पणजी - म्हापसा रस्त्यावरील प्रचंड वाहतूक व त्यामुळे विशेषत: पर्वरी भागात लागत असलेल्या वाहनांच्या रांगांमुळे होणारा खोळंबा गेली काही वर्षे सरकारची डोकेदुखी ठरला होता. मोपा आंतरराष्ट्रीय विमानतळ खुला झाल्यावर ही समस्या अधिक गंभीर बनली होती. त्यामुळेच पर्वरी ते गिरी दरम्यान उड्डाणपुलाची कल्पना पुढे आली. पाच कि.मी.हून थोडा अधिक लांबीचा हा उड्डाणपूल उभारण्याशिवाय दुसरा कोणताच पर्यायही नव्हता. कारण बगल रस्ता उभारण्यासाठी तेथे तशी जागा नव्हती व विद्यमान एनएच-६६ हा रस्ता रुंद करावा म्हटला, तर दोन्ही बाजूंना रस्त्यालगत मोठ्या प्रमाणात बांधकामे उभी ठाकली होती. त्यामुळे हा उड्डाणपूल आखला गेला. त्यासाठी प्रचंड खर्च होणार होता, पण केंद्राच्या उदारवृत्तीमुळे त्याला मंजुरीही मिळाली. हरयानातील तत्पर ठेकेदारामुळे दोन वर्षांच्या मुदतीपेक्षा कमी वेळात ते बांधकाम पूर्णही झाले व सार्वजनिक बांधकाम खात्याचे मंत्री दिगंबर कामत यांनी चतुर्थीपूर्वी तो वाहतुकीस खुला करण्याबाबत केलेली घोषणा प्रत्यक्षातही आली. त्याचे मोठ्या दणक्यात उद्घाटनही केले गेले व तिसऱ्याच दिवशी तो वाहतुकीसही खुला केला गेला. पण कुठे तरी माशी शिंकली असावी. शुक्रवारी, ११ सप्टेंबर रोजी वाहतुकीस खुल्या झालेल्या या उड्डाणपुलावर दुसऱ्याच दिवशी शनिवारी एक अपघात होऊन त्यात दोन बळी गेले. सदर अपघात कसा झाला, त्याला जबाबदार कोण, याची शहानिशा न करताच जो तो त्या उड्डाणपुलाला व त्याच्या रचनेला दोष देताना दिसत आहे. त्यात सर्वात अग्रेसर आहेत, ज्यांना अशा प्रकल्पाबाबत कसलीच माहिती किंवा ज्ञान नाही अशी मंडळी. या दिवसांत केवळ हाच अपघात नाही, तर असे अनेक अपघात होऊन बळी गेले आहेत, पण त्याबाबत कोणीच काही बोलताना दिसत नाहीत. पर्वरीतील त्या अपघाताचा मात्र गवगवा केला जाताना दिसत आहे. वास्तविक अपघात हा मुद्दाम केला जात नाही, पण बहुतेक अपघात हे बेदरकारीतून होत असतात. पर्वरीतील तसेच त्यानंतर परवा केरये - खांडेपार येथे कंटेनर व बुलेट मोटारसायकल यांच्यात झालेला अपघात हा अशा बेदरकारीतून झालेला आहे. त्याचा सहसा विचार होत नाही. पण पर्वरीतील अपघाताचे खापर उड्डाणपुलावर फोडण्याचा जो प्रकार होत आहे, ते पाहून संबंधितांची कीव कराविशी वाटते.
