बेदरकार वाहनचालकांवर कारवाई हवीच

राज्यात सर्व महत्त्वाच्या ठिकाणी एआय कॅमेरे बसवायला हवेत. मात्र ते कायमस्वरूपी चालतील यासाठी त्यांची नियमित देखभाल व्हायला हवी; ते मध्यंतरी नादुरुस्त झाले किंवा बंद पडले तर त्याचा काहीही उपयोग होणार नाही. एआय कॅमेरे हा बेदरकार वाहनचालकांना जरब बसविण्याचा एक उत्तम उपाय आहे.

Story: कॉलिंग अटेंशन |
01st August, 11:16 pm
बेदरकार वाहनचालकांवर कारवाई हवीच

​निसर्गसौंदर्याने नटलेला आमचा छोटासा गोवा आता शांत राहिलेला नाही. चोऱ्या, दरोडे, खूनांसह राजरोसपणे सर्व गुन्हे घडत आहेत. शांततेबरोबरच गोवा आता सुरक्षितही राहिलेला नाही. अपघातांचे प्रमाण पाहिले तर वाहन चालविणे हे आता जोखमीचे बनले आहे. दररोज कुठे ना कुठे अपघात घडतो आणि एखाद्या निरपराधाचा जीव जातो.

गोव्यात वाहनांची संख्या जसजशी वाढत आहे, तसतसे अपघातांचे प्रमाणही वाढत आहे. ज्या प्रमाणात वाहनांचा आकडा वाढलेला आहे, त्या प्रमाणात रस्त्यांचे जाळे वाढलेले नाही. यामुळे वाहतुकीची कोंडी होणे आणि अपघात घडणे हे प्रकार नित्याचेच झाले आहेत. अपघात शंभर टक्के रोखणे अशक्य असले तरी त्यांचे प्रमाण घटणे अत्यंत आवश्यक आहे. अपघात घडत राहिले तर निष्पाप नागरिकांचे हकनाक बळी जात राहतील; यामुळे राज्यातील वाहतूक असुरक्षित बनेल आणि राज्याच्या प्रतिमेबरोबर पर्यटनालाही याचा मोठा फटका बसणार आहे. यासाठी अपघातांवर नियंत्रण ठेवणे ही काळाची गरज आहे.

अपघातांवर नियंत्रण ठेवण्यासाठी बरेच उपाय करण्यात आले आहेत आणि नवीन उपाय होतही आहेत; पण या उपायांमध्ये सातत्य नाही. एखादा अपघात झाला की उपाययोजनांची चर्चा होते आणि वाहतूक नियमांच्या अंमलबजावणीला वेग येतो. कालांतराने अंमलबजावणीत शिथिलता येते व काही महिन्यांनी सर्व गोष्टी विस्मृतीत जातात. वेगावर नियंत्रण राहावे यासाठी मोक्याच्या ठिकाणी गतिरोधक बसविले जातात; मात्र बऱ्याच ठिकाणी चुकीच्या पद्धतीने गतिरोधक बसविण्यात आले आहेत. काही गतिरोधक सदोष आहेत आणि अशा गतिरोधकांमुळेच अपघात घडलेले आहेत. त्यामुळे सर्व गतिरोधकांचे ऑडिटिंग व्हायला हवे. गतिरोधक दुरून दिसेल अशा पद्धतीने त्यावर रंगकाम करायला हवे. बऱ्याच गतिरोधकांवरील रंग उडालेला आहे, ज्यामुळे ते दूरवरून दिसत नाहीत. काही गतिरोधक मधूनच उखडलेले असतात, तर काही उंचसखल असतात. तसेच नव्याने बसविण्यात आलेले रम्बलर पद्धतीचे गतिरोधक धोकादायक ठरत आहेत. यामुळे 'स्लोपी' पद्धतीचे गतिरोधक बसविण्यास प्राधान्य द्यायला हवे. आवश्यक ठिकाणी गतिरोधक घालण्यासह चुकीच्या ठिकाणचे गतिरोधक काढून टाकायला हवेत. यासाठी सर्व गतिरोधकांचे सर्वेक्षण वा ऑडिटिंग होणे गरजेचे आहे. जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाप्रमाणे नवीन गतिरोधक घातले जातात, मात्र तदनंतर त्याची देखभाल होत नाही. अपघातप्रवण क्षेत्र तसेच 'ब्लॅक स्पॉट' हेसुद्धा शोधून काढण्यात आलेले आहेत; मात्र ब्लॅक स्पॉटची पूर्णपणे दुरुस्ती झालेली नाही. या ब्लॅक स्पॉटची दुरुस्ती व्हायला हवी.

