भारत ‘ए’कडून ऑस्ट्रेलिया ‘ए’ पराभूत


22nd October 2018, 04:44 pm
भारत ‘ए’कडून ऑस्ट्रेलिया ‘ए’ पराभूत

मुंबई :स्मृती मानधाना व कर्णधार हरमनप्रीत कौरच्या शानदार खेळीच्या जोरावर भारत ‘ए’ने तीन सामन्यांच्या टी-२० मालिकेतील पहिल्या सामन्यात ऑस्ट्रेलिया ‘ए’चा चार गड्यांनी पराभव केला. वेस्ट इंडिजमधील महिलांचा टी-२० विश्वचषक डोळ्यासमोर ठेवून या मालिकेचे आयोजन करण्यात आले आहे.
प्रथम फलंदाजी करताना ऑस्ट्रेलिया ‘ए’ने २० षटकांत सहा बाद १६० धावा केल्या. हीथर ग्राहमने ४३ धावांची खेळी केली. भारतीय संघाने एक षटक बाकी ठेवून सहा गडी गमावून १६३ धावा करत सामना जिंकला. मानधानाने ४० चेंडूत ७२ धावांची तर हरमनप्रीत कौरने ३९ चेंडूत ४५ धावांची खेळी केली.
भारताने जेमिमा रॉड्रिगीस (४) व यष्टिरक्षक तानिया भाटीयाच्या (०) रुपात दोन गडी लवकर गमावले. हरमनप्रीत कौर बाद होईपर्यंत भारताची धावसंख्या चार बाद १२६ पर्यंत पोहोचली होती मात्र पूजा वस्त्राकारने नाबाद २१ धावा करत भारताला विजयापर्यंत पोहोचवले.
तत्पूर्वी ऑस्ट्रेलियाच्या डावात ग्राहमव्यतिरिक्त ताहिला मॅक्ग्रा (३१) व नाथोमी स्टारेनबर्ग (३९) चांगली सुरुवात मिळाल्यानंतरही मोठी खेळी करू शकल्या नाहीत. भारतातर्फे अनुजा पाटील व दीप्ती शर्माने प्रत्येकी दोन गडी बाद केले. या मालिकेतील दुसरा टी-२० सामना बुधवार दि. २४ ऑक्टोबर रोजी खेळवण्यात येणार आहे.