मायना कुडतरी परिसरात मारहाणीचा आरोप

प्रतिनिधी। गोवन वार्ता
मडगाव : मायना कुडतरी पोलीस ठाण्याच्या परिसरात मारहाण करणे आणि गैरवर्तन केल्याप्रकरणी गोवा पोलीस खात्याने पोलीस कॉन्स्टेबल चेतन कोळी यांच्यावर निलंबनाची कारवाई केली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, मायना कुडतरी पोलीस ठाण्याच्या परिक्षेत्रातील एका वादाच्या संदर्भात पोलीस ठाण्यात आलेल्या दोन गटांपैकी चार व्यक्तींना पोलीस कॉन्स्टेबल चेतन कोळी यांनी विनाकारण रात्री उशिरापर्यंत पोलीस ठाण्यात बसवून ठेवले होते. या काळात त्यांनी विहित कायदेशीर प्रक्रियेचे पालन केले नाही. याशिवाय त्यांना पोलीस ठाण्याच्या परिसरातच मारहाण केली, असा आरोप कोळी यांच्यावर आहे.
समाज माध्यमांवर व्हायरल झालेल्या छायाचित्रांमध्ये पीडित व्यक्तीच्या हातावर मारहाणीच्या खुणा स्पष्टपणे दिसत आहेत. या घटनेची गंभीर दखल घेऊन वरिष्ठ पोलीस अधिकार्यांनी चेतन कोळी यांच्या निलंबनाचे आदेश दिले आहेत. या प्रकरणाची सखोल चौकशी सुरू करण्यात आली असून, चौकशीच्या अहवालानंतर त्यांच्यावर अधिक कडक कारवाई केली जाण्याची शक्यता आहे. जनतेशी गैरवर्तन आणि मारहाण खपवून घेतली जाणार नाही, असा संदेश या कारवाईतून पोलीस प्रशासनाने दिला आहे.