अोडिशा राज्याच्या प्रवासादरम्यान मला आशियातील सर्वात मोठ्या खाऱ्या-गोड्या पाण्याच्या सरोवराला, म्हणजेच चिलिका सरोवराला भेट देण्याची संधी मिळाली. प्रत्यक्ष अनुभवातून या सरोवराचे निसर्गवैभव, जैवविविधता आणि पर्यावरणीय महत्त्व जवळून पाहता आले. चिलिका सरोवर हे ओडिशाच्या पूर्व किनारपट्टीवर वसलेले असून आशियातील सर्वात मोठे खाऱ्या-गोड्या पाण्याचे सरोवर म्हणून ओळखले जाते. बंगालच्या उपसागराशी असलेल्या नैसर्गिक संपर्कामुळे येथे समुद्रातील खारे पाणी आणि नद्यांचे गोडे पाणी एकत्र मिसळते. या वैशिष्ट्यपूर्ण परिसंस्थेमुळे येथे अत्यंत समृद्ध जैवविविधता विकसित झाली असून या सरोवराला 'रामसर' स्थळाचा दर्जा प्राप्त झाला आहे.
चिलिका सरोवर हे असंख्य वनस्पती, जलचर, पक्षी आणि प्राण्यांचा सुरक्षित अधिवास आहे. येथे सुमारे ७०० हून अधिक वनस्पतींच्या प्रजाती, २२५ पेक्षा अधिक माशांच्या प्रजाती तसेच विविध प्रकारचे कोळंबी, खेकडे, शिंपले आणि इतर जलचर जीव आढळतात. सरोवर परिसरात जलवनस्पती, गवताळ प्रदेश, दलदलीतील वनस्पती आणि काही ठिकाणी खारफुटीची जंगलेही पाहायला मिळतात.
चिलिका सरोवराची खरी ओळख म्हणजे येथील समृद्ध पक्षीजीवन. येथे दरवर्षी हिवाळ्यात सायबेरिया, रशिया, मंगोलिया, चीन, मध्य आशिया आणि हिमालयीन भागांतून लाखो पक्षी स्थलांतर करून येतात. रोहित (फ्लेमिंगो), पट्टकादंब (बार-हेडेड गूज), ब्राह्मणी बदक (ब्राह्मिनी डक), सरगे बदक (नॉर्दर्न पिंटेल), गढवाल (गॅडवॉल), परी बदक (नॉर्दर्न शोव्हेलर), पाणकोळी (पेलिकन), कुडावळ (एव्होसेट), करकोचा (स्टॉर्क) तसेच विविध प्रकारचे बगळे (हेरॉन आणि इग्रेट) येथे मोठ्या प्रमाणात पाहायला मिळतात. त्यामुळे हिवाळ्यात संपूर्ण परिसर पक्ष्यांच्या किलबिलाटाने गजबजून जातो. त्यामुळे चिलिका हे पक्षीनिरीक्षकांसाठी स्वर्ग मानले जाते.
या सरोवराचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे येथे आढळणारे दुर्मिळ आणि संकटग्रस्त 'इरावडी डॉल्फिन'. जगातील मोजक्या खाऱ्या-गोड्या पाण्याच्या परिसंस्थांमध्ये आढळणाऱ्या हे डॉल्फिन चिलिका सरोवरात विशेषतः सातपाडा परिसरात पाहायला मिळतात.
माझ्या ओडिशा प्रवासादरम्यान मी सातपाडा येथून बोटीने चिलिका सरोवरात फेरफटका मारला. इतर समुद्री डॉल्फिनच्या तुलनेत त्यांची चोच लहान आणि डोके गोलाकार असते. इरावडी डॉल्फिन सहसा लहान कळपांमध्ये वावरतात आणि पाण्याच्या पृष्ठभागावर येऊन श्वास घेताना किंवा उड्या मारताना त्यांचे दर्शन घडते असे आमच्या मागदर्शकाने आम्हाला सांगितले. दुर्बिणीतून पाहिले असता आम्हाला ते स्पष्ट पहाता आले. याशिवाय येथे विविध प्रकारचे कासव, साप आणि असंख्य सूक्ष्म जलजीवही आढळतात. गोव्यातील किनारपट्टी भागांप्रमाणेच चिलिका सरोवराच्या आसपासचा किनारी प्रदेश ऑलिव्ह रिडले समुद्री कासवांच्या संवर्धनासाठी राखून ठेवला आहे.
सरोवरातून पुढे गेल्यावर बंगालच्या उपसागराचा विस्तीर्ण समुद्रकिनारा पाहायला मिळतो. पुढे जाऊन आम्ही चिलिका सरोवर आणि बंगालच्या उपसागराला विभक्त करणाऱ्या वालुकामय पट्ट्यावर उतरलो. एका बाजूला शांत चिलिका सरोवर आणि दुसऱ्या बाजूला बंगालच्या उपसागराच्या उंच लाटा असे निसर्गाचे अद्भुत रूप येथे अनुभवता आले. या परिसरात विविध प्रकारचे पक्षी, खेकडे, कीटक आणि किनारी वनस्पती आढळतात. निसर्गाच्या सान्निध्यात काही वेळ समुद्रकिनाऱ्यावर फेरफटका मारताना, लाटांचा आवाज ऐकताना आणि समोर उडणारे पक्षी पाहताना एक वेगळाच आनंद अनुभवता येतो.
चिलिका सरोवर पूर नियंत्रण, भूजल पुनर्भरण, किनारपट्टीचे संरक्षण, मत्स्यसंपत्तीचे संवर्धन आणि जैवविविधतेचे संरक्षण यासाठी महत्त्वपूर्ण भूमिका बजावते. हजारो स्थानिक कुटुंबांच्या उपजीविकेचा आधारही हे सरोवर आहे. तथापि, गाळ साचणे, प्रदूषण, अनियंत्रित कोळंबीपालन, अतिक्रमण आणि वाढते पर्यटन यांमुळे या परिसंस्थेवर ताण निर्माण झाला आहे.
चिलिका सरोवर हे केवळ ओडिशाचेच नव्हे तर संपूर्ण भारताचे एक अमूल्य नैसर्गिक वैभव आहे. सरोवर, समुद्र आणि किनारी जैवविविधता यांचा सुंदर संगम या ठिकाणी पाहायला मिळतो.
समृद्ध जैवविविधता, स्थलांतरित पक्ष्यांचे आगमन, इरावडी डॉल्फिनचा अधिवास आणि रमणीय निसर्ग यांमुळे या सरोवराला राष्ट्रीय तसेच आंतरराष्ट्रीय स्तरावर विशेष स्थान प्राप्त झाले आहे. प्रत्यक्ष भेटीदरम्यान अनुभवलेले त्याचे सौंदर्य आणि पर्यावरणीय महत्त्व आजही मनात कायम आहे.

- स्त्रिग्धरा नाईक (लेखिका विद्युत अभियांत्रिकीच्या प्राध्यापिका आहेत.)


