लग्न करेन तर खोडकाशीच! - भाग १

एका स्त्रीलंपट राजाच्या कुदृष्टीपासून स्वतःच्या लेकीचा बचाव करण्यासाठी एका दुःखी आईची धडपड आणि लाकडी खोडकात लपून अनोळखी प्रवासाला निघालेल्या राजकन्येची ही एक अनोखी अन् थरारक कथा!

Story: भरजरी |
01st August, 11:11 pm
लग्न करेन तर खोडकाशीच! - भाग १

गिरजा नदीच्या काठी एक मोठे नगर होते. त्या नगराचा एक राजा होता. तो राजा थोडा स्त्रीलंपट होता. कुठलीही सुंदर स्त्री पाहिली की त्याला त्या स्त्रीला आपली पट्टराणी बनवावेसे वाटत असे. त्याच्या या सवयीमुळे राजाची धर्मपत्नी खूप निराश व्हायची. तिने कित्येकदा राजाला समजावून सांगितले. पण राजावर कोणताच परिणाम होत नसे. तो नेहमी नवनवीन स्त्रियांच्या शोधात असायचा. एखादी स्त्री आवडल्यावर लगेच तिला आपली बायको बनवून महालात आणायचा.

या राजाला एक मुलगी होती. राजाचा स्त्रीलंपटपणा माहीत असल्यामुळे राणीने राजापासून आपल्या या मुलीला लपवून ठेवले होते. दिसामासाप्रमाणे मुलगी वाढू लागली. जसजशी ती वाढत होती तसतसे तिचे सौंदर्य अधिक खुलत होते. बघता बघता मुलगी उपवर झाली. पण अजून ती आपल्या पित्याच्या दृष्टीस पडली नव्हती.

एके दिवशी ती आपल्या सखींसह राजतळ्यावर जलक्रीडा करण्यासाठी गेली होती. आपल्या सखींसह ती जलक्रीडा करण्यात मग्न होती. तेवढ्यात राजाचा रथ तिथे आला. राजतळ्यावर खेळणाऱ्या या मुलीचा आवाज राजाच्या कानावर पडला. राजाने पाहिले, एक अत्यंत सुंदर आणि तरुण स्त्री पाण्याच्या मध्यभागी पाण्यात मनसोक्त खेळत आहे. ती स्त्री राजाला प्रचंड आवडली. आपल्या भावनांवर कोणतेही नियंत्रण नसलेला राजा सरळ रथातून पायउतार झाला. थेट तळ्याकडे गेला. अचानक राजतळ्यावर राजा आल्याचे पाहताच सर्व सख्यांची पांगापांग झाली. पण गोंधळून गेलेली राजकन्या तिथेच राहिली. तिला पाहताच भावनाविवश राजा तिला उद्देशून म्हणाला,

“हे रूपसुंदरी, तुझे हे रूप पाहून मी मोहित झालो आहे. तुला माझी पट्टराणी बनवण्याची माझी इच्छा आहे. माझ्या या मागणीचा स्वीकार कर.”

इतके दिवस आपल्या वडिलांचे दुरून दर्शन घेत असलेल्या राजकन्येसमोर अचानक वडील समोर दिसताच ती प्रथम गोंधळून गेली. पण वडिलांची ही विचित्र मागणी ऐकताच ती भानावर आली. त्वरित पाठ फिरवून ती तळ्यातील पाण्यात दिसेनाशी झाली.

राजतळ्यामधून भुयारी मार्गाने राजकन्या आपल्या महालात आली. आपल्याच वडिलांनी आपल्याला मागणी घालावी यापेक्षा कानात कुणी उकळते तेल ओतले असते तरी चालले असते असे तिला वाटत होते. पलंगावर पडून राजकन्या ओक्साबोक्शी रडत होती. इतक्यात राणी तिथे आली. आपल्या मुलीला ओक्साबोक्शी रडत असलेली पाहून राणी कळवळली.

“बाळा, काय झालं? अशी रडत का आहेस?”

तळ्याकाठी घडलेली घटना आईला कथन करून ती म्हणाली, “आई, बाबांनी मलाच लग्नाची मागणी घातली.”

हे ऐकताच राणीच्या काळजाचा ठोका चुकला. “इतके दिवस ज्या भीतीने आपण आपल्या मुलीला राजाच्या नजरेपासून लपवून ठेवले होते, तीच भीती आज खरी झाली होती. अपघाताने का होईना राजाची मुलगी राजासमोर आली आणि राजाला तिच्याशी लग्न करण्याची इच्छाही झाली. पण हे तर पाप आहे. आणि आई म्हणून मी हे पाप होऊ देणार नाही,” राणीने विचार केला. राजाला समजावून सांगण्यात काही अर्थ नव्हता हे राणी चांगलीच जाणून होती. त्यामुळे आता तिलाच काहीतरी करण्याची गरज होती.

