२४ x ७ योग आणि अध्यात्म

तुमचे अध्यात्म हे २४ तास 'ऑन' असले पाहिजे. अध्यात्म 'ऑन ' असणे म्हणजे काय? "म्हणजे मी कामावर जायचे नाही का? कुटुंबाबरोबर राहायचे नाही का?" तर तुम्ही सर्वकाही एक अध्यात्मिक प्रक्रिया बनवायचेय.

Story: विचारचक्र |
20th September, 09:08 pm
२४ x ७ योग आणि अध्यात्म

सद्गुरू : एकदा काही विद्यार्थी कुठल्यातरी सामाजिक कामासाठी वर्गणी गोळा करता करता गल्लीतल्या एका घराजवळ पोहोचले. त्यांनी दारावर टकटक केली. एका ऐंशी वर्षांच्या आज्जींनी दार उघडले. आज्जीनी त्यांना आत बोलावले. विद्यार्थ्यांनी त्यांना आपल्या सामाजिक कार्याची माहिती दिली. त्यांनी आज्जींना- या कार्याला त्या वेगवेगळ्या प्रकारे कशी मदत करू शकतात हे समजावून सांगितले. आणि मग ते आज्जींना म्हणाले "तुम्ही सगळी रक्कम लगेच द्यायचीही गरज नाही, तुम्ही तीन वर्षांचा वायदा करू शकता." आज्जी म्हणाल्या "मी या वयात आता कच्ची फळे सुद्धा 'पिकल्यावर खाईन' म्हणून घेत नाही. तीन वर्षांचा वायदा तर शक्यच नाही."

अध्यात्म-मार्गाच्या प्रवाशानीही असेच असले पाहिजे. तुम्ही कच्ची केळीसुद्धा विकत घ्यायला कचरले पाहिजे, तुम्हाला घाई असायलाच हवी! जरा सुस्तावलात की आयुष्य संपलेच म्हणून समजा! पण जर तुम्ही घाई केलीत, तर ते तितकेच लवकर साध्य होईल.

लोकांची समस्या ही आहे की त्यांना नेहमी त्यांच्या आयुष्यात काहीतरी विलक्षण, उत्तम असे घडावे अशी इच्छा असते. सध्या जे काही आहे त्याचा वैताग आला आहे, पण काही नवीन जर घडले तर त्याची त्यांना भीतीही वाटते! हे म्हणजे हँडब्रेक लावून कार चालवण्यासारखे आहे. असे करून चालत नाही. जर गाडी चालवायची असेल तर ब्रेक सोडायला हवा आणि तुम्हाला गाडी जर चालवायचीच नसेल, तर मग गाडीत चढूच नका ना!

यासाठी एक सातत्य लागते, मग प्रगतीही सातत्याने होत जाते, आणि मग काही महिन्यांत किंवा वर्षभरात तुम्हाला स्वतःमध्ये लक्षणीय फरक जाणवेल. तुम्ही सातत्य मात्र राखले पाहिजे. तुमचे अध्यात्म हे २४ तास 'ऑन' असले पाहिजे. अध्यात्म 'ऑन ' असणे म्हणजे काय? "म्हणजे मी कामावर जायचे नाही का? कुटुंबाबरोबर राहायचे नाही का?" तर तुम्ही सर्वकाही एक अध्यात्मिक प्रक्रिया बनवायचेय. लोकांशी बोलताना, ऑफिसमध्ये काम करताना, प्रत्येक कृती, तुम्ही घेत असलेला प्रत्येक श्वास; हे सर्वकाही एक आध्यात्मिक प्रक्रिया बनली पाहिजे. मग तुम्ही पाहाल की काही महिन्यांतच तुम्ही एका वेगळ्या विश्वात असाल, जिथे तुमच्या अस्तित्वाचा सुगंध सर्वांनाच आनंद देईल... फक्त लोकच नव्हे, तर इतर जीवसृष्टीसुद्धा. अगदी प्राणिमात्र आणि वनस्पतीही तुम्हाला अप्रतिम प्रतिसाद देतील. तुम्ही फक्त सातत्य राखायला हवे. तुम्ही जर 'ऑन- ऑफ' 'ऑन-ऑफ' असे करत राहिलात, तर मात्र यासाठी अनेक जन्म लागतील.

