पणजी :: राज्यात नवीन मासेमारी हंगाम नुकताच सुरू झालेला असतानाच गोव्यात रोजगारासाठी हैद्राबादहून येणाऱ्या मच्छिमार कामगारांच्या बसला केरी-सत्तरी येथील तपासणी नाक्यावर (चेकपोस्ट) वाळपई पोलीस स्थानकाशी संलग्न चोर्ला घाटात पेट्रोलिंग करणाऱ्या एका पोलीस कर्मचाऱ्याने रोखून धरल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. मालीम जेटीकडे कामासाठी जाणाऱ्या या कामगारांची कागदपत्र पडताळणीच्या नावाखाली अडवणूक करण्यात आल्याचा गंभीर आरोप होत आहे. तसेच, या सर्व कामगारांना गोव्यात प्रवेश करू देण्यासाठी चक्क २५ हजार रुपयांच्या लाचेची मागणी केल्याचा खळबळजनक आरोप पणजीतील एका ट्रॉलर मालकाने केला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, मासेमारीचा नवा हंगाम सुरू झाल्यामुळे राज्याबाहेरून मोठ्या संख्येने कामगार गोव्यात दाखल होत आहेत. मालीम जेटीवर कामावर रुजू होण्यासाठी एका बसमधून प्रवास करणाऱ्या कामगारांना सत्तरी तालुक्यातील केरी चेकपोस्टवर पोलिसांनी थांबवले. पडताळणीच्या नावाखाली या कामगारांना तासनतास रोखून धरण्यात आले असून, पैशांची मागणी पूर्ण झाल्याशिवाय पुढे जाऊ दिले जाणार नाही, असा पवित्रा पोलिसांनी घेतल्याचा दावा करण्यात येत आहे. पोलिसांच्या या अवाजवी मागणीमुळे आणि लाच न दिल्यामुळे हे सर्व कामगार अजूनही केरी चेकपोस्टवरच ताटकळत पडलेले आहेत.
या संपूर्ण प्रकारावर संबंधित ट्रॉलर मालकाने तीव्र संताप व्यक्त करत आपली व्यथा मांडली आहे. कोणत्याही वैध कारणाशिवाय आणि सर्व कागदपत्रे असतानाही कामगारांना नाक्यावर अडवून ठेवले जात असून, त्यांच्यावर विनाकारण मानसिक दबाव आणला जात असल्याचे त्यांनी म्हटले आहे. मासेमारीचा महत्त्वाचा काळ सुरू असताना कामगारांना अशा प्रकारे अडवून ठेवल्याने ट्रॉलर व्यावसायिकांचे मोठे आर्थिक नुकसान होत आहे. पोलीस खात्यातील एका वरिष्ठ अधिकाऱ्यानेच २५ हजारांच्या लाचेची मागणी केल्याचा आरोप झाल्यामुळे पोलीस प्रशासनाच्या पारदर्शकतेवर गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले असून, या प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी करण्याची मागणी जोर धरत आहे. सध्या हा वाद चिघळण्याची चिन्हे आहेत.
बातमी अपडेट होत आहे.