पर्वरी फ्लायओव्हरसह इतर रस्त्यांची कामे वेगाने सुरू आहेत. म्हापसा ते पणजी या मार्गावर सर्वाधिक वाहतूक होते आणि या मार्गावर बरेच अपघात झाले आहेत. वाहतुकीची कोंडी कमी करण्यासाठी फ्लायओव्हरचे काम जोरात सुरू आहे. आणखी थोड्याच दिवसांत फ्लायओव्हरचे उद्घाटन होऊन त्यावर वाहतूक सुरू होईल. या महामार्गावरील अपघात व वाहतूक कोंडीचे प्रमाण कमी झाले, तर फ्लायओव्हरचे ते मोठे यश ठरले. थोड्याच महिन्यांनंतर बोरी पुलाच्या कामाला सुरुवात होणार आहे. सांगायचे तात्पर्य म्हणजे पूल, फ्लायओव्हर तसेच रस्त्यांची कामे वेगाने सुरू आहेत.

राज्यातील बसस्थानकांकडे मात्र सरकारचे दुर्लक्ष झालेले आहे. मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्या साखळी मतदारसंघातील साखळी बसस्थानक पूर्ण होण्यास बरीच वर्षे लागली. डिचोली बसस्थानकाचे बांधकाम गेली बरीच वर्षे सुरू आहे. पणजी, मडगाव, म्हापसा या बसस्थानकांचा दर्जा सुधारणे ही काळाची गरज आहे. बसस्थानकांच्या नूतनीकरणाच्या बऱ्याच घोषणा झालेल्या आहेत; मात्र कार्यवाही झालेली नाही. अपघात रोखण्यासाठी रस्त्यांच्या जाळ्याचा विस्तार व्हायला हवा.

वाहतूक नियमांचे उल्लंघन हे बरेच अपघात घडण्यामागील महत्त्वाचे कारण आहे. गाडी चालविताना मोबाईलचा वापर करणे वा जास्त वेगाने गाडी चालविणे हे प्रकार सर्वत्र सुरू असतात. दुचाकी चालकांसाठी हेल्मेटसक्तीची अंमलबजावणी दोन वर्षांपूर्वी कडक करण्यात आली होती. याचा परिणाम म्हणून आज हेल्मेट घालून दुचाकी चालविणाऱ्यांचे प्रमाण वाढले आहे. हेल्मेट न घालणाऱ्यास दंड ठोठावण्याची कारवाई कडकपणे करण्यात आली व याचा अपेक्षित असा परिणाम झालेला आहे. यामुळे आता हेल्मेट न घालता दुचाकी चालविणाऱ्यांचे क्वचितच दर्शन घडते.

ओव्हरस्पीडिंग व गाडी चालविताना मोबाईल वापरण्यावरही दंडाची कारवाई कठोरपणे व्हायला हवी. असे झाले तर बेदरकारपणे गाडी चालविणे व गाडी चालविताना मोबाईल वापरण्याचे प्रमाण कमी होईल. गाडीचा इन्शुरन्स आणि प्रदूषण प्रमाणपत्र या आवश्यक बाबी आहेत, तरी त्या नसल्या म्हणून अपघात घडत नाहीत. आता वाहतूक खात्याने २६ ठिकाणी एआय (AI) कॅमेरे बसविले आहेत. वाहतूक नियमांचे उल्लंघन झाल्यास आता एआय कॅमेऱ्याच्या आधारे चलन जारी होणार आहे. ओव्हरस्पीडिंग व मोबाईलच्या वापरासाठी चलन जारी व्हायलाच हवे.

ज्या ठिकाणी एआय कॅमेरे नाहीत, अशा महत्त्वाच्या ठिकाणी वाहतूक पोलिसांची संख्या वाढवायला हवी. चलन जारी झाल्यामुळे बऱ्याच वाहनचालकांमध्ये शिस्त निर्माण होण्यास मदत होईल. याकरिता एआय कॅमेऱ्याच्या आधारे वाहतुकीवर नजर ठेवण्याचा उपक्रम चांगला आहे. राज्यात सर्व महत्त्वाच्या ठिकाणी एआय कॅमेरे बसवायला हवेत. मात्र ते कायमस्वरूपी चालतील यासाठी त्यांची नियमित देखभाल व्हायला हवी; ते मध्यंतरी नादुरुस्त झाले किंवा बंद पडले तर त्याचा काहीही उपयोग होणार नाही. एआय कॅमेरे हा बेदरकार वाहनचालकांना जरब बसविण्याचा एक उत्तम उपाय आहे.


गणेश जावडेकर, (लेखक ‘भांगरभूंय’ दैनिकाचे  मुख्य प्रतिनिधी आहेत.)