३० वर्षांच्या लढ्यानंतर निर्दोष मुक्तता; दुसऱ्याच दिवशी मृत्यू

गुजरात येथील पोलीस कॉन्स्टेबलची विदारक कहाणी

Story: न्यूज डेस्क । गोवन वार्ता |
3 hours ago
३० वर्षांच्या लढ्यानंतर निर्दोष मुक्तता; दुसऱ्याच दिवशी मृत्यू

अहमदाबाद : अवघ्या २० रुपयांची लाच घेतल्याच्या आरोपाखाली अडकलेल्या पोलीस कॉन्स्टेबल बाबूभाई प्रजापती यांना तब्बल ३० वर्षांच्या न्यायालयीन लढाईनंतर अखेर निर्दोष घोषित करण्यात आले. गुजरात उच्च न्यायालयाने ४ फेब्रुवारी रोजी दिलेल्या निकालात त्यांच्यावरील सर्व आरोप फेटाळून लावले. मात्र दुर्दैवाने, या ऐतिहासिक निकालानंतर अवघ्याच दुसऱ्या दिवशी त्यांचे हृदय विकाराच्या झटक्याने निधन झाले.
ही संपूर्ण कहाणी सुरू झाली २० नोव्हेंबर १९९६ रोजी. अहमदाबादमध्ये तैनात असलेल्या बाबूभाई प्रजापती यांच्यावर २० रुपयांची लाच घेतल्याचा आरोप ठेवण्यात आला. भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्यानुसार त्यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल झाला. १९९७ मध्ये आरोपपत्र, २००२ मध्ये आरोप निश्चिती, २००३ मध्ये साक्षीदारांची सुनावणी आणि अखेर २००४ मध्ये सत्र न्यायालयाने चार वर्षांचा तुरुंगवास व दंडाची शिक्षा सुनावली. या निर्णयाविरोधात प्रजापती यांनी गुजरात उच्च न्यायालयात धाव घेतली. मात्र ही याचिका २२ वर्षे प्रलंबित राहिली.
उच्च न्यायालयाने निकाल देताना साक्षीदारांच्या जबाबांमध्ये गंभीर विसंगती असल्याचे नमूद केले आणि फिर्यादी पक्ष आरोप सिद्ध करण्यात अपयशी ठरल्याचे स्पष्ट केले. निकालानंतर भावूक प्रतिक्रिया देताना प्रजापती म्हणाले होते, माझ्या आयुष्यावरील कलंक अखेर पुसला गेला.आता देवाने मला बोलावले तरी मला कोणतेही दु:ख होणार नाही आणि अखेर तसेच घडले. दुसऱ्या दिवशीच त्यांचे निधन झाले.
त्यांचे वकील नितीन गांधी यांनी सांगितले की, निकालाच्या दिवशी ते अत्यंत आनंदी आणि समाधानात होते. सरकारकडून मिळणाऱ्या लाभांसाठी अर्ज करण्याबाबतही आमच्यात चर्चा झाली होती.
आनंद केवळ क्षणभराचाच
निकालानंतर घरी परतल्यानंतर दुसऱ्याच दिवशी बाबूभाई प्रजापती यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. दीर्घकाळ अन्याय सहन करून अखेर न्याय मिळालेला असतानाच त्यांचे आयुष्य संपले, ही बाब अनेकांच्या मनाला चटका लावणारी ठरली. ही घटना केवळ एका व्यक्तीची नाही, तर विलंबित न्यायप्रणालीचे भयावह वास्तव अधोरेखित करणारी कहाणी आहे. जिथे निर्दोषत्व सिद्ध होते, पण आयुष्य मात्र न्यायाची वाट पाहत संपून जाते.

हेही वाचा