राज्य सरकारने आयोगामार्फत परीक्षा घेऊन गुवणत्तेला वाव द्यावा. जोपर्यंत पारदर्शक पद्धतीने नोकर भरती सुरू होत नाही, तोपर्यंत नोकरीचे आमिष दाखवून फसवणूक करणारे लोक भोळा भाबड्यांना गंडवतच राहतील.
विदेशात नोकरी देतो, जहाजावर चांगली नोकरी आहे, सैन्य दलांमध्ये नोकरी निश्चित, प्लॉट देतो, सरकारी नोकरी देतो, असे सांगून लोकांना गंडा घालणाऱ्यांची संख्या वाढते आहे आणि त्यांच्या आमिषांना बळी पडून लाखो रुपये गमावून बसणाऱ्या पीडितांची संख्याही वाढत चालली आहे. कोणीही सटर फटर माणूस आपली अमुक नेत्याशी ओळख आहे असे सांगून त्यांच्यासोबतचे फोटो दाखवतो, लोकांचा विश्वास संपादन करतो आणि भोळ्या भाबड्यांना कामांचे आमिष दाखवून फसवत असतो. मंत्र्यांसोबत फोटो काढणे अगदीच सोपे असल्यामुळे ते फोटोच काही जणांच्या कमाईचे माध्यम होते.
गोव्यात कसला फ्रॉड होण्याचे बाकी राहिलेले नाही. पोलिसांत तक्रार आल्यानंतर पोलिसही चक्रावतात, कारण ज्याच्या विरोधात तक्रार आहे त्याची चौकशी केल्यानंतर त्याने यापूर्वीही फसवल्याचे प्रकार समोर येतात किंवा त्याची कुठलीच पार्श्वभूमी नसताना लोक त्याला पैसे देतात असे उघड होते. आतापर्यंत आलेल्या तक्रारींमधील आरोपी पाहिले तर काही जणांची कसलीच ऐपत नसताना आपण सरकारी नोकरी देतो म्हणून त्यांनी भल्याभल्यांना फसवल्याचे दिसून येते. जो माणूस सरकारी नोकरी देतो म्हणून सांगतो तो स्वत: बेकार आहे हे माहीत असतानाही लोक अशा बेकारांवर विश्वास ठेवून आपली जमापुंजी गमावून बसतात.
प्लॉट देण्याचे आमिष दाखवून कोट्यवधींची फसवणूक, फ्लॅट देण्याचे आमिष दाखवून गंडा, शेअर्समध्ये गुंतवणूक करून पैसे दुप्पट करण्याचे आश्वासन देऊन कोटींना लुबाडले अशा एक नव्हे अनेक फसवणुकीच्या घटना रोज समोर येतात. अशा बातम्या रोज आपण वाचत असतो. गोवा हा दुसरा ‘जमतारा’ झाला आहे. झारखंडमधील ‘जमतारा’मध्ये बसून ठग लोक ऑनलाईन फ्रॉड करतात हे जगप्रसिद्ध आहे. गोव्यातही असे फ्रॉड करणारे पावलोपावली मिळतील. देश-विदेशातील लोकांना फसवणारे, बनावट कॉल सेंटर गोव्यात बसून चालवणाऱ्यांनाही पोलिसांनी अनेकदा अटक केली आहे. पैसे आले की ते खर्च कसे करायचे याचेही काहींना भान राहत नाही. पैसा आहे तर तो दुप्पट करण्यापासून सरकारी नोकरी मिळवण्यापर्यंतच्या कुठल्याही प्रलोभनांना माणसे बळी पडतात. काही माणसांचा गुणधर्म असा की चांगल्या माणसांवर विश्वास ठेवणार नाहीत. नात्यातल्या माणसाला, मित्राला गरज भासली तर कवडी खर्च करणार नाहीत. ज्यांचे कुटुंबही विश्वास ठेवत नाही अशा बनावट, फसव्या लोकांच्या आमिषांना मात्र बळी पडून लाखो, कोटी रुपये गमावून बसतात. एक, दोन लाख नव्हे तर कोट्यवधी रुपये गमावल्याच्या अनेक तक्रारी गोव्यातील सायबर क्राईम विभाग आणि आर्थिक गुन्हे विभागाकडे आहेत. सध्या गाजत आहेत ती दोन प्रकरणे. एक पूजा नाईक या महिलेचे चक्रावून सोडणारे कारनामे आणि दुसरे एका पोलीस कॉन्स्टेबलने जो पूर्वी एका मंत्र्याच्या अत्यंत जवळ होता त्याने लोकांना नोकरी देतो असे सांगून लाखोंचा गंडा घातल्यामुळे त्याला बडतर्फ करण्यासाठी पोलिसांनी सुरू केलेली कारवाई. या दोन्ही प्रकरणांत दोघांनीही गोव्यातील कित्येक बेरोजगारांना फसवले आहे.