राणीने रात्रभर विचार केला. पहाटे उठून राणी सुताराच्या घरी गेली. त्या नगरातला तो सुतार फार कुशल होता. प्रत्येक गोष्ट हुबेहूब करायचा. लाकडाची बाहुलीसुद्धा अगदी माणसासारखी दिसायची. त्याची महती राणी जाणून होती. पहाटेच्या पहिल्याच प्रहराला राणीला आपल्या दारी बघून सुतार गोंधळून गेला. राणीने सुताराला सांगितले, “मला लाकडाचे असे एक खोडूक बनवून दे ज्यामध्ये मी व्यवस्थित उभी राहू शकेन.” आपल्या कामात तरबेज असलेल्या सुताराने लगेच राणीची ही मागणी मान्य केली. प्रत्यक्ष राणीच आपल्या दारी खोडूक तयार करण्यासाठी आली असेल तर कोण तिची मागणी अमान्य करेल? सुताराने आपली सगळी कला पणाला लावली आणि माणसासारखे हुबेहूब एक खोडूक तयार केले.

ते खोडूक पूर्ण लाकडाचे होते, तरीही आतून हवेशीर होते. आत असलेल्या माणसाला आरामात उभे राहता येत असे, तसेच पाय दुमडून बसताही येत असे. आत असलेल्या माणसाला बाहेरचे व्यवस्थित दिसायचे, पण बाहेरून कोणी बघितले तर कोणालाही आतमध्ये माणूस असल्याची कल्पनाही येत नसे. खोडकाला खालून चक्रे होती. त्याचा चाप आतमध्ये होता. तो चाप ओढताच खोडूक आपोआप चालू लागायचे. असा माणसाचा साचा असणारे खोडूक सुताराने एका दिवसात पूर्ण केले आणि खोडूक तयार असल्याचा निरोप राणीला पोहोचवला.

राणीने आपल्या खासगी सैनिकांमार्फत ते खोडूक भुयारी मार्गातून आपल्या महालात आणून घेतले. मध्यरात्र होताच राणीने आपल्या मुलीला त्या खोडकामध्ये बसवले. एकदा डोळे भरून आपल्या मुलीला पाहून घेतले आणि राणी म्हणाली, “बाळा, तू तुझ्या वडिलांना चुकीचे समजू नकोस. त्यांना प्रत्येक सुंदर स्त्री आवडते. तू जन्मापासूनच रूपसुंदर होतीस. त्यांची ही कमजोरी मला माहीत होती. त्यामुळे मी तुला सदैव त्यांच्या नजरेआड ठेवले. आज अचानक त्यांनी तुला तरुण झालेले पाहिले. त्यांच्या ध्यानीमनीही नाही की आपण ज्या मुलीला मागणी घालत आहोत ती आपली पोटची पोर आहे. त्यांना जरी माहीत नसले, तरी मला माहीत असूनही मी हे पाप होऊ देऊ शकत नाही. शिवाय मी तुझ्या वडिलांना विरोध करावा एवढी माझी ऐपत नाही. त्यामुळे बाळा, तू हे नगर सोडून दुसऱ्या नगरात जावेस अशी माझी इच्छा आहे. आपल्या नगराशेजारी असलेल्या त्या नगराचा राजा मोठा दयाळू आहे. तू या खोडकात लपून त्याच्या नगरात जा. नगराच्या वेशीवरच राजतळे आहे, त्या तळ्याशेजारी तू तुझे बस्तान मांड. कधी ना कधी राजाचा कोणीतरी माणूस तिथे नक्की येईल आणि तुला या खोडकातून बाहेर काढेल. तुझ्या नशिबावर आणि देवावर विश्वास ठेव. या खोडकाच्या आत तुला वर्षभर पुरेल एवढे अन्नधान्य आणि कपडेलत्ते मी ठेवले आहेत. त्यामुळे तुझी कोणतीही गैरसोय होणार नाही. फक्त एवढीच इच्छा की देव करो आणि तुला या खोडकामधून लवकरात लवकर सुटका मिळो.”

जड अंतःकरणाने राणीने खोडकाचे दार लावून घेतले. मध्यरात्र असल्याकारणाने पहारेदार डुलक्या घेत होते. ही संधी साधून आपल्या खास सैनिकांसह राणी त्या खोडकासमवेत निघाली. अगदी गुपचूप खोडूक, राणी आणि तिचे खास सैनिक असा हा लवाजमा राज्याच्या वेशीजवळ पोहोचला. वेशीजवळ पोहोचताच राणीने पुन्हा एकदा आपल्या मुलीला कडकडून मिठी मारली. खोडकाच्या आतील चाप कसा वापरायचा हे तिला पुन्हा एकदा व्यवस्थित सांगितले. अशा प्रकारे राणीने आपल्या मुलीला, प्रत्यक्ष राजकन्येला तिच्या नशिबावर सोपवून दुसऱ्या राज्याच्या वेशीच्या आत ढकलले. आता राजकन्या खोडकाचा चाप ओढत पुढे जाऊ लागली.

नशिबावर विश्वास ठेवून निघालेल्या या राजकन्येच्या आयुष्यात पुढे काय होते, हे पुढच्या भागात पाहूया.


- गाैतमी चाेर्लेकर गावस