फोंडा पोलीस हद्दीत एकाच रात्री तीन चोऱ्या

बोरी येथे बंगल्यात, पार-उसगाव, ढवळी येथे मंदिरात चोरी

Story: प्रतिनिधी। गोवन वार्ता |
2 hours ago
फोंडा पोलीस हद्दीत एकाच रात्री तीन चोऱ्या

फोंडा : फोंडा पोलीस (ponda Police) हद्दीत बुधवारी रात्री अज्ञात चोरट्यांनी एका बंद बंगल्यासह (Closed bungalow) दोन मंदिरांना (Two temples) लक्ष्य करत पोलिसांसमोर मोठे आव्हान उभे केले आहे. एकाच रात्री झालेल्या या तीन चोऱ्यांमुळे परिसरात भीतीचे वातावरण असून, चोरट्यांनी रोख रक्कम, सोन्याचे दागिने आणि चक्क दारूच्या बाटल्याही लंपास केल्या आहेत.
बोरीत बंद बंगल्यातून दीड लाखांची चोरी
बोरी पुलाजवळील माजी सरपंच कोस्तास लुईस यांच्या बंद बंगल्यात चोरट्यांनी मुख्य दरवाजाचे कुलूप तोडून प्रवेश केला. घरातील सोन्याचे दागिने, रोख रक्कम आणि विदेशी दारूच्या बाटल्या असा एकूण १.५ लाख रुपयांचा माल लंपास केला. गुरुवारी सकाळी हा प्रकार उघडकीस आल्यानंतर फोंडा पोलिसांनी ठसेतज्ज्ञांच्या मदतीने तपास सुरू केला आहे.


ढवळीतील सत्यनारायण मंदिराची दानपेटी फोडली
ढवळी येथील श्री सत्यनारायण मंदिरात बुधवारी रात्री भजन संपल्यानंतर चोरट्यांनी आपला हात साफ केला. मंदिराच्या दरवाजाचे कुलूप तोडून चोरट्यांनी आतील फंड पेटी फोडली आणि त्यातील सुमारे १० हजार रुपयांची रोकड घेऊन पळ काढला. भर वस्तीतील मंदिरात चोरी झाल्याने भाविकांमधून संताप व्यक्त होत आहे.


पार-उसगावमध्ये मंदिरात शिरला चोरटा
पार-उसगाव येथील भवानी सिद्ध पुरुष मंदिरात रात्री ११ च्या सुमारास खिडकीचे ग्रील्स कापून चोरट्याने प्रवेश केला. विशेष म्हणजे, सीसीटीव्हीपासून वाचण्यासाठी चोरट्याने हेल्मेट परिधान केले होते. त्याने थेट गाभाऱ्यात प्रवेश करून मूर्तीच्या गळ्यातील सोन्याचे दागिने लंपास केले. या मंदिरात वारंवार चोऱ्या होत असल्याने समितीने रात्रीची पोलीस गस्त वाढवण्याची मागणी केली आहे.