'बर्च' क्लब दुर्घटना : लुथरा बंधू, गुप्ता, रेडकर यांच्या ठिकाणांवर ईडीचे छापे

आज पहाटे पासून छापासत्र सुरू; बेकायदा आर्थिक व्यवहार आणि मनी लाँड्रिंगप्रकरणी ईडीची कारवाई.

Story: वेब डेस्क । गोवन वार्ता |
4 hours ago
'बर्च' क्लब दुर्घटना : लुथरा बंधू, गुप्ता, रेडकर यांच्या ठिकाणांवर ईडीचे छापे

पणजी: हडफडे येथील 'बर्च बाय रोमिओ लेन' क्लबला ६ डिसेंबर रोजी मध्यरात्री लागलेल्या भीषण आगीत २५ निष्पाप लोकांनी जीव गमावला. या घटनेने संपूर्ण गोवा हादरले होते. पोलीस तपासात गेल्या ४७ दिवसांत अनेक धक्कादायक बाबी उघड झाल्या. आता ईडीने यातील बेकायदा आर्थिक व्यवहारांची आणि मनी लाँड्रिंगची पाळेमुळे खोदण्यासाठी कंबर कसली आहे. आज शुक्रवारी पहाटेपासूनच ईडीने गोवा आणि दिल्लीसह एकूण ८ ते ९ ठिकाणी एकाच वेळी छापासत्र सुरू केले असून, लुथरा बंधू, अजय गुप्ता, हडफडेचे तत्कालीन सरपंच रोशन रेडकर, तत्कालीन सचिव रघूवीर बागकर आणि अन्य संबंधितांच्या मालमत्तांची तपासणी केली जात आहे.


The Law Advice - Articles - What is Enforcement Directorate (ED)?


ईडीने या तपासाचा रोख प्रामुख्याने क्लबच्या मालकी हक्कातील संशयास्पद व्यवहार आणि क्लबच्या उभारणीसाठी झालेली पैशांची जुळवाजुळव याकडे वळवला आहे. आगीच्या दुर्घटनेनंतर झालेल्या प्राथमिक तपासात असे समोर आले होते की, क्लबच्या मालकांनी बनावट आरोग्य दाखले (NOC) आणि परवाने मिळवून हा व्यवसाय सुरू ठेवला होता. ज्या खाजन जमिनीवर (मिठागर) हा क्लब उभारला गेला होता, त्या जमिनीचे बेकायदा रूपांतर करण्यामागे मोठे आर्थिक हितसंबंध असल्याचे संशय आहे. याच पार्श्वभूमीवर लुथरा बंधूंच्या दिल्लीतील किंग्सवे कॅम्प आणि गुरुग्राममधील निवासस्थानांवर, तसेच सुरिंदर कुमार खोसला यांच्या मालमत्तांवर ईडीने लक्ष केंद्रित केले आहे.


Goa Gets India's First Island Bar With Nomadic Jungle Theme; Go Be A Nomad  At Birch In Arpora


दुसरीकडे, हडफडेचे तत्कालीन सरपंच रोशन रेडकर यांना अखेर हणजूण पोलिसांनी अटक केली आहे. बर्च क्लबला बेकायदा परवाने आणि ना-हरकत दाखले मिळवून देण्यासाठी रेडकर यांनी सरपंच पदाचा गैरवापर केल्याचा आरोप त्यांच्यावर आहे. यापूर्वीच त्यांना पंचायत खात्याने अपात्र ठरवले होते. अटकेच्या भीतीने रेडकर यांनी गोवास्थित मुंबई उच्च न्यायालयात अटकपूर्व जामीन अर्ज दाखल केला होता. मात्र, न्यायमूर्ती आशिष चव्हाण यांनी रेडकर यांचा अर्ज फेटाळून लावताना अत्यंत कडक निरीक्षणे नोंदवली. 




न्यायालयाने जामीन नाकारल्यामुळे रेडकर यांनी काल म्हापसा न्यायालयात शरणागती पत्करली, त्यानंतर त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले. विशेष म्हणजे, तपासाच्या सुरुवातीला जेव्हा पोलिसांनी त्यांना चौकशीसाठी बोलावले होते, तेव्हा सुमारे शंभर लोकांचा जमाव जमवून त्यांनी तपासात अडथळा आणण्याचा प्रयत्न केल्याचा आरोपही सरकार पक्षाने लावला होता. सध्या ईडीचे पथक तत्कालीन पंचायत सचिव रघूवीर बागकर आणि रेडकर यांच्या संशयास्पद व्यवहारांची सखोल चौकशी करत असून, या छापासत्रातून मोठी आर्थिक गैरव्यवहारांची प्रकरणे बाहेर येण्याची शक्यता आहे.

हेही वाचा