ती माझी सांगाती

पुस्तके आणि माझे नाते मात्र अजूनही घट्ट टिकून आहे. त्यांचे आणि माझे नाते हे जन्माचे.. अगदी बालपणापासून घट्ट मैत्रीचे. बालवाडीत चित्रबोध ते छोट्याछोट्या रंगीत चित्रांच्या कथांची पुस्तके वाचता वाचता मी त्यांच्या अनोख्या मनपसंद भावनिक जगात कधी शिरले ते कळलेच नाही.

Story: ललित |
26th October, 05:16 am
ती माझी सांगाती

एका अनोख्या, अद्वितीय, अवर्णीय अशा पुस्तक प्रकाशन सोहळ्याला “याची देही याची डोळा” पाहण्याचा एक सुंदर योग  मला लाभला. आपल्या मातेच्या पहिल्या वहिल्या खास अशा पुस्तक प्रकाशन सोहळ्याला परप्रांती सासरी असलेली तीची विवाहित लेकही उपस्थित होती. या सोहळयाचा आनंद घेताना लेकीच्या नयनातून ओघळणारे आनंदाश्रू मी पाहिले. आपल्या खास माणसांचा खास सोहळा म्हणजे अगदी अद्वितीय आनंद असतो. नकळत मला अगदी दहा वर्षा मागच्या माझ्या पहिल्या वहिल्या पुस्तक प्रकाशन सोहळ्याची आठवण झाली. 

आपल्या लाडक्या कन्येच्या पहिल्या वहिल्या पुस्तक प्रकाशन सोहळ्याला माझ्या बाबांनी आनंदाने हजेरी लावली होती आणि पुस्तक प्रकाशन झाल्यावर दोन दिवसात संपूर्ण पुस्तक त्यांनी वाचून काढले होते व लेखन सुधारणेसाठी मला मौखिक सूचनाही दिल्या होत्या. माझ्या बाबांना वाचनाची प्रचंड आवडत होती. असे कितीतरी भावनिक क्षण या पुस्तकरुपी सोबतीने मला आजपर्यंत बहाल केलेले आहेत. बालपण हळूवार निसटले. तारुण्यही नकळत कधी सरले ते कळलेच नाही आणि आता मी वृद्धापकाळाच्या उंबरठयावर... 

जीवनात कितीतरी माणसे नातेवाईक, स्नेही, मित्र रूपाने आली. त्यातले काही अजूनही घट्ट नातेसंबंध टिकवून आहेत. कुणाशीही नातेसंबंध शक्यतो तोडायचे नाहीत या मताची मी. माझ्या मनाला चटके देवून काहींनी नातेसंबंध तोडले... पण पुस्तके आणि माझे नाते मात्र अजूनही घट्ट टिकून आहे. त्यांचे आणि माझे नाते हे जन्माचे अगदी बालपणापासून घट्ट मैत्रीचे. बालवाडीत चित्रबोध  ते छोट्याछोट्या रंगीत चित्रांच्या कथांची पुस्तके वाचता वाचता मी त्यांच्या अनोख्या मनपसंद भावनिक जगात कधी शिरले ते कळलेच नाही. शिरले ते शिरले, अगदी त्या जगात रमूनच गेले. हळूहळू मैत्री वाढत गेली आणि आज त्यांच्याशी माझी मैत्री इतकी घट्ट झाली आहे की ते माझ्या जीवनाचे अविभाज्य घटक बनले आहेत. त्यांच्या सहवासाने, लाभण्याने, येण्याने किंवा मिळण्याने म्हणा मी नेहमीच सुखावते. 

