विचारपूर्वक निर्णयाची गरज

Story: अंतरंग- उत्तर गोवा |
20th September, 08:42 pm
विचारपूर्वक निर्णयाची गरज

उद्घाटनाच्या अवघ्या दिवसानंतर सुरक्षेच्या कारणास्तव पर्वरीतील फ्लायओव्हर दुचाकींसाठी बंद करण्यात आला. अटल सेतूप्रमाणेच सध्या तरी फ्लायओव्हरवरही दुचाकींना बंदी आहे. फ्लायओव्हरचे एंट्री व एक्झिट पॉईंट बंद करण्यात आल्याने सध्या तरी पर्वरीवासीयांना फ्लायओव्हरचा उपयोग होत नाही. पर्वरीतील वाहतूक कोंडी दूर करण्यासाठी फ्लायओव्हरचे नियोजन करण्यात आले होते. मात्र सध्या तरी पर्वरीवासीयांना फ्लायओव्हरवरून वाहन चालविणे शक्य होत नाही. जी वाहने अटलसेतूचा वापर करतात, त्यानाच आता फ्लायओव्हरचा वापर करणे शक्य झालेले आहे. तसेच अटलसेतूवरून पर्वरीला जायचे असल्यास गिरीहून पुन्हा माघारी यावे लागते. फ्लायओव्हरपूर्वी असा वेढा घ्यावा लागत नसे. सध्या तरी सोयीऐवजी फ्लायओव्हरमुळे अडचणीच निर्माण झाल्या आहेत. या अडचणी दूर करून फ्लायओव्हरचा अधिकाधिक उपयोग कसा करता येईल? हे सरकारसाठी आव्हान ठरलेले आहे. या पार्श्वभूमीवर आयआयएम नागपूरच्या पथकाने शनिवारी फ्लायओव्हरची पाहणी केली. फ्लायओव्हर खुला करण्याबाबत एक-दोन दिवसांत निर्णय होणार आहे. फ्लायओव्हरचे अटलसेतूजवळील एक्झिट व एंट्री पॉईंट उघडे झाले तर सर्वांसाठी दिलासादायक निर्णय ठरणार आहे. मात्र ही गोष्ट एवढी सोपी नाही. असे झाल्यास अटल सेतू आणि फ्लायओव्हर यांच्यामधल्या पट्ट्यात वाहतुकीचा खेळखंडोबा होण्याचा धोका आहे. यासाठी या पट्ट्यावर योग्य प्रकारचे वाहतूक व्यवस्थापन होणे गरजेचे आहे. याबाबत आयआयएम नागपूर योग्य सूचना वा शिफारसी सार्वजनिक बांधकाम खात्याला करेल, अशी अपेक्षा आहे. 

फ्लायओव्हरप्रमाणेच मेरशी जंक्शनवर देखील सदोदित वाहतुकीची कोंडी होत असते. वाहतूक व्यवस्थापनासाठी सार्वजनिक बांधकाम खात्याने आयआयएम नागपूरशी सामंजस करार केलेला आहे. पर्वरी फ्लायओव्हरचे उद्घाटन झाले त्याच दिवशी हा करार करण्यात आला. पर्वरी फ्लायओव्हरची उभारणी आरआरएसएम इन्फ्रा या तज्ज्ञ कंत्राटदारामार्फत झालेली आहे. अटल सेतूवर फक्त चारचाकी गाड्यांनाच परवानगी आहे. फ्लायओव्हरवरून मात्र सर्व वाहनांना परवानगी असणार होती. तेव्हा फ्लायओव्हर व अटल सेतू यांच्या दरम्यानच्या पट्ट्यावर वाहतूक व्यवस्थापनासाठी खास उपाययोजनांची गरज असल्याचे कोणाच्याच कसे लक्षात आले नाही? की उद्घाटनाची घाई केल्यामुळे समस्या निर्माण झाली? फ्लायओव्हर पूर्ण करण्यासाठी कंत्राटदाराने आणखी सहा महिन्यांची मुदत मागितली होती. फ्लायओव्हरवरून चतुर्थीत गणपती नेणे शक्य व्हावे, म्हणून चतुर्थीपूर्वी उद्घाटन करण्यात आले. गणपती सोडाच चतुर्थीच्या काळात दुचाकींनाही फ्लायओव्हर वापरणे शक्य झाले नाही. नवीन पूल, रस्ता तसेच फ्लायओव्हर उभारताना तज्ज्ञांमार्फत आराखडा तयार केला जातो. वाहतुकीचेही नियोजन केले जाते. फ्लायओव्हरबाबत असे नियोजन झाले असते तर आज तो दुचाकींसाठी बंद ठेवण्याची वेळ आली नसती. भीषण अपघात घडला व त्यानंतर निर्बंध घालण्यात आले. नियोजनाच्या अभवामुळेच ही नामुष्की आली. आता तरी पूर्ण विचार करून निर्बंधाबाबत निर्णय घ्यायला हवा.