लोहिया मैदानाचे लवकरच नूतनीकरण

दक्षिण गोवा जिल्हा प्रशासनाचा निर्णय


22nd June 2018, 03:41 am



प्रतिनिधी। गोवन वार्ता

मडगाव : गोव्याच्या मुक्ति लढ्याचे केंद्रस्थान असलेल्या येथील लोहिया मैदानाचे नूतनीकरण करून सभोवतालच्या परिसराचे सुशोभीकरण करण्याचा निर्णय दक्षिण गोवा जिल्हा प्रशासनाने घेतला आहे. सरकारतर्फे कामाची निविदा काढून लवकरच गोवा राज्य शहर विकास प्राधिकरणाकडून हे नूतनीकरणाचे काम पूर्ण करून घेतले जाणार आहे.

दक्षिण गोव्याच्या जिल्हाधिकारी अंजली शेरावत यांनी लोहिया मैदानाचे नूतनीकरण व सुशोभीकरणासाठी गुरूवारी सकाळी माथानी साल्ढाना जिल्हा संकुलातील परिषद सभागृहात बैठक बोलावली होती. नगर नियोजन मंत्री विजय सरदेसाई, आमदार दिगंबर कामत, चर्चिल आलेमांव, नगराध्यक्षा डॉ. बबिता आंगले प्रभुदेसाई तसेच पोलिस उपअधीक्षक राजू राऊत देसाई, प्रबोध शिरवईकर, निरीक्षक फिलोमेन कॉस्ता, पर्यटन खात्याचे सहाय्यक संचालक धिरज वागळे, जिल्हा सदस्या नेली रॉड्रिग्ज, स्वातंत्र्य सैनिक व शहरातील अन्य नागरिक बैठकीला उपस्थित होते.

स्वातंत्र्य सैनिक डॉ. राम मनोहर लोहिया यांनी लोहिया मैदानावर गोव्याच्या मुक्ति लढ्याची ज्योत पेटवली होती. नंतर लोहिया मैदानावरूनच मुक्ति लढ्याला सुरूवात झाली होती. त्यामुळे लोहिया मैदानाला ऐतिहासिक महत्त्व प्राप्त झालेले आहे. या ऐतिहासिक लोहिया मैदानाच्या नूतनीकरणाबरोबर सुशोभिकरणही करण्यात यावे असा प्रस्ताव स्वातंत्र्य सैनिकांनी नगरनियोजन मंत्र्यासमोर मांडला होता. त्यानुसार जिल्हा प्रशासनाने लोहिया मैदानाच्या नूतनीकरणाचा निर्णय घेतलेला आहे.

दक्षिण गोवा जिल्हा प्रशासनाने लोहिया मैदानाच्या नूतनीकरणाबरोबर सुशोभिकरणाचा आराखडा तयार केलेला आहे. त्या आराखड्याबद्दल पॉवर पॉईंट प्रेझेन्टेशनही बैठकीत दाखविण्यात आले. सर्वप्रथम लोहिया मैदानाच्या रंगमंचाची दुरूस्ती केली जाणार आहे. तसेच थोडी उंची वाढविण्यात येणार आहे. सभोवताली असलेल्या संरक्षक दगडी कुंपणाची उंची वाढविण्यात येणार आहे. वीजेच्या ट्रान्सफॉर्मरचे पश्चिमेकडील कोपऱ्यात स्थलांतर करण्यात येणार आहे. मैदानाच्या बाजूला जॉगिंग ट्रॅक तयार केला जाणार आहे. त्याचप्रमाणे जमिनीवरील हिरवळ टिकवून ठेवली जाणार आहे. लोकप्रतिनिधी व स्वातंत्र्य सैनिकांनीही लोहिया मैदानाच्या नूतनीकरण व सुशोभिकरणाच्या कामाबद्दल सूचना या बैठकीत केल्या.

---------------------------------------------------------------------


सनसेट किनाऱ्यावर सीसी टीव्ही

बेताळभाटीतील सनसेट समुद्र किनाऱ्यावर पर्यटकांच्या सुरक्षिततेसाठी सीसी टीव्ही व कॅमेरा बसविण्याचा निर्णय दक्षिण गोवा जिल्हा प्रशासनाने घेतला आहे. तसेच समुद्र किनाऱ्यावर पर्यटक पोलिसही नियुक्त केले जाणार आहेत. गेल्या महिन्यात सनसेट समुद्र किनाऱ्यावर तिघा परप्रांतीयांनी प्रियकरासोबत असलेल्या एका स्थानिक युवतीवर बलात्कार केला होता. त्यामुळे समुद्र किनाऱ्यावर कडक सुरक्षा व्यवस्था ठेवण्याची मागणी नुवेचे आमदार विल्फ्रेड डिसा यांनी निवेदनाद्वारे जिल्हा प्रशासनाकडे केली होती.जिल्हाधिकारी अंजली शेरावत यांनी लोकप्रतिनिधीच्या निवेदनाची गंभीरपणे दखल घेऊन खास बैठक बोलावून सनसेट समुद्र किनाऱ्यावर कडक सुरक्षा ठेवण्याचा निर्णय घेतलेला आहे.                    

हेही वाचा