बांबोळीत कंटेनरचा अपघात, तर अनमोड घाटात टेम्पो उलटला

दोघे जखमी. पहाटेच्या सुमारास चालकाचे नियंत्रण सुटल्याने दोन्ही अपघात घडल्याची प्राथमिक माहिती समोर.

Story: वेब डेस्क । गोवन वार्ता |
9 hours ago
बांबोळीत कंटेनरचा अपघात, तर अनमोड घाटात टेम्पो उलटला

पणजी: गोव्यातील राष्ट्रीय महामार्गांवर सोमवारी पहाटेच्या सुमारास अपघातांचे सत्र पाहायला मिळाले. बांबोळी येथे एका वेगवान कंटेनर ट्रकने रस्ते दुभाजकाला जोरदार धडक दिली, तर दुसरीकडे अनमोड घाटात अंडी वाहून नेणारा मालवाहू टेम्पो उलटल्याची घटना घडली. या दोन्ही वेगवेगळ्या दुर्घटनांमध्ये दोन चालक जखमी झाले असून वाहनांचे मात्र मोठे नुकसान झाले आहे.




पहिली घटना बांबोळी येथील राष्ट्रीय महामार्गावर सोमवारी पहाटे ५ वाजण्याच्या सुमारास घडली. मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या एका वेगवान कंटेनर ट्रकच्या चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटले आणि हा ट्रक महामार्गावरील रस्ते दुभाजकाला (डिव्हायडर) जाऊन जोरदार धडकला. ही धडक इतकी भीषण होती की, ट्रकच्या समोरील केबिनचा पार चक्काचूर झाला. या दुर्घटनेत ट्रकचालक गंभीर जखमी झाला असून, त्याला तातडीने उपचारासाठी बांबोळी येथील गोमेकॉत दाखल करण्यात आले आहे. या अपघातामुळे महामार्गावरील एका बाजूची वाहतूक काही काळ पूर्णपणे विस्कळीत झाली होती, ज्यामुळे रस्त्यावर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागून मोठी वाहतूक कोंडी निर्माण झाली होती.




या अपघातामुळे पणजीच्या दिशेने जाणाऱ्या वाहनांच्या वाहतुकीवर आंशिक परिणाम झाला असून वाहतूक विस्कळीत झाली आहे. पणजीच्या दिशेने जाणाऱ्या वाहनचालकांनी एक तर गोवा विद्यापीठ रस्ता किंवा सांताक्रुझ मार्गाचा वापर करावा. सर्व वाहनचालकांनी सावधगिरी बाळगावी, वाहतूक पोलिसांच्या सूचनांचे पालन करावे आणि वाहने सुरक्षितपणे चालवावीत, असे आवाहन वाहतूक पोलिसांकडून करण्यात आले आहे.




दुसरी घटना मोले-अनमोड घाट मार्गावर घडली. शेजारील राज्यातून गोव्यात अंडी घेऊन येणारा एक मालवाहू टेम्पो घाटातून जात असताना, एका अत्यंत धोकादायक वळणावर चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटले. त्यामुळे हा टेम्पो भररस्त्यात पालथा झाला. या अपघातात टेम्पोचे मोठे नुकसान झाले असून चालक किरकोळ जखमी झाला आहे. अपघातानंतर घाटातून प्रवास करणाऱ्या इतर वाहनचालकांनी आणि स्थानिक नागरिकांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत मदतकार्य सुरू केले आणि टेम्पोतील मालाची बाजूला आवराआवर केली. पोलिसांनी दोन्ही घटनांची नोंद घेतली असून पुढील तपास सुरू आहे.


हेही वाचा