केंद्रीकृत सामाईक परीक्षेचे वेळापत्रक जाहीर; प्रश्नपत्रिका यंदा अधिक सोप्या असणार : एससीईआरटी

Story: वेब डेस्क। गोवन वार्ता |
3 hours ago
केंद्रीकृत सामाईक परीक्षेचे वेळापत्रक जाहीर; प्रश्नपत्रिका यंदा अधिक सोप्या असणार : एससीईआरटी

पणजी : गोवा राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदे (एससीईआरटी) (SCERT) मार्फत घेण्यात येणाऱ्या दुसऱ्या कौशल्याधारित केंद्रीकृत सामाईक समापन मूल्यांकन परीक्षेच्या तारखा जाहीर करण्यात आल्या आहेत. इयत्ता ५वी ते ८वीच्या विद्यार्थ्यांसाठी ही परीक्षा ५ मार्चपासून सुरू होणार असून, इयत्ता ३री व ४थीसाठी ६ एप्रिलपासून परीक्षा घेण्यात येणार आहे. या परीक्षेला राज्यभरातून सुमारे १.२० लाखांहून अधिक विद्यार्थी बसणार आहेत.

‘एससीईआरटी’ने स्पष्ट केले आहे की, क्रीडा स्पर्धांमध्ये सहभाग किंवा वैद्यकीय कारणांमुळे जे विद्यार्थी परीक्षेला अनुपस्थित राहतील, त्यांच्यासाठी अतिरिक्त परीक्षा आयोजित करण्यात येणार आहे. अशा विद्यार्थ्यांसाठी स्वतंत्र प्रश्नपत्रिका व वेळापत्रक देण्यात येईल.

परिपत्रकानुसार, इयत्ता ५वी ते ८वीसाठी प्रश्नपत्रिका एससीईआरटी कडून पुरवण्यात येणार आहेत. उत्तरपत्रिका शाळांनी उपलब्ध करून द्यायच्या आहेत. तर इयत्ता ३री व ४थीसाठी प्रश्नपत्रिका व उत्तरपत्रिका एकत्रित स्वरूपात (Question-cum Answer Paper) देण्यात येणार आहेत. प्रश्नपत्रिकांचे वितरण २३ फेब्रुवारीपासून सुरू होण्याची शक्यता आहे.

राज्यातील सर्व शाळांमध्ये मूल्यांकनात एकसमानता व मानकीकरण आणण्याच्या उद्देशाने या शैक्षणिक वर्षापासून केंद्रीकृत सामाईक समापन परीक्षा सुरू करण्यात आली आहे. गेल्या वर्षी ऑक्टोबरमध्ये झालेल्या पहिल्या परीक्षेच्या तुलनेत यंदा प्रश्नपत्रिका तुलनेने सोप्या असतील. मात्र; राष्ट्रीय शिक्षण धोरण २०२० (NEP 2020) नुसार अनुप्रयोगाधारित प्रश्नांचा समावेश कायम राहील, असे एससीईआरटीने स्पष्ट केले आहे.

परीक्षा प्रक्रियेवर लक्ष ठेवण्यासाठी ‘फ्लाइंग स्क्वॉड’मार्फत अचानक तपासण्या करण्यात येणार असल्याचेही शाळांना कळवण्यात आले आहे. ही परीक्षा गोव्यातील सर्व शाळांसाठी बंधनकारक असून, नियमांचे उल्लंघन झाल्यास गंभीर दखल घेतली जाईल, असा इशाराही एससीईआरटीने दिला आहे.

उल्लेखनीय म्हणजे, गेल्या वर्षी झालेल्या पहिल्या केंद्रीकृत परीक्षेनंतर पालकांकडून तीव्र नाराजी व्यक्त करण्यात आली होती. सात-आठ वर्षांच्या लहान मुलांसाठी प्रश्नपत्रिका अतिशय अवघड असल्याचा आरोप करत पालकांनी ३डी क्षमता व तर्कशक्तीवरील प्रश्नांबाबतही आक्षेप नोंदवले होते. यंदा मात्र त्या पार्श्वभूमीवर प्रश्नपत्रिका अधिक सोप्या ठेवण्याचे आश्वासन एससीईआरटीने दिले आहे.

हेही वाचा