पर्वरीचे आमदार तथा मंत्री रोहन खवंटे यांनी तर “सदर पूल वाहतुकीस खुला करण्याबाबत आपणाला विश्वासात घेतलेले नाही,” असे निवेदन करून वास्तविक स्वतःचेच हसे करून घेतले आहे. पुलाच्या उद्घाटनाच्या समारंभात त्यांनी केलेल्या भाषणाशी विसंगत असे त्यांचे हे निवेदन आहे, असे म्हणावे लागते. सदर पूल ठरलेल्या मुदतीपूर्वी पूर्ण करून वाहतुकीस खुला झाल्यामुळे बहुतेक विरोधकांची वाचाच बसली होती, पण या अपघातानंतर त्यांना कंठ फुटल्याचे दिसून येते. अपघाताबद्दल दुःख अवश्य व्यक्त करा, पण असे अनेक पायाभूत प्रकल्प जर आपल्या राजवटीत साकारले असते, तर आज ज्या अडचणी उद्भवत आहेत त्या उद्भवल्याच नसत्या, हे त्यांनी मान्य करायला हवे. विशेषतः पर्वरीतील मुख्य रस्त्यालगत जर बांधकामे साकारली नसती, तर या उड्डाणपुलाची गरजच निर्माण झाली नसती हे वास्तव आहे. केवळ पर्वरीच नव्हे, तर राज्यातील अनेक मुख्य रस्त्यांलगत बहुमजली इमारती साकारल्याने अशा विकास प्रकल्पांसाठी त्या अडसर ठरत आहेत. हेच लोक अशा प्रकल्पांबाबत लोकांची दिशाभूल करताना वा त्यांना चिथावताना दिसत आहेत. पर्वरीतील त्या अपघातात दोन बळी गेल्याने लोकांमध्ये संतापाची भावना निर्माण होणे स्वाभाविकच आहे व त्यातूनच या पुलावरील वाहतुकीवर निर्बंध घातले गेले, तेही साहजिकच होते. पण त्या निर्बंधांचे अनेकांनी राजकारण केल्याचे गेला आठवडाभर समाजमाध्यमावरून दिसून येत आहे. या निर्बंधांमुळे सर्व्हिस रस्त्यावर पुन्हा वाहनांची वर्दळ वाढल्याचीही काहींची तक्रार आहे.
गोव्यात प्रत्येक नव्या व्यवस्थेबाबत सुरुवातीला असाच आरडाओरडा असतो, कारण नवा बदल वा व्यवस्था ही पचनी पडायला थोडा वेळ जात असतोच. काहींनी तर पर्वरीवासीयांना या उड्डाणपुलावर प्रवेश नसेल, तर त्याचा उपयोग तो काय, असा सवाल केलेला पहायला मिळते. वास्तविक या पुलाचा जो अव्यापारेषु व्यापार केला गेला आहे, तो पर्वरीतील सावळागोंधळ दूर करण्यासाठीच. पूर्वी प्रचंड आकाराच्या मालमोटारी, टॅंकर, लांबलचक कंटेनर यांच्यामुळे रस्त्यावर ज्या प्रचंड रांगा लागून गोंधळ होत होता, तो आता उड्डाणपुलावरून वाहने थेट जाऊ लागल्याने वाहतूक सुरळित झाली आहे, हे मान्य करावेच लागेल, म्हणूनच सांगावेसे वाटते की हा उड्डाणपूल पर्वरीतील रहिवाशांच्या वापरासाठी नव्हता, तर त्यांची रोजची होणारी गैरसोय दूर करण्यासाठी होता व ती गैरसोय दूर झाल्याचे गेल्या काही दिवसात जाणवतही आहे. ती पूर्णतः दूर होण्यासाठी आणखी काही दिवस जावे लागतील. तोपर्यंत प्रत्येकाला थोडी कळ सोसावी लागेल. जुवारी पूल पूर्ण झाल्यानंतर आगशी - कुठ्ठाळी भागात आज जो सुसह्यपणा आला आहे त्यावरून ते दिसून येईल. गेल्या आठवड्यातील अपघातानंतर पर्वरी उड्डाणपुलावर घातलेले निर्बंध हे तात्पुरते आहेत, आता तर नागपूर आयआयएमच्या तज्ज्ञांनी या प्रकल्पाचा अभ्यास सुरू केलेला असून त्रुटी लवकर दूर करण्याचे जाहीर केलेले आहे. त्यापूर्वी राज्य सरकारनेही अनेक उपाय घेतले आहेत, त्यामुळे या पथकाने केलेल्या शिफारसींची त्वरित अंमलबजावणी होणे स्वाभाविकच आहे. पण त्यानेही भागणार नाही. वाहन चालकाने संयम पाळला, वेगावर नियंत्रण ठेवले तर बहुतेक अपघात टळतील. काही दिवसांमागे सांकवाळ परिसरात अंतर्गत रस्त्यावर एका मर्सिडीसला झालेला अपघात व त्यात एका तरुणाचा गेलेला बळी गोव्यातील एकंदर रस्ताअपघातांचे बेसूर चित्र दाखवून देतो. खरे म्हणजे वाढते अपघात टाळणे ही आता सामूहिक जबाबदारी मानावी लागेल. वाहन चालक, सरकारी यंत्रणा, चांगले रस्ते या सर्वांवर ती जबाबदारी येते. केवळ रस्ते वा पुलांना दोष देऊन चालणार नाही. पर्वरी उड्डाण पुलावर झालेल्या त्या अपघाताचा म्हणूनच सर्व बाजूंनी अभ्यास होण्याची गरज आहे.



