दामूंकडून लिंगावर अभिषेक, रोहनकडून होम, बाबूशकडून महालक्ष्मीला गाऱ्हाणे

पणजी : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सलग ४,३९९ दिवस पंतप्रधानपद भूषवत सर्वाधिक काळ सेवा करणारे निवडून आलेले पंतप्रधान म्हणून नवा विक्रम प्रस्थापित केल्याच्या निमित्ताने गोव्यात भाजप नेते, मंत्री आणि आमदारांनी विविध धार्मिक स्थळांवर विशेष पूजा, अभिषेक, होमहवन आणि प्रार्थना आयोजित केल्या.
राज्यातील विविध मंदिरे, चर्च आणि गुरुद्वारांमध्ये पंतप्रधान मोदी यांच्या उत्तम आरोग्य, दीर्घायुष्य आणि राष्ट्रसेवेसाठी प्रार्थना करण्यात आली. पंतप्रधान आणि देशाच्या नेतृत्वासाठी अशा स्वरूपाच्या प्रार्थना आयोजित करण्याची ही राज्यातील पहिलीच वेळ असल्याचे मानले जात आहे. दरम्यान, सध्या एनडीए परिषद आणि नीती आयोगाच्या बैठकीसाठी मुख्यमंत्री दिल्ली येथे असल्याने त्यांच्या अनुपस्थितीत भाजप प्रदेशाध्यक्ष दामू नाईक तसेच इतर मंत्री आणि आमदारांनी विविध मंदिरांमध्ये जाऊन पंतप्रधानांच्या दीर्घायुष्यासाठी प्रार्थना केल्या.
राज्यभर धार्मिक स्थळांवर विशेष कार्यक्रम
कळंगुटचे आमदार मायकल लोबो यांनी पर्रा चर्चमध्ये विशेष मिसाचे आयोजन केले. कुडचडेचे आमदार नीलेश काब्राल यांनी संतोषी माता मंदिरात, मंत्री सुभाष शिरोडकर यांनी शिरोडा येथील सेंट जोसेफ चर्चमध्ये, तर मंत्री दिगंबर कामत यांनी श्री दामोदर देवस्थानात जाऊन प्रार्थना केली.
गोव्यातील विविध मतदारसंघांमध्ये भाजप कार्यकर्त्यांनी देवळे, चर्च आणि इतर धार्मिक स्थळांमध्ये जाऊन पंतप्रधान मोदी यांच्या उत्तम आरोग्य, दीर्घायुष्य आणि राष्ट्रसेवेसाठी प्रार्थना केल्या. या निमित्ताने राज्यभर धार्मिक आणि सामाजिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले.
दामू नाईक यांचा दामोदर मंदिरात रुद्राभिषेक
भाजपचे प्रदेशाध्यक्ष दामू नाईक यांनी फातोर्डा येथील श्री दामोदर देवस्थानात रुद्राभिषेक आणि महाआरती केली. यावेळी मोदी यांना उत्तम आरोग्य, दीर्घायुष्य आणि देशसेवेसाठी अधिक शक्ती लाभावी, अशी प्रार्थना करण्यात आली. त्यानंतर त्यांनी उपस्थित कार्यकर्त्यांशी संवाद साधला.

बाबूश मोन्सेरात यांचे महालक्ष्मी देवीसमोर गाऱ्हाणे
पणजीचे आमदार तथा मंत्री बाबूश मोन्सेरात यांनी पणजी येथील श्री महालक्ष्मी मंदिरात जाऊन विशेष गाऱ्हाणे घातले. पंतप्रधान मोदी यांच्या यशस्वी वाटचालीसाठी आणि देशाच्या प्रगतीसाठी त्यांनी प्रार्थना केली.

रोहन खंवटे यांचे होमहवन, गुरुद्वारात प्रार्थना
पर्यटन मंत्री रोहन खंवटे यांनी पेन्हा द फ्रान्स येथील विठोबा मंदिरात होमहवनासह विशेष पूजा केली. त्यानंतर त्यांनी बेती येथील गुरुद्वारालाही भेट देऊन पंतप्रधानांच्या आरोग्य आणि दीर्घायुष्यासाठी प्रार्थना केली.