
मडगाव : दामू नाईक यांनी केलेल्या विधानाचा फायदा भाजपला नाही, तर विरोधी पक्षातील सर्वात मोठा पक्ष असलेल्या काँग्रेसला होणार आहे. गोवा फॉरवर्ड ही भाजपची 'बी टीम' आहे, असे म्हणण्यास राजकीय कारण मिळावे यासाठी काँग्रेसनेच दामू नाईक यांना असे वक्तव्य करण्यास सांगितले असण्याची शक्यता आहे, असा खळबळजनक आरोप गोवा फॉरवर्डचे अध्यक्ष तथा आमदार विजय सरदेसाई यांनी केला आहे.
आपल्या भाजप प्रवेशाच्या चर्चांवर स्पष्टीकरण देताना आमदार सरदेसाई म्हणाले, आगामी विधानसभा निवडणुकीसाठी गोवा फॉरवर्डची काँग्रेससोबत युती असेलच, याची अद्याप कोणतीही हमी नाही, असे विधान आपण केले होते. याचा अर्थ आपण भाजपमध्ये प्रवेश करतोय किंवा त्यांच्याशी युती करतोय, असा अजिबात होत नाही. आपण राज्यातील भाजपचे सर्वात कट्टर विरोधक आहोत. कला अकादमीतील भ्रष्टाचार आपणच चव्हाट्यावर आणला आणि त्याविरोधात न्यायालयात दाद मागितली आहे.
दामू नाईक यांच्या वक्तव्याने आपल्याला धक्का बसलेला नाही, असे सांगत सरदेसाई पुढे म्हणाले की, निवडणुका जवळ आल्यावर फातोर्डा मतदारसंघात काही विरोधक एकत्र येतात आणि आमच्या विरोधात काम करतात; मात्र जनतेने त्यांना नेहमीच नाकारले आहे. केवळ लोकांची दिशाभूल करून निवडून येता येईल, असा दामू नाईक यांचा समज असल्यास आमचीही लढण्याची पूर्ण तयारी आहे. भाजपसोबतची आमची युती कधीच तुटली आहे. मागील निवडणुकीत आम्ही काँग्रेससोबत होतो आणि आताही आहोत; पण भविष्यात काय होईल हे सांगता येत नाही, कारण काही नेत्यांची पडद्यामागे हालचाली सुरू आहेत.
शेतकऱ्यांच्या जमिनी परत करण्याच्या मुद्द्यावर बोलताना सरदेसाई यांनी दामू नाईक यांना थेट आव्हान दिले. मी विरोधी पक्षाचा आमदार असल्याने शेतकऱ्यांना जमीन परत मिळवून देण्याची ताकद माझ्यात नाही; परंतु जगातील सर्वात मोठ्या पक्षाचे प्रदेशाध्यक्ष असल्याने ती ताकद दामू नाईक यांच्याकडे नक्कीच आहे. मुख्यमंत्र्यांनी कोणत्याही निविदेविना दामू नाईक यांना एक पेट्रोल पंप मंजूर केला असून, हे प्रकरण दक्षिण गोवा नियोजन व विकास प्राधिकरणाच्या (SGPDA) बैठकीत आले होते. त्यामुळे नाईक यांनी थेट मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून शेतकऱ्यांच्या जमिनी परत करण्याची मागणी करावी. जर त्यांच्याकडून हे होत नसेल, तर त्यांनी सत्ताधारी पक्ष सोडावा आणि आमच्यासोबत यावे. आम्ही थेट रस्ता रोको करून शेतकऱ्यांना त्यांचे हक्क मिळवून देऊ, असे सांगत सरदेसाई यांनी दामू नाईक यांना अनावश्यक वक्तव्ये करून जनतेची दिशाभूल न करण्याचा सल्ला दिला.