१७ वर्षीय मुलीवर लैंगिक अत्याचारप्रकरणी २३ वर्षीय युवकाचा जामीन अर्ज फेटाळला

इन्स्टाग्रामवर मैत्री करुन दुसऱ्याचा दिवशी केला बलात्कार

Story: प्रतिनिधी। गोवन वार्ता |
09th June, 11:23 pm
१७ वर्षीय मुलीवर लैंगिक अत्याचारप्रकरणी २३ वर्षीय युवकाचा जामीन अर्ज फेटाळला

पणजी : आदल्या दिवशी इन्स्टाग्रामवर मैत्री केली आणि दुसऱ्या दिवशी १७ वर्षीय मुलीवर लैंगिक अत्याचार केला. या प्रकरणी मेरशी येथील पाॅक्सो न्यायालयाने बार्देश तालुक्यातील २३ वर्षीय युवकाचा जामीन अर्ज फेटाळून लावला. याबाबतचा आदेश न्या. पूजा कवळेकर यांनी दिला.

या प्रकरणी पणजी महिला पोलिसांनी गुन्हा दाखल केला. त्यानुसार, तिसवाडी तालुक्यातील १७ वर्षीय मुलीने तक्रार दाखल केली आहे. बार्देश तालुक्यातील २३ वर्षीय युवकाने ८ मार्च रोजी तिच्याशी इन्स्टाग्रामवरून मैत्री केली. त्यानंतर दुसऱ्या दिवशी म्हणजे ९ मार्च रोजी दुपारी १२ ते ४ दरम्यान ते दोघे भेटले. त्यावेळी युवकाने तिला म्हापसा परिसरात नेले. तिथे एका हॉटेलवर बळजबरीने तिच्यावर लैंगिक अत्याचार केल्याचे तिने तक्रारीत म्हटले आहे.

या प्रकरणी पणजी महिला पोलीस स्थानकाच्या निरीक्षक मीरा डिसिल्वा यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक रुपाली गोवेकर यांनी सदर युवकाविरोधात लैंगिक अत्याचार प्रकरणी गुन्हा दाखल करून अटक केली.

मेरशी येथील ‘पाेक्सो’ न्यायालयाने त्याला प्रथम पोलीस कोठडी ठोठावली. ती संपल्यानंतर संशयित युवकाला न्यायालयीन कोठडीत पाठविण्यात आले. दरम्यान, पोलिसांनी तपास पूर्ण करून न्यायालयात आरोपपत्र दाखल केले. याच दरम्यान, संशयित युवकाने न्यायालयात जामीन अर्ज दाखल केला.

पीडितेची उलटतपासणी अद्याप बाकी

युवक न्यायालयीन कोठडीत असल्यामुळे तसेच आरोपपत्र दाखल केल्यामुळे पोलिसांचा तपास संपला आहे. त्यामुळे त्याला जामीन मंजूर करण्याची मागणी केली. या प्रकरणी न्यायालयात सुनावणी झाली असता, पीडित मुलीची न्यायालयात उलटतपासणी झाली नाही, असे निरीक्षण नोंदवून न्यायालयाने जामीन अर्ज फेटाळून लावला. 

हेही वाचा