३७० रुपयांच्या बिर्याणीपायी करिअर गोत्यात आले; तरुणाची कंपनीतून हकालपट्टी

बिग बॉस फेम प्रणित मोरेच्या लाईव्ह शोदरम्यान एका मुलीसोबतच्या डेटचा किस्सा सांगताना तरुणाची जीभ घसरल्याने सोशल मीडियावर संताप.

Story: वेब डेस्क । गोवन वार्ता |
7 hours ago
३७० रुपयांच्या बिर्याणीपायी करिअर गोत्यात आले; तरुणाची कंपनीतून हकालपट्टी

मुंबई : सोशल मीडियावर झटपट प्रसिद्धी मिळवण्याच्या आणि स्वतःला 'कूल' दाखवण्याच्या नादात आजची तरुणाई अनेकदा गंभीर चुका करून बसते. या चुका केवळ तात्पुरत्या ट्रोलिंगपुरत्या मर्यादित न राहता थेट वैयक्तिक आणि प्रोफेशनल लाईफवर कशा बेतू शकतात, याचे एक धक्कादायक उदाहरण समोर आले आहे. बिग बॉस फेम आणि प्रसिद्ध स्टँड-अप कॉमेडियन प्रणित मोरे याच्या एका लाईव्ह शोदरम्यान महिलांबाबत अत्यंत आक्षेपार्ह आणि अश्लील विधान करणाऱ्या गुरुग्राममधील एका तरुणाला नेटकऱ्यांच्या तीव्र संतापाचा सामना करावा लागल्यानंतर आता कंपनीने थेट नोकरीवरून काढून टाकले आहे.



हा संपूर्ण प्रकार एका लाईव्ह स्टँड-अप कॉमेडी शोदरम्यान घडला. या शोमध्ये प्रणीत मोर प्रेक्षकांशी गप्पा मारताना संबंधित तरुणाने त्याच्या एका डेटचा किस्सा जाहीरपणे ऐकवला. एका मुलीसोबत डेटवर गेल्यावर आपण चिकन बिर्याणीवर ३७० रुपये खर्च केले होते, असे सांगत त्या मुलीने जेव्हा त्याला घरापर्यंत सोडण्यास सांगितले, तेव्हा आपण तिच्याकडे थेट शारीरिक संबंधांची मागणी केली, असा दावा त्याने केला. या वक्तव्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होताच महिलांच्या सन्मानाचा आणि सुरक्षिततेचा मुद्दा उपस्थित करत नेटकऱ्यांनी या तरुणावर चहूबाजूंनी टीकेची झोड उठवली.



हा तरुण हरियाणामधील गुरुग्राम  येथील एका नामांकित डिझाईन कंपनीत कार्यरत होता. त्याचे हे विधान कंपनीच्या व्यवस्थापनापर्यंत पोहोचताच व्यवस्थापनाने तात्काळ कठोर पावले उचलली. कंपनीच्या मालकाने स्वतः एक अधिकृत व्हिडिओ जारी करून या कारवाईची माहिती दिली. कार्यालयातील इतर महिला कर्मचाऱ्यांशी चर्चा केल्यानंतर, जरी कार्यालयात त्याची वर्तणूक चांगली असली, तरी सोशल मीडियावरील त्याचे वक्तव्य कंपनीच्या नैतिक मूल्यांच्या आणि संस्कृतीच्या पूर्णपणे विरोधात असल्याचे मालकाने स्पष्ट केले. तरुणांवर याचा चुकीचा प्रभाव पडू नये म्हणून त्याला तातडीने सेवेतून बडतर्फ करण्यात आले. हा निर्णय व्यावसायिक जगतात महिलांच्या सुरक्षिततेसाठी आणि नैतिक मूल्यांसाठी अत्यंत महत्त्वाचा मानला जात असून सोशल मीडियावर याचे स्वागत होत आहे.

हेही वाचा