
मडगाव: कोकण रेल्वे मार्गावरील विनातिकीट आणि अनधिकृत प्रवासाला आळा घालण्यासाठी कोकण रेल्वे कॉर्पोरेशन लिमिटेडने तिकीट तपासणी मोहीम तीव्र केली आहे. मे महिन्यात रेल्वेने राबवलेल्या विशेष मोहिमेमध्ये ६१ हजार विनातिकीट प्रवाशांवर कारवाई करत ३.७० कोटी रुपयांचा दंड वसूल केला.
मे २०२६ मध्ये कोकण रेल्वेने नियमित तपासणीसोबतच ९५१ विशेष तिकीट तपासणी मोहिमा राबवल्या. या मोहिमेदरम्यान एकूण ६१,०५१ प्रवासी अनधिकृत किंवा विनातिकीट प्रवास करताना आढळले. या प्रवाशांकडून रेल्वे भाडे आणि दंडाच्या स्वरूपात एकूण ३.७० कोटी रुपये वसूल करण्यात आले आहेत.
अधिकृत प्रवाशांना प्रवासादरम्यान त्रास होऊ नये आणि त्यांचा प्रवास सुखकर व्हावा, यासाठी कोकण रेल्वेने हे पाऊल उचलले आहे. रेल्वे सुरक्षा दल आणि रेल्वे अधिकाऱ्यांच्या समन्वयाने कोकण रेल्वेच्या मार्गावर ही मोहीम यापुढेही सुरू राहणार आहे. सर्व प्रवाशांनी योग्य तिकीट घेऊनच प्रवास करावा आणि सुरक्षित व त्रासमुक्त प्रवासासाठी रेल्वे प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन कोकण रेल्वे प्रशासनाने केले आहे.