योगाचे फायदे

अनेक लोक सुरुवातीला योगाकडे वळतात कारण त्यामुळे अनेक शारीरिक फायदे होतात आणि तणाव आणि तणाव संबंधित व्याधींपासून मुक्ती मिळते. योग लोकांमध्ये सकारात्मक शारीरिक आणि मानसिक बदल घडवतो, पण हे योगाचे फक्त साईड इफेक्ट आहेत. योगाचा सगळ्यात महत्वाचा पैलू म्हणजे तो तुमच्या आयुष्याचा अनुभव इतका प्रगल्भ, विशाल आणि सर्वसमावेशक करतो की तुम्ही केवळ एका व्यक्तीपुरते सीमित न राहता एक वैश्विक प्रक्रिया बनता.

योग हे काही एक श्रद्धांचे गाठोडे, शिकवणूक किंवा तत्वज्ञान नाही. अस्तित्वाच्या एका पैलूकडून दुसऱ्या पैलूकडे, जीवनातील अनुभवाच्या एका पातळीवरून दुसऱ्या पातळीकडे कसे जाऊ शकतो याचे एक अचूक विज्ञान आणि नियोजनबद्ध आखलेले तंत्रज्ञान आहे.

योगाची गरज का आहे? तुम्ही आत्ता आहात त्याहून अधिक काहीतरी बनणे ही प्रत्येक मानवाची मूलभूत ओढ आहे. कारण तुम्ही आत्ता जिथे आहात, जरी तुम्ही शिखरावर असाल तरीही तुम्हाला आणखी काहीतरी व्हायचे आहे. तुम्ही खरोखर शोधत आहात ते काय आहे? तुम्ही स्वतःसाठी एक अनंत आणि अमर्याद विस्तार शोधत आहात. हा अमर्याद विस्तार भौतिक माध्यमांद्वारे कधीच होऊ शकत नाही. भौतिकाची परिभाषाच ही मुळात सीमा आखून केली जाते. तुमच्या शरीराच्या निश्चित सीमा आहेत. तुम्ही त्या सीमा काढून टाकल्या की कोणतीही भौतिकता उरत नाही. जर तुम्हाला अनंत, अमर्यादित्वाचा शोध घ्यायचा असेल तर ते केवळ तेव्हाच होऊ शकते जेव्हा भौतिकतेच्या पलीकडले एक परिमाण तुमच्यात जिवंत वास्तव बनेल. हा आयाम अनुभवणे हाच योगाचा खरा हेतू आहे.

जोपर्यंत तुम्ही हा मनुष्य म्हणून काय आहे याबद्दलच्या सर्व पैलूंचा ठाव न घेता होता इथे जगता, तोपर्यंत तुम्ही एक संघर्षमय आणि अत्यंत सीमित जीवन जगाल. एकदा तुम्ही मानवी शरीर आणि बुद्धिमत्तेसह या जगात आलात की तुम्ही या जीवनाने देऊ केलेल्या सर्व बाबींचा शोध घेण्यास सक्षम असता. जर ते अपूर्ण राहिले तर तुमच्यातील अस्तित्व क्षतिग्रस्त होते कारण ते केवळ मर्यादित भौतिकतेत गुरफटून जाते - भौतिकतेच्या पलीकडे असलेला तो आयाम त्याने अनुभवला नाही. हे जीवनाचे स्वरूप आहे. ज्या क्षणी तुम्ही त्यावर प्रतिबंध घालता, ते संघर्ष करते.

आज विज्ञानाची स्ट्रिंग थियरी आणि आधुनिक विज्ञान जीवनातील अकरा आयामांबद्दल बोलत आहे. योग प्रणालीमध्ये आपण आयुष्यासाठी नेहमीच २१ आयामांबद्दल बोलत असतो. आत्ता तुमच्यासाठी उपलब्ध असलेल्या फक्त तीन आयामांद्वारे तुम्ही इतके काही करू शकता, तर तुमच्याकडे २१ आयाम असते, तर तुम्हाला जीवनात प्रचंड मोकळीक असेल, नाही का? तुम्ही तुमचे आयुष्य भरपूर सहजतेने हाताळाल कारण सर्व आयाम जिवंत आहेत आणि तुमच्या अनुभवात आहेत.

संपूर्ण योग प्रक्रिया ही तुमच्यातील अनुभव भौतिकतेच्या पलीकडे नेणारा असावा या दिशेने प्रयत्नशील आहे. एकदा आपण त्याच्या संपर्कात आलो तर इथे केवळ एक सृष्टीचा अंश बनण्याऐवजी तुम्ही तुमच्या जीवनाचा निर्माता बनता.


सद््गुरू, ईशा फाऊंडेशन