ज्यांच्याबद्दल माझ्या मनात एक अनामिक ओढ आहे ती म्हणजे पुस्तके. एखादे पुस्तक हातात पडले की मी सुखावते. नकळत पाने चाळायला हात सरसावतात आणि त्यांच्या वाचनात मी स्वतःला हरवून बसते. माझ्या वाचन आवडीचे श्रेय खरे म्हणजे आमच्या अगदी पूर्व प्राथमिक शाळेत शिकवणाऱ्या बाईला जाते. शाळेत प्राथमिक वर्गात शिकताना अगदी तन्मयतेने मन लावून मराठी विषय शिकवणारी ती आमची बाई. कविता आपल्या गोड आवाजात चाल लावून गाऊन दाखवणारी ती आमची प्राथमिक शाळेची शिक्षिका. कवितेचा विषय तंतोतंत आमच्या नजरेसमोर उभी करणारी ती खरी आमची गुरुमाऊली होती. याच कविता मी घरी आल्यावर अगदी आनंदाने गुणगुणायची. वाचनाचे बीज आम्हा विद्यार्थ्यांमध्ये त्या बालवयात ती पेरीत होती. 

शाळेतून घरी आल्यावर पंचतंत्र, अकबर बिरबलाच्या गोष्टी सांगणारी माझी आजी, मार्च, एप्रिल महिन्यात माझ्या माहेरी तिच्या माहेरपणात पंधरा दिवसांसाठी राहायला येणारी माझी आत्या. ‘पडवळा भोवती भवरा गा ,पडवळी कोण खुटता’ अशा खड्या आवाजात सुरात गात गात लोक कहाण्या, लोकसंगीत, लोकसंस्कृती याच्यावर आधारित इथल्या मातीतल्या गोष्टी सांगणारी माझी आत्या. आपल्याबरोबर येताना माझ्यासाठी गोष्टींचे पुस्तक आणणारी माझी आत्या. या सर्वांनी माझ्यात वाचनाचे बीज पेरले होते. मला, “कहाणी वाचून दाखव” म्हणत लहान मुलांबरोबर कहाणी ऐकताना सहज मिसळून जाणारी ती माझी आत्या. 

शाळेत शिकताना वाचन तासाला मिळणारी पुस्तके अभ्यासाच्या पाठ्यपुस्तका इतकी जपायला पाहिजे अशी शिस्त लावणारी माझी आई. “पुस्तक म्हणजे सरस्वती. तिला चुकून पाय लागला, तर पाया पडायचे. त्यांना सांभाळायचे.” ही शिस्त अगदी बालपणी आईने दिली. अशा प्रकारे पुस्तक वाचता वाचता वाचनाचा छंद कधी कसा जडला ते कळलेच नाही. सुट्टीत मामाच्या घरी गेल्यावर तिथे रंगीत पुरवण्या, मासिके यांची मेजवानी अगदी तयारच असायची. पुस्तकात तोंड खुपसून  बसल्यावर  मामाई अगदी प्रेमाने समजवायची. “बाय सांमाळून वाच गो. दोळयाक वक्ल लागतले.” आईच्या नकळत कपड्यांच्या पिशवीत कोंबून एक दोन दिवाळी अंक घरी घेऊन यायची. 

