विक्रांत... हे नाव उच्चारताच परिसरातील प्रत्येक माणसाच्या चेहऱ्यावर एक आदरयुक्त आणि आपुलकीचे हसू उमटायचे. कोणाच्या घरात मध्यरात्री मेडिकल इमर्जन्सी असो, कुणाचा अचानक अपघात झालेला असो किंवा कोणालाही कसलीही मदत हवी असो; स्वतःचे काम बाजूला ठेवून धावून जाणारा पहिला माणूस म्हणजे विक्रांत. स्वभावाने अत्यंत मनमिळावू, कष्टाळू आणि सगळ्यांचा लाडका. घरात वृद्ध आई-वडील, जीवापाड प्रेम करणारी पत्नी आणि दीड वर्षांचा चिमुकला मुलगा... अगदी हसतं-खेळतं आणि सुखी कुटुंब होतं.
पण या सुंदर आणि समृद्ध आयुष्यावर हळूहळू एका न दिसणाऱ्या शत्रूची काळी सावली पडू लागली होती. तो शत्रू होता अल्कोहोल, म्हणजेच दारू!
सुरुवातीला केवळ मित्रांच्या हट्टाखातर, ‘कधीतरी गम्मत म्हणून’ सुरू झालेला हा प्रकार हळूहळू विक्रांतच्या नकळत त्याच्या सवयीचा भाग बनला. आई-वडील, बायको आणि निष्पाप मुलाच्या नजरा चुकवून गुपचूप दारू पिण्याचे प्रमाण वाढत गेले. दिवसाची सुरुवात आणि रात्रीचा शेवट दारूशिवाय होईनासा झाला. शरीरावर त्याचा विपरीत परिणाम दिसू लागला होता. सतत पोटात तीव्र वेदना होणे, शरीरावर सूज येणे, तळहाताची आग होणे आणि नेहमी थकवा जाणवणे… शरीर आतून धोक्याची घंटा वाजवत होते. पण विक्रांतने या लक्षणांकडे दुर्लक्ष केले आणि कोणालाही काही सांगू दिले नाही.
एक दिवस अचानक वेदनांचा डोंगर कोसळला. प्रचंड वेदनेने विक्रांत तळमळू लागला आणि शेवटी त्याला घाईघाईने हॉस्पिटलमध्ये दाखल करावे लागले. गंभीर अवस्था पाहून डॉक्टरांनी पहिलाच प्रश्न विचारला, “हा अल्कोहोल घेतो का?” बायकोने अश्रू ढाळत होकार दिला.
काही वेळातच सर्व रिपोर्ट्स आले आणि ते पाहून डॉक्टरांसह कुटुंबाचेही डोळे फाटले. दारूच्या अतिसेवनामुळे स्वादुपिंड तब्बल ७० टक्के निक्रोसिस (पूर्णपणे सडणे) झाले होते. लिव्हरवर गंभीर परिणाम झाला होता, रक्तदाब पार खालावला होता आणि शरीरात भीषण सेप्टिक शॉक पसरला होता. डॉक्टरांनी त्याला वाचवण्यासाठी रात्रंदिवस एक केला. १५ लाख रुपयांचे कर्ज काढून उपचारांची पराकाष्ठा केली गेली. ऑक्सिजन, नवनवीन इंजेक्शन्स, डायलिसिसचे फेरे… सर्व काही सुरू होते. पण दारूने आतून जे अतोनात नुकसान केले होते, ते भरून काढणे वैद्यकीय शास्त्रालाही शक्य नव्हते. आयुष्याची लढाई लढता लढता, एका दुर्दैवी रात्री विक्रांतने जगाचा कायमचा निरोप घेतला.
दुसऱ्या दिवशी सकाळी जेव्हा विक्रांतचा मृतदेह घरात आणला गेला, तेव्हा तिथे उभे राहिलेले दृश्य कोणाच्याही कठोर हृदयाचे पाणी करेल असे होते. संपूर्ण घरात सन्नाटा आणि हुंदक्यांचा आवाज होता. पण या सगळ्यापासून अनभिज्ञ असलेला त्याचा दीड वर्षाचा छोटा मुलगा आईचा पदर धरून निष्पाप नजरेने विचारत होता, “आई, बाबा कधी उठणार ग? ते असे शांत का झोपले आहेत? महिनाभर मी त्यांना भेटलोच नाहीये. चल ना, बाबांना उठव, मला त्यांच्याशी बोलायचंय!”
आईकडे या प्रश्नाचे कोणतेही उत्तर नव्हते. ती फक्त त्या चिमुकल्याला छातीशी कवटाळून धाय मोकलून रडत होती. आजी-आजोबा सुन्न होऊन कोपऱ्यात बसले होते. आजूबाजूला जमलेल्या नातेवाईक आणि शेजाऱ्यांच्या डोळ्यांतून अश्रूंच्या धारा वाहत होत्या. कोणालाही त्या चिमुकल्याला सत्य सांगण्याची हिम्मत होत नव्हती. तो मुलगा आपल्या चिमुकल्या हातांनी आईचे अश्रू पुसत पुन्हा हळूच बाबांच्या अंगावर हात ठेवून त्यांना हाक मारत होता. पण त्याला काय माहिती, की त्याचे बाबा अबोल निद्रेत निघून गेले आहेत, जिथून ते कधीच परत येणार नाहीत.
विक्रांत फक्त एक तरुण नव्हता; तो एका कुटुंबाचा आधार होता, आई-वडिलांच्या म्हातारपणाची काठी होता, एका स्त्रीचे कुंकू होता आणि एका बालकाचे संपूर्ण जग होता. अल्कोहोलच्या एका वाईट सवयीने क्षणात एका हसत्या-खेळत्या कुटुंबाचा संसार धुळीस मिळवला.
“थोडंसं प्यायल्याने काय होतं?” किंवा “मला काही होत नाही” असा विचार करत दारूच्या आहारी जाणाऱ्या प्रत्येक तरुणासाठी विक्रांतची कहाणी ही एक गंभीर चेतावणी आहे. दारू ही फक्त शरीराचा एक-एक अवयव निकामी करत नाही, तर ती पाठीमागे राहणाऱ्या माणसांचे संपूर्ण आयुष्य उद्ध्वस्त करते.
आज तो निष्पाप मुलगा अजूनही दरवाजाकडे पाहत बाबांची वाट पाहत आहे. पण विक्रांत आता कधीच परत येणार नाही. ही गोष्ट फक्त वाचून विसरण्यासाठी नाही, तर वेळीच सावध होण्यासाठी आहे. व्यसनाच्या विळख्यात अडकण्यापूर्वी स्वतःचा आणि कुटुंबाचा विचार करा. वेळेवर थांबा, नाहीतर उद्या तुमच्याही घरात एखादा निष्पाप जीव विचारेल, “आई, बाबा कधी उठणार?”... आणि त्या प्रश्नाचे उत्तर द्यायला तुमच्याकडे शब्द उरणार नाहीत.

- डॉ. अनिकेत आनंदकुमार मयेकर


