सीबीटी - II : अनाकलनीय प्रश्नांची तयारी ठेवावी

​शासकीय पदभरतीसाठी आगामी सीबीटी - II परीक्षेची काठिण्यपातळी वाढण्याची शक्यता आहे. मर्यादित जागा आणि जास्त उमेदवारांमुळे एलिमिनेशनसाठी प्रश्न अनाकलनीय असू शकतात; म्हणूनच विद्यार्थ्यांनी सर्व विषयांचा सखोल आणि योग्य सराव ठेवावा.

Story: यशस्वी भव: |
01st August, 11:08 pm
सीबीटी - II : अनाकलनीय  प्रश्नांची तयारी ठेवावी

नु​कत्याच सीबीटी - I (CBT-I) आणि सीबीआरटी - I (CBRT-I) च्या अनेकविध शासकीय पदांसाठी परीक्षा घेण्यात आल्या. साधारणपणे नोव्हेंबर २०२५ पासून या अशा परीक्षा घेतल्या जात आहेत. यामध्ये अगदी जेएसओ (JSO) पासून कॉन्स्टेबलपर्यंतच्या परीक्षांचा अंतर्भाव आहे. गोवा पब्लिक सर्व्हिस कमिशन (GPSC) तसेच गोवा स्टाफ सिलेक्शन कमिशन (GSSC) तर्फे आतापर्यंत ४० पेक्षा जास्त पदांसाठी किमान दहा हजारांपेक्षा जास्त विद्यार्थी बसले असावेत. कदाचित हा आकडा यापेक्षाही खूप जास्त असू शकतो. ४० पदांसाठी कदाचित २००० ते २५०० उमेदवार भरले जाणार आहेत. तसेच नवीन माहितीनुसार, अजून २५०० उमेदवार भरले जाणार आहेत. निवडणुकीपूर्वी या परीक्षा होण्याची आणि पदे भरली जाण्याची जास्त शक्यता आहे.

परीक्षांचा अभ्यासक्रम बघता कोकणी, अंकगणित (न्यूमेरिकल), रिझनिंग आणि इंग्रजी या विषयांवर प्रश्न आले होते. सर्व प्रश्न साधारणपणे १५ ते २० असे प्रत्येक कॅटेगरीसाठी विचारले गेले. न्यूमेरिकलसाठी ट्रेन, वर्क अँड टाईम, सिलॉजिझम, कोडिंग - डीकोडिंग, क्लॉक असे प्रश्न रिझनिंगसाठी विचारले होते. कोकणी भाषेसाठी म्हणी व वाक्प्रचार, तर इंग्रजी भाषेसाठी व्याकरण, निबंध आणि म्हणी व वाक्प्रचार यांवर प्रश्न होते. असेही आता लक्षात यायला लागले आहे की, नोव्हेंबरपासून सुरू झालेल्या प्रश्नांचे स्वरूप हळूहळू कठीण होत गेलेले आहे. जी काठिण्यपातळी असायला हवी होती, त्यापेक्षा कठीण प्रश्न सीबीटी - I परीक्षेत विचारले गेले आहेत, असे अनेक विद्यार्थ्यांनी निदर्शनास आणून दिले आहे. त्यामुळे सीबीटी - II परीक्षेची काठिण्यपातळी नक्कीच वेगळी असणार आहे, याचे भान आता विद्यार्थ्यांनी ठेवणे गरजेचे आहे.

न्यूमेरिकल या विषयामध्ये एकूण ५० पेक्षा जास्त प्रश्नपद्धती आहेत. या सर्व पद्धती शिकून घेणे आता आवश्यक आहे; कारण ५० पैकी २० प्रश्नपद्धतींचे प्रश्न येऊन गेलेले आहेत. त्यामुळे कदाचित उरलेल्या ३० प्रकारच्या प्रश्नांकडे लक्ष देणे गरजेचे आहे. तोच प्रकार रिझनिंगमध्येही लागू होतो; यात साधारणपणे ७० ते ८० वेगवेगळ्या प्रकारचे प्रश्न आहेत. त्यामुळे त्यातील इतर प्रश्नांकडेही विशेष लक्ष द्यावे लागेल.

सिटींग अरेंजमेंट, डायरेक्शन, ब्लड रिलेशनशिप, प्रॉफिट अँड लॉस, मिसिंग नंबर, कॉज अँड इफेक्ट, स्टेटमेंट अँड अझम्प्शन, तसेच गोवा हिस्ट्री आणि जिओग्राफी यावर फोकस करणे गरजेचे आहे, कारण यावर आता प्रश्न येणार आहेत. यात कोकणी विषय असणार नाही. काहींना डेटा इंटरप्रिटेशन, प्रोबॅबिलिटी, स्टॅटिस्टिक्स यावरही प्रश्न विचारले जाणार आहेत.

'एक्सपेक्ट द अनएक्सपेक्टेड' (Expect the Unexpected) या उक्तीनुसार सीबीटी - II चा पेपर निघू शकतो. कारण जागा (पोस्ट) कमी आणि उमेदवार अतिशय जास्त असल्यामुळे 'इलिमिनेशन' (गाळण) करण्यासाठी पेपर अनाकलनीय असू शकतो. विद्यार्थ्यांनी बँकिंग, रेल्वे तसेच केंद्रीय स्टाफ सिलेक्शनच्या (SSC) जुन्या प्रश्नपत्रिका अभ्यासून घ्याव्यात. या परीक्षांमध्ये काठिण्यपातळी जरा जास्त असते आणि वेगवेगळ्या प्रकारचे प्रश्न सामोरे येतात. रिझनिंग आणि न्यूमेरिकलच्या अनेक नवीन प्रश्नांचे संच इंटरनेटवर उपलब्ध आहेत. योग्य तज्ञांकडून ते सोडवण्यासाठी मार्गदर्शन घ्यावे. सीबीटी - II आणि सीबीआरटी - II परीक्षा कदाचित वेगळ्या पद्धतीच्या असतील यात शंका नाही.


- अॅड. शैलेश कुलकर्णी, कुर्टी - फोंडा, (लेखक नामांकित वकील आणि करिअर समुपदेशक आहेत.)