मांद्रेतून उमेश गावकर यांच्यासाठी काँग्रेसचे प्रयत्न

शिरोड्यातून अभय प्रभूंना मिळू शकते उमेदवारी


16th December 2018, 02:01 am



विशेष प्रतिनिधी। गोवन वार्ता
पणजी : तीन राज्यांत काँग्रेसची आलेली सत्ता आणि गोव्यात सध्या काँग्रेससाठी असलेले पूरक वातावरण यामुळे काँग्रेस मांद्रे आणि शिरोडा मतदारसंघ पुन्हा ताब्यात घेण्यासाठी प्रयत्नशील आहे. काँग्रेस मांद्रे मतदारसंघातून निवृत्त पोलिस अधीक्षक उमेश गावकर यांना उमेदवारी देण्यासाठी प्रयत्न करीत आहे, तर शिरोडा मतदारसंघात मागील निवडणुकीत मगोचे उमेदवार राहिलेले अभय प्रभू यांना उमेदवारी देण्यासाठी काँग्रेसने बोलणी सुरू केली आहे.
मांद्रे मतदारसंघातून काँग्रेसने माजी पोलिस अधीक्षक उमेश गावकर यांना उमेदवारी द्यावी, अशी मागणी जोर धरू लागली आहे. स्थानिक काँग्रेस नेत्यांमध्ये उमेदवारीवरून मतभेद होऊ शकतात. गावकर यांना उमेदवारी दिली, तर मांद्रेत काँग्रेसला संधी मिळू शकते असे अनेकांचे मत आहे. काँग्रेसने आपल्या एका आमदाराकडे उमेश गावकर यांच्याशी चर्चा करण्याचे काम सोपवले आहे.
काँग्रेसच्या वरिष्ठ सूत्रांनी दिलेल्या माहितीप्रमाणे गावकर यांनी काँग्रेसची उमेदवारी स्वीकारण्याची तयारी दर्शवली आहे. गावकर यांचा जनसंपर्क मोठा आहे व लोकांशी त्यांचे संबंधही चांगले आहेत, तसेच काँग्रेसला मांद्रेत वातावरण चांगले असल्यामुळे त्याचा फायदा गावकर यांना होऊ शकतो.
शिरोडा मतदारसंघातही काँग्रेस अनपेक्षित खेळी करण्यासाठी प्रयत्न करीत आहे. मागील निवडणुकीत तिसऱ्या क्रमांकावर राहिलेले मगोचे उमेदवार अभय प्रभू यांना काँग्रेसने प्रस्ताव दिला आहे. प्रभू हे मगोचे नेते सुदिन ढवळीकर यांच्या निकटचे मानले जातात, त्यामुळे काँग्रेसची ऑफर घेण्यापूर्वी ते ढवळीकर यांच्याशी चर्चा करतील. त्यांनी होकार दिला तरच प्रभू काँग्रेसमध्ये प्रवेश करतील.
मिळालेल्या माहितीप्रमाणे काँग्रेसला असलेल्या पूरक वातावरणाची संधी घेण्याच्या विचारात प्रभू आहेत. ढवळीकर बंधूंना न दुखवता कसा निर्णय घेता येईल, त्यावर ते विचार करीत आहेत.
मगोची पारंपरिक मते व भाजपकडून दुखावलेल्यांची मते, तसेच काँग्रेसची मते या सर्वांचा फायदा प्रभू यांना होऊ शकतो. काँग्रेसच्या उमेदवारीसाठी पंच तुकाराम नाईक व अन्य काही जण इच्छुक आहेत, परंतु सध्याच्या वातावरणाचा लाभ करून घेण्यासाठी काँग्रेस प्रभू यांच्या नावाचाच विचार करीत आहे.

मला निवडणूक लढण्यासाठी ऑफर आली, तर मी नक्कीच विचार करीन, परंतु सध्यातरी प्रस्ताव आलेला नाही.
- उमेश गावकर
निवृत्त पोलिस अधीक्षक

शिरोड्यात दोन उमेदवारांमध्ये सरळ लढत झाली, तर काँग्रेसचा उमेदवार जिंकू शकतो. मला निवडणूक लढण्यासाठी ऑफर आहे, परंतु अजून मी अंतिम निर्णय घेतलेला नाही.
- अभय प्रभू
मगोचे नेते

मांद्रेतून उमेदवारी कोणाला द्यावी ते अद्याप निश्चित झालेले नाही. परंतु वेगवेगळे पर्याय आमच्यासमोर आहेत. पक्ष योग्य वेळी चांगला पर्याय लोकांसमोर ठेवेल. मांद्रेतील अनेक नागरिकांनी उमेदवार निवडीसाठी सूचना केल्या आहेत.
- गिरीश चोडणकर
प्रदेशाध्यक्ष, काँग्रेस  

हेही वाचा