पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मोडला नेहरूंचा विक्रम

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी (Prime Minister Narendra Modi) यांच्या नेतृत्वाखाली केंद्रातील सरकारला १२ वर्षे पूर्ण होत आहे. त्यासाठी आज (बुधवारी) दुपारी ३ वाजता नवी दिल्लीतील भारत मंडपम येथे राष्ट्रीय लोकशाही आघाडी (एनडीए) शासित राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांच्या मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि वरिष्ठ नेत्यांची महत्त्वपूर्ण बैठक होणार आहे. या बैठकीचे अध्यक्षस्थान स्वतः पंतप्रधान नरेंद्र मोदी भूषवणार आहेत.

या बैठकीत संरक्षण मंत्री राजनाथ सिंह, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यासह अनेक केंद्रीय मंत्री उपस्थित राहणार आहेत. तसेच उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, आसामचे मुख्यमंत्री हिमंत बिस्वा सरमा, मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री मोहन यादव, गुजरातचे मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल यांच्यासह एनडीए शासित २२ राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांचे प्रमुख सहभागी होणार आहेत. आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री एन. चंद्राबाबू नायडू यांच्यासह मित्रपक्षांचे नेतेही बैठकीला उपस्थित राहण्याची शक्यता आहे.
बैठकीत घेणार सविस्तर आढावा
बैठकीत केंद्र सरकारच्या विविध कल्याणकारी योजना आणि पायाभूत सुविधा प्रकल्पांचा आढावा घेण्यात येणार असून, त्यांचा लाभ समाजातील शेवटच्या घटकापर्यंत पोहोचवण्यासाठी आवश्यक उपाययोजनांवर चर्चा होणार आहे. याशिवाय ‘विकसित भारत २०४७’ या दूरदृष्टीच्या आराखड्याचा आढावा, पश्चिम आशियातील वाढता तणाव आणि त्याचे परिणाम यांसारख्या महत्त्वाच्या विषयांवरही चर्चा अपेक्षित आहे.
१२ वर्षांत परराष्ट्र धोरणात लक्षणीय बदल झाल्याचा दावा
दरम्यान, परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाने पंतप्रधान मोदी यांच्या १२ वर्षांच्या कार्यकाळात भारताच्या परराष्ट्र धोरणात लक्षणीय बदल झाल्याचा दावा केला आहे. आंतरराष्ट्रीय सौर आघाडी (International Solar Alliance), युपीआयसारख्या (UPI) डिजिटल सार्वजनिक पायाभूत सुविधांचा जागतिक विस्तार, तसेच विकसनशील देशांचा प्रभावी आवाज आणि जागतिक संकटांच्या काळात प्रथम प्रतिसाद देणारा देश म्हणून भारताची भूमिका अधिक बळकट झाल्याचे मंत्रालयाने नमूद केले आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नेहरूंचा विक्रम मोडला
विशेष म्हणजे, १० जून रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सलग ४,३९९ दिवस पंतप्रधानपद भूषवून भारताचे पहिले पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांचा सलग ४,३९८ दिवसांच्या कार्यकाळाचा विक्रम मागे टाकला आहे. त्यामुळे देशाच्या राजकीय इतिहासात हा एक महत्त्वाचा टप्पा मानला जात असून, विविध क्षेत्रांतील मान्यवर, राजकीय नेते आणि जागतिक स्तरावरील व्यक्तींनी त्यांचे अभिनंदन केले आहे.