सरकारी नोकरी देतो असे सांगून पूजा नाईक या महिलेने अनेकांना लाखो रुपयांना गंडवले. ही रक्कम कितीतरी कोटींच्या घरात जाते. मिळालेल्या माहितीप्रमाणे गेल्या बारा-तेरा वर्षांपासून अशा गोष्टी ती करत आहे. सुरुवातीच्या काळात तिने काही जणांना नोकऱ्या दिल्याचेही ऐकिवात आहे. कदाचित त्यामुळेच तिला ओळखणाऱ्या लोकांनी तिच्यावर विश्वास दाखवला असेल. पैसा आला आणि महागड्या गाड्या, फ्लॅट, प्लॉट खरेदीचे व्यसन लागले की लोक फसवत जातात. कारण त्यांना आपल्या या नव्या गरजा पूर्ण करण्यासाठी पैसे हवे असतात. मग त्यासाठी कोणालाही टोपी घालण्यासाठी हे लोक तयार असतात. अशा लोकांकडे सरकारी नोकरी मिळेल म्हणून असलेले, नसलेले पैसे देऊन मोकळे होतात. सरकारी नोकरी म्हटली की, कोणालाही पैसे देण्यासाठी लोक तयार होतात. मंत्र्यांच्या जवळचे कोणी असेल तर त्याच्यावर एकदमच परम विश्वास. काहीवेळा तर सर्व रक्कम आगाऊ देऊन लोक नोकरीची वाट पाहत असतात. जी प्रकरणे पोलिसांत येतात ती ऐकल्यानंतर सर्वसामान्याला चक्कर येईल. लोक रोख रक्कम देऊन मोकळे होतात. कुठला पुरावा नाही की साक्षीदार नाही.
‘मंत्र्यांच्या कार्यालयात पेपर लिहिले जातात’, ‘इतरांचे पेपर न तपासता आपल्याला हवे त्यांनाच गुण देऊन परीक्षेचा निकाला लावला जातो’, ‘ज्या पेनने पेपर लिहिला ते पेन नंतर फेरफार करण्यासाठी वापरले जाते’ अशा ‘गूढकथा’ नेहमीच ऐकायला मिळतात. अशा ऐकीव गोष्टींचा फायदा उठवून आपण काम करू शकतो असा विश्वास दाखवून लोकांची फसवणूक केली जाते. पैसे देऊनही वर्षानुवर्षे काम होत नाही किंवा ज्या कामासाठी पैसे दिले ते काम झाले नाही तर आपली फसवणूक झाल्याचे पटकन लक्षात यायला हवे. ज्या नोकरीसाठी पैसे दिले ती पदे भरल्यानंतर दुसरी नोकरी देतो असे सांगून टोलवाटोलवी सुरू झाली की आपण फसवलो गेलो याची कल्पना यायला हवी. लोक तरीही वाट पाहतात. पुन्हा पुन्हा रक्कम देतात. परिणामी शेवटी फसतात. अशा ठगांच्या नादी लागून पैसे गमावण्यापेक्षा मिळेल ते काम करण्याची तयारी ठेवायला हवी. खाजगी असो किंवा रोजंदारीचे. पैसे देऊन काम झाले तर आपण बसून खाऊ ही मानसिकता बदलायला हवी. आपल्या गुणवत्तेवर काम मिळवण्याची धमक हवी. त्यासाठी मिळेल ते काम करण्याचा धर्म माणसांनी स्वीकारायला हवा.
गोव्यात कर्मचारी भरती आयोग स्थापन झालेला आहे. आयोगाकडून आतापर्यंत सुमारे दहा ठिकाणी नोकर भरतीच्या परीक्षा झाल्या आहेत. काही ठिकाणी नियुक्त्याही झाल्या. या परीक्षेचे निकालही २४ तासांत जाहीर होतात. संगणकीय पद्धतीने परीक्षा होते आणि परीक्षा दिल्यानंतर त्याचवेळी उमेदवारांना आपल्याला मिळालेले गुणही पाहायला मिळतात. केंद्र सरकारही अशा आयोगामार्फतच काम करते. कर्मचारी भरती आयोग आणि त्या आयोगामार्फत सीबीआरटी परीक्षा हाच पारदर्शक नोकर भरतीसाठी उपाय आहे. राज्य सरकारने या आयोगामार्फत परीक्षा घेऊन गुवणत्तेला वाव द्यावा. त्यानंतर पैसे देऊन नोकरी मिळते हा समज आपोआप नाहीसा होईल. जोपर्यंत पारदर्शक पद्धतीने नोकर भरती सुरू होत नाही, तोपर्यंत नोकरीचे आमिष दाखवून फसवणूक करणारे लोक भोळा भाबड्यांना गंडवतच राहतील.
पांडुरंग गांवकर, (लेखक दै. गोवन वार्ताचे संपादक आहेत.) मो. ९७६३१०६३००