कोलवा येथे ऑनलाईन जुगार अड्ड्यावर पोलिसांचा छापा; १३ लाखांच्या मुद्देमालासह तिघांना अटक

कोलवा पोलिसांनी प्रभाग क्रमांक तीनमधील एका घरावर छापा टाकून ऑनलाईन जुगार अड्ड्याचा पर्दाफाश केला. या कारवाईत तीन संशयितांना अटक करण्यात आली असून ११ लॅपटॉप आणि ३० मोबाईलसह १३ लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

Story: गोवन वार्ता | प्रतिनिधी |
11 hours ago
कोलवा येथे ऑनलाईन जुगार अड्ड्यावर पोलिसांचा छापा; १३ लाखांच्या मुद्देमालासह तिघांना अटक

मडगाव : दक्षिण गोव्यातील कोलवा येथे सुरु असलेल्या ऑनलाईन जुगार अड्ड्यावर पोलिसांनी धडक कारवाई करत मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश केला आहे. कोलवा पोलीस ठाण्याच्या पथकाने प्रभाग क्रमांक तीनमधील एका घरावर अचानक छापा टाकून ऑनलाईन सट्टेबाजी आणि जुगाराचे खेळ चालवणाऱ्या तीन संशयितांना रंगेहाथ पकडले. या धडक कारवाईत पोलिसांनी जुगारासाठी वापरण्यात येणारे संगणकीय साहित्य, लॅपटॉप आणि मोबाईलसह सुमारे १३ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.

पोलीस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, कोलवा येथील एका निवासी इमारतीतून संगणक आणि इंटरनेटच्या साहाय्याने ऑनलाईन बेटिंग तसेच जुगाराचे अवैध खेळ चालवले जात असल्याची गुप्त बातमी पोलिसांना मिळाली होती. या बातमीची शहानिशा केल्यानंतर कोलवा पोलीस ठाण्याच्या पथकाने रणनीती आखून संबंधित घरावर छापा टाकला. पोलीस पथकाने अचानक केलेल्या या कारवाईमुळे ऑनलाईन सट्टेबाजी चालवणाऱ्यांचे धाबे दणाणले. पोलिसांनी घटनास्थळावरून जितेंद्रसिंह चौहान (वय २४), नरेंद्रसिंह राठोड (वय २५) आणि राहुल पटेल (वय ३३) या तीन आरोपींना ताब्यात घेतले.

छाप्यादरम्यान पोलिसांनी संशयितांच्या ताब्यातून ११ अत्याधुनिक लॅपटॉप, ३० महागडे मोबाईल फोन आणि ऑनलाईन जुगाराच्या व्यवहारासाठी वापरले जाणारे अन्य डिजिटल साहित्य जप्त केले. आरोपी संगणकीय प्रणालीच्या माध्यमातून विविध खेळ आणि ऑनलाईन बेटिंग स्वीकारून मोठा आर्थिक व्यवहार करत असल्याचे तपासात उघड झाले आहे. या ऑनलाईन जुगार अड्ड्याचे जाळे इतर राज्यांपर्यंत पसरले आहे का आणि यामध्ये आणखी कोणाचा सहभाग आहे का, या दृष्टीने कोलवा पोलीस आरोपींची कसून चौकशी करत असून या प्रकरणी अधिक तपास सुरू आहे.


हेही वाचा
सर्व पहा