
पणजी : ‘माझे घर’ योजनेअंतर्गत घरे नियमित करण्यास परवाने देण्यात काही कोमुनिनादकडून उशीर होत आहे. मात्र काही वर्षांपूर्वी याच कोमुनिदादीनीच अशा व्यक्तींना आपल्या जागेत घरे बांधण्यास परवानगी दिली होती. त्यावेळी कोमुनिदादीनी केलेल्या चुका मान्य करून आता ‘माझे घर’ योजनेअंतर्गत त्या सुधारण्याचा प्रयत्न केला पाहिजे; असे मत महसूल मंत्री बाबुश मोन्सेरात यांनी व्यक्त केले.
बुधवारी भाजप पणजी मंडळातर्फे पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या कार्यकाळाला बारा वर्षे पूर्ण झाल्याबद्दल केलेल्या कार्यक्रमानंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. बाबुश म्हणाले की, गोव्यात कुणी बाहेरून आला आणि कोणुनिदाद जागेत लगेच घर बांधले असे झालेले नाही. समजा १९९० मध्ये कुणी अशा जागेत घर बांधले असेल तर तेव्हाच्या कोमुनिनादीने त्यांना परवानगी दिली होती.
काही व्यक्तींकडे याची पोच पावती देखील आहे. त्यामुळे ही चूक कोमुनिनादचीच आहे. कोमुनिदाद ही स्वतंत्र संस्था असून; सरकार त्यावर केवळ देखरेख ठेवते. कोमुनिदादमध्ये देखील निवडणुका होतात. अशा व्यक्तींना जागा देण्याचा निर्णय सरकारचा नव्हता. आपली मालमत्ता जपणे ही सरकारची नसून कोमुनिदादची जवाबदारी आहे.
झालेल्या चुका सुधारून हा विषय कायमस्वरुपी सोडवणे आवश्यक आहे.
ते म्हणाले, गोमंतकीय व्यक्तींना मदत करण्यासाठी ‘माझे घर’ योजना सुरू करण्यात आली आहे. काही लोक याला विरोध करत असले तरी त्याचा फायदा स्थानिक जनतेला होणार आहे. आज आम्ही पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या चांगल्या आरोग्यासाठी प्रार्थना केली. त्यांच्या कार्यकाळात भारतासह गोव्यात झपाट्याने प्रगती झाली आहे.
लोकशाहीत लोकांच्या मतांना महत्व असते. लोकप्रतिनिधींनी चांगले काम केले तर लोक त्यांना पुन्हा संधी देतात. भाजप सरकारने केलेली विकासकामे पाहता गोवा विधानसभा तसेच २०२९ च्या लोकसभा निवडणुकीत भाजपला पुन्हा यश मिळणार हे नक्की आहे.
मंत्र्यांशी चर्चा करणार
बाबुश म्हणाले की, कांपाल येथील फुटबॉल मैदान जीसुडाने (GSUDA) बांधले आहे. ही जमीन नगर-नियोजन खात्याची आहे. काही कारणास्तव मैदान अद्याप पणजी महानगरपालिकेकडे हस्तांतरित झालेले नाही. याबाबत तसेच मैदानाच्या वापराबाबत आम्ही नगर-नियोजन मंत्र्यांशी चर्चा करणार आहोत.