हायस्कूलात शिकताना आमच्या गावात ग्रामीण वाचनालय सुरू झाले. झोपताना झोपून वाचायची वाईट सवय काही दिवस मला लागली. या सगळ्यांचा परिणाम म्हणून की काय, शेवटी चष्मा लागला. कुळागरात पाटाचे पाणी सोडायला जाताना हातात पुस्तक घेऊन जायचे. बांधावर नारळी पोफळीच्या सुक्या झावळ्या टाकून मी वाचत बसायचे. हिरव्यागार निसर्गाच्या सानिध्याची मग चिमण पाखरे, खारुताईं यांच्या सहवासात पुस्तके वाचण्याचा आनंद पदरी पडायचा. कॉलेज शिक्षण पूर्ण होईपर्यंत हा क्रम कधीच चुकला नाही. त्याकाळी आम्हा मुलांना आमच्या खेडेगावात शाळेतून घरी आल्यावर अभ्यास करणे, नंतर सवंगड्यांबरोबर खेळणे किंवा आंबे, फणस, चिंचा, बोरे पाडत फिरणे, रानमेवा गोळा करणे, कुळागरातील लहान कामे करणे या व्यतिरिक्त मनोरंजनाची कोणतीही खास अशी साधने नव्हती. कदाचित त्यामुळे मी पुस्तक वाचनाकडे ओढली गेली असणार. कॉलेजात जाईपर्यंत घरात कृष्णधवल टीव्ही आला, पण तोपर्यंत वाचनांचे जणू वेडच लागले होते. त्या काळच्या त्या टीव्हीवर शेतीविषयी माहिती, रामायण, महाभारत आणि बातम्या या व्यतिरिक्त कोणतेही खास कार्यक्रम नसायचे. आठवड्याच्या बाजारात मी बाबांसोबत शहरात जायचे त्यावेळी ‘चांदोबा’, ‘कुमार’, ‘विक्रम वेताळ’ यासारखी मासिके विकत आणायची. मनमोहक मुखपृष्ठ आणि आतमध्ये प्रत्येक कहाणीसोबत रंगीत चित्रे ही पुस्तके मला वेड लावायची. रात्रीचा दिवस करून अगदी झोपेतसुद्धा मी पुस्तके वाचून काढायची. अशा या पुस्तकांनी त्याकाळी बालमनावर खूप चांगले संस्कार केले. जीवनात पुढे सरसावताना खूप काही शिकवले. शिस्तीचे धडे शिकवले. 

पुढे कॉलेजला शिकताना अमुक लेखकांची कादंबरी चांगली अशा प्रकारच्या आमच्या गप्पागोष्टी बस थांबावरून अगदी कॉलेजपर्यंत पायी चालत जाताना चाललेल्या असायच्या. कॉलेज जीवनात कविता, कथा याही पुढे जावून मी कादंबऱ्या वाचायला लागले. यापुढे जाऊन त्या किशोरवयात कधीकधी एखादी प्रणय रहस्यांनी भरलेली, प्रेम प्रकरणांनी सजलेली कादंबरी वाचण्याचा मोह व्हायचा पण ती कादंबरी दुसऱ्या कोणत्याही मासिकांच्या आत ठेवून सावधगिरीने त्यांचे वाचन मी करायचे. घरात कोणी पाहिले तर याची एक भीती त्यांकाळी संस्कारित मनाला असायची. कॉलेजात एखादा मोकळा तास असेल तर मी सरळ लायब्ररीत घुसायचे व एखाद्या पुस्तकात डोके खुपसून त्याचा फडशा पाडायचे. 

वाचन संस्कृतीने जीवनात मला बहाल केलेल्या अमृत संजीवनीची सुमधुर फळे मी आजही सिद्धहस्त लेखिकेच्या रूपात चाखत आहे. कविता, ललित, कथा अशा साहित्यकृतीतून व्यक्त होताना स्वतः साहित्यिक असल्याचा आनंद घेत आहे. एखाद्या पुस्तक प्रकाशनाला जाऊन ते पुस्तक विकत घेऊन वाचणे हे माझ्या भावूक मनाला पटत नाही. उलट जा लेखकांच्या किंवा कविच्या पुस्तकांचे प्रकाशन झाले, त्यांनी आपली स्वाक्षरी करून ते पुस्तक मला प्रेमाने, स्वखुशीने भेट द्यावे व म्हणावे “वाचून अभिप्राय सांगा हं!” असे म्हटले की मन सुखावते व ‘आपण वाचक म्हणून कुणीतरी खास आहोत’ आणि ‘लेखकराज किंवा कविराज आपली दखल घेतात’ हा विचार मनाला सुखावतो. 

रोज दुपारच्या जेवणानंतर एखादा घरीच बनवलेला लाडू मुगाचा असो, बेसन; तो हळूच खाता खाता वर्तमानपत्र किंवा एखादी कथा वाचणे हा माझा अगदी आवडता छंद. आज चष्म्याशिवाय एकही अक्षर दिसत नाही. पण झोपताना एखादी साहित्यकृती मग ती कविता असो‌, किंवा कथा वाचल्याशिवाय मात्र झोप लागत नाही हे तितकेच खरे.


शर्मिला प्रभू, फातोर्डा मडगाव