गोव्याच्या राजकारणात गेल्या पंचवीस वर्षांमध्ये नेहमी सत्ता स्थापनेसाठी काँग्रेस असो वा भाजप यांच्या मदतीला आलेल्या मगो पक्षाला कुठल्याही सरकारचा कार्यकाळ संपत आला की चेव चढतो. आपण ज्या सरकारमध्ये आहोत, त्या सरकारचा पाच वर्षांचा कार्यकाळ संपत आला की मग “तुटो हे मस्तक...” भाषा सुरू होते. मुख्य पक्षासोबत दोन हात करून निवडणुकीच्या कालावधीत सत्तेतून बाहेर पडणे मगोला जास्त आवडते, किंवा मग कुठल्या ना कुठल्या कारणाने त्यांची सत्तेतून हकालपट्टी केली जाते. पण पुन्हा निवडणूक झाली की ज्याची सत्ता येते त्यांच्या पाठिंब्याला मगो सर्वांत पुढे असतो. या गोष्टीची गोव्यातील जनतेलाही जाणीव झाली आहे. सगळ्या सरकारमध्ये राहूनही मगोने स्वतःच्या वाढीकडे दुर्लक्ष केले.
फक्त निवडणूक जवळ आली की मगोला आपल्या विस्ताराची आठवण होते. त्यामागे मोठ्या राजकीय पक्षांवर दबाव आणण्याचाही मगोचा विचार असतो. पक्षाच्या विस्ताराकडे दुर्लक्ष केल्यामुळे गेल्या २५-३० वर्षांत मगोचे पारंपरिक मतदार असलेल्या अनेक मतदारसंघातून हा पक्ष पूर्णपणे मुख्य प्रवाहातून बाहेर पडला आहे. मगोच्या अनेक मतदारसंघात भाजपने आपला विस्तार केला आहे. एकेकाळी मोठा पक्ष असलेल्या मगोने भाजपसोबत युती केली होती. १९९४ मध्ये दोन्ही पक्षांच्या युतीतून मगोला १२ जागा आणि भाजपला ४ जागा मिळाल्या होत्या. पुढच्या चार-पाच वर्षांतच स्थिती बदलली आणि १९९९ च्या निवडणुकीत मगोला फक्त चार जागा मिळाल्या आणि भाजपची संख्या वाढून दहावर गेली. त्यानंतर भाजपच्या आमदारांची संख्या वाढत गेली. त्यानंतर मगोची मते घटली आणि आमदारही कमी होत गेले. मगोने काँग्रेससोबतही सत्तेत भागीदारी केली आणि गेली काही वर्षे भाजपच्या सरकारमध्येही सातत्याने आहे. पण असे असतानाही दर निवडणुकीच्या काळात मगो भाजपसोबत दोन हात करण्याची भाषा करत असतो. यावेळीही तसेच सुरू आहे.
मगोकडे सध्या दोन आमदार आहेत, एक स्वतः सुदिन ढवळीकर आणि दुसरे मांद्रेचे आमदार जीत आरोलकर. जीत आरोलकर हे मगो पक्षात राहतील याची हमी देता येणार नाही. असे असतानाही मगो पक्षाचे नेते भाजपला आव्हान देत आहेत. १९९४ ची स्थिती अवघ्या पाच वर्षांनंतर बदलली होती. पण मगोला आजही आपली ती ताकद आहे असे वाटते, हे विशेष. कधी चार तर कधी तीन तर कधी दोन आमदार असे करत करत मगोचा प्रवास सुरू आहे. मगो सोबत नसेल तरीही भाजपला मोठा फरक पडत नाही. अपक्ष किंवा अन्य पक्षांचा पर्याय भाजपकडे असतो, हे माहीत असतानाही मगो पक्षाचे नेते भाजपला दरवेळी आव्हान देतात. यावेळीही सुदिन ढवळीकर यांनी मगोला मान-सन्मान मिळाला, तरच युतीत राहणार असल्याचे म्हटले आहे. भाजपला सत्तेत येण्यासाठी मगो पक्षाची साथ आवश्यक आहे असे त्यांना वाटते. मात्र, दुसऱ्या बाजूने भाजपच्या अनेक मतदारसंघात आपण सर्वेक्षण करत असल्याचेही मगोचे नेते सांगत आहेत. मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्या मतदारसंघात आपण सर्वेक्षण करत असल्याचेही मगोने म्हटले होते. हे पाहता मगो भाजपचा आदर करत नाही, हेही स्पष्ट आहे. भाजप सरकारचे मुख्यमंत्री असलेल्या डॉ. सावंत यांनाच मगो आव्हान देत असल्यामुळे ही युती निवडणुकीपर्यंत टिकेल की यापूर्वी दोन वेळा मगोला ज्या पद्धतीने सरकारमधून बाहेर फेकले होते, तशाच पद्धतीने यावेळीही निवडणुकीपूर्वी मगोसोबतचे संबंध तोडण्याचा भाजपचा विचार आहे, ते पुढील काही दिवसांत कळेल. पण ज्या पद्धतीने दोन्ही पक्षांचे नेते एकमेकांच्या विरोधात विधाने करत आहेत ते पाहता, ही युती टिकण्याची शक्यता कमी आहे. मुख्यमंत्र्यांनीही मगोला त्याची जागा दाखवून दिली आहे. मात्र, मगो ते मान्य करायला तयार नाही. “२००८ मध्ये मुख्यमंत्री मगोच्या उमेदवारामुळेच पराभूत झाले होते,” असे म्हणून ढवळीकरांनी दोन्ही पक्षातील वाद वाढवण्याचेच काम केले आहे. भाजपला २०२७ मध्ये २१ पेक्षा जास्त जागा मिळवायच्या असतील तर मगोची साथ महत्त्वाची आहे, असे त्यांचे म्हणणे आहे. सत्तेतील सर्वाधिक मोठा पक्ष असलेल्या भाजपला मगो आव्हान देत असल्यामुळे तसेच भाजपच्या मतदारसंघात उमेदवार उतरवण्यासाठी मगोने प्रयत्न चालवल्यामुळे दोन्ही पक्ष निवडणुकीत एकत्र राहतात की पुन्हा वेगळे होतात, ते पहावे लागेल.


