतून मोठा पाठिंबा मिळाला. त्यांची खालावत चाललेली प्रकृती व गुरुवारपासून सुरू होणारी दिवाळी त्यांच्या कुटुंबांना साजरी करता यावी यासाठी खासदार फर्नांडिस यांनी मध्यरात्री सदर ठिकाणी भेट दिली. त्यानंतर पुन्हा पहाटे ते तेथे आले. त्यांनी नाईक यांची समजूत काढून त्यांना उपोषण मागे घेण्याची विनंती केल्यावर नाईक यांनी उपोषण मागे घेण्यास सहमती दर्शविली.
तेथे जमलेल्या सामाजिक कार्यकर्ते, रहिवाशी, विविध पक्षांचे नेते यांनी सरकारच्या एकंदर भूमिकेवर टीका केली. काँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष गिरीश चोडणकर यांनी काही पंच व नेत्यांना भुतानी यांनी विकत घेतल्याचा दावा केला. मुख्यमंत्र्यांना लक्ष घातले, तर हा प्रकल्प सहजपणे रद्द होऊ शकतो, असे उपस्थितांनी सांगितले.
रामराव वाघ यांनी हा लोकभावनेचा विजय असून, ती दिवाळीची भेट असल्याचे सांगितले. रामा काणकोणकर यांनी लढण्यासाठी एकी कायम ठेवा, असे आवाहन केले.
तुळशीदास नाईक यांनी प्रेमानंद नाईकच्या उपोषणाने सांकवाळवासीयांसह गोव्याला तसेच सर्व जातीधर्माला एकत्र आणले असल्याचे सांगितले.
याप्रसंगी प्रतिमा कुतिन्हो यांनी त्या शौचालयातील सीसीटीव्ही कॅमेरांप्रश्नी गुन्हा दाखल झाला असला, तरी संशयितांना अद्याप अटक का होत नाही असा प्रश्न उपस्थित केला. याप्रसंगी शंकर पोळजी, ओलंसियो सिमोईस, मारियान, दामोदर नाईक, नारायण डी. नाईक, आमदार व्हेंझी व्हिएगस, सामाजिक कार्यकर्त्या तारा केरकर, फिडोल परेरा, पंच मौर्लियो कार्व्हालो व इतरांनी विचार मांडले.
ख्रिश्र्चन बांधव बसणार उपोषणाला
भुतानी प्रकल्पाला विरोध कायम राहावा यासाठी दिवाळी काळात तेथे ख्रिश्र्चन बांधव साखळी पद्धतीने उपोषणाला बसणार आहेत. सुकुर मिनिझेस (पणजी), गिलरॉय कॉस्ता (कासावली), फिडोल परेरा यांनी साखळी पद्धतीने उपोषणाला आरंभ केला. सकाळी दहा ते सायंकाळी सहा या वेळेत उपोषण केले जाणार आहे.