गोव्यातील २० टक्के लहान मुलांचे वजन वयाच्या मानाने कमी

५ वर्षांच्या आतील १९.४ टक्के बालकांची उंची वयाच्या मानाने कमी

Story: प्रतिनिधी। गोवन वार्ता |
09th June, 11:35 pm
गोव्यातील २० टक्के लहान मुलांचे वजन वयाच्या मानाने कमी

पणजी : राज्यातील (Goa) १५ वर्षांवरील महिला आणि पुरुषांमध्ये लठ्ठपणाचे प्रमाण राष्ट्रीय सरासरीपेक्षा अधिक आहे. असे असले तरी पाच वर्षांच्या आतील १९.९ टक्के बालकांचे वजन (Children's weight) जागतिक आरोग्य संघटनेने (WHO) ठरवून दिलेल्या निकषांनुसार नाही. या बालकांचे वजन त्यांच्या वयाच्या मानाने कमी आहे. दोन वर्षांच्या कालावधीत अशा मुलांचे प्रमाण ४.१ टक्क्यांनी कमी झाले आहे. याची राष्ट्रीय सरासरी ३१.८ टक्के इतकी अधिक आहे. राष्ट्रीय कुटुंब आरोग्य सर्वेक्षण (एनएफएचएस) ५ आणि ६ या अहवालातून ही माहिती मिळाली आहे.

अहवालानुसार, राज्यातील ५ वर्षांच्या आतील १९.४ टक्के बालकांची उंची त्यांच्या वयाच्या मानाने कमी आढळली. याआधी हीच टक्केवारी २५.८ होती. याशिवाय १६.३ टक्के बालकांचे वजन त्यांच्या उंचीच्या मानाने कमी होते. तर २.४ टक्के बालकांचे वजन त्यांच्या उंचीच्या मानाने अत्यंत कमी होते. यापूर्वी हे प्रमाण अनुक्रमे १९.१ टक्के आणि ७.५ टक्के होते. राज्यातील ५ वर्षांच्या आतील लहान बालकांमध्ये लठ्ठपणाचे प्रमाण कमी आहे. राज्यातील ०.९ टक्के बालकांचे वजन उंचीच्या तुलनेत अधिक आहे. याआधी हे प्रमाण २.८ टक्के इतके होते.

एनएफएचएससाठी सर्व्हेक्षण करत असताना, सहा महिन्यांच्या आतील १०० टक्के शिशूंना स्तनपान दिले जात होते. मागील सर्वेक्षणात देखील ही टक्केवारी १०० होती. स्तनपानाशिवाय अन्य पद्धतीचे दूध देण्याचे प्रमाण देखील राज्यात अधिक आहे. दोन वर्षांच्या कालावधीत ६ ते २३ महिन्यांपर्यंतच्या शिशूंना पुरेसा आहार मिळण्याची टक्केवारी २१.५ टक्क्यांवरून ३३ टक्केपर्यंत वाढली. याशिवाय जन्मानंतर एका तासाच्या आत स्तनपान देण्यात आलेल्या शिशूंचे प्रमाण ६१.६ टक्क्यांवरून कमी होऊन ४७.९ टक्के झाल्याचे अहवाल नमूद केले आहे.

लसीकरणाची टक्केवारी वाढली

दोन वर्षांत राज्यातील १२ ते २३ महिन्यांच्या बालकांमध्ये लसीकरणाचे प्रमाण ११.९ टक्क्यांनी वाढले आहे. एनएफएचएस ५ नुसार राज्यातील ८१.९ टक्के बालकांचे लसीकरण झाले होते. एनएफएचएस ६ नुसार हे प्रमाण वाढून ९३.८ टक्के झाले. बीसीजी, पोलिओ यांच्या लसींचे प्रमाण ९८ टक्क्यांपेक्षा अधिक होते. 

हेही वाचा