कचरा टाकतानाचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर पोलिसांनी नोंदवला होता गुन्हा

पणजी : सार्वजनिक ठिकाणी कचरा टाकतानाचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर व्हायरल झाल्यामुळे आणि या प्रकरणी म्हापसा पोलिसांनी गुन्हा दाखल केल्यामुळे निर्माण झालेल्या प्रचंड मानसिक तणावातून एका महाविद्यालयीन विद्यार्थ्याने स्वतःवर पिस्तुलाची गोळी झाडून आत्महत्या केल्याची अत्यंत धक्कादायक आणि दुर्दैवी घटना घडली आहे. म्हापसा येथील गावसावाडा परिसरात घडलेल्या या घटनेत सॅम्युअल गार्विन डी ब्रागांका (वय २३) या तरुणाचा अंत झाला आहे. डिजिटल युगातील ट्रोलिंग, सामाजिक प्रतिष्ठा आणि अचानक उद्भवलेल्या कायदेशीर प्रक्रियेचा तरुण मनावर कसा विपरित परिणाम होऊ शकतो, हे या घटनेतून समोर आले असून ते अत्यंत चिंताजनक आहे.
आत्महत्येची घटना शुक्रवारी ५ जून रोजी उत्तररात्री १२.४० वाजण्याच्या सुमारास घडली. सॅम्युअल याने आपल्या घरातील बाथरुममध्ये स्वतःवर गोळी झाडली. रात्री अचानक गोळीबाराचा मोठा आवाज आल्याने घरातील सदस्यांनी सॅम्युअलच्या बेडरूमकडे धाव घेतली असता, हा भयंकर प्रकार उघडकीस आला. तो बाथरुममध्ये रक्ताच्या थारोळ्यात पडलेला आढळला. कुटुंबीयांनी त्याला तातडीने म्हापसा जिल्हा इस्पितळात दाखल केले, मात्र उपचारापूर्वीच डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. म्हापसा पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत प्राथमिक पंचनामा केला असून मृतदेह शवविच्छेदनासाठी गोवा वैद्यकीय महाविद्यालयात पाठवला आहे.

सॅम्युअलचा रस्त्याच्या कडेला कचरा टाकतानाचा व्हिडिओ बुधवारी ३ जून रोजी सायंकाळी एका नागरिकाने चित्रित केला होता. हा व्हिडिओ गुरुवारी सकाळी सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात प्रसारित करण्यात आला. या व्हिडिओची दखल घेत म्हापसा पोलिसांनी सार्वजनिक आरोग्यास धोका निर्माण केल्याच्या आरोपाखाली सॅम्युअलविरुद्ध भारतीय न्याय संहितेच्या कलम २७१ आणि गोवा नॉन-बायोडिग्रेडेबल गार्बेज (कंट्रोल) कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला होता. तसेच कालच त्याला पोलीस स्थानकात बोलावून कायदेशीर नोटीस बजावण्यात आली होती. या अचानक घडलेल्या घडामोडींमुळे आणि सामाजिक बदनामीच्या भीतीने सॅम्युअल तीव्र नैराश्यात गेला. यामुळेच त्याने हे अत्यंत टोकाचे पाऊल उचलल्याचे प्रथमदर्शनी स्पष्ट होत आहे. पोलीस या प्रकरणी पुढील तपास करत आहेत.