कृती समितीची मागणी : साखळी धरणे आंदोलनाचा दुसरा दिवस

तुये हॉस्पिटल बांबोळी हॉस्पिटलला लिंक करावे या मागणीसाठी आंदोलनात सहभागी असलेले नागरिक. (निवृत्ती शिरोडकर)
पेडणे : तुये येथील नवीन रुग्णालय प्रकल्प गोवा वैद्यकीय महाविद्यालयला लिंक करावा आणि तो तातडीने कार्यान्वित करावा, या मागणीसाठी तुये हॉस्पिटल कृती समितीने पुकारलेले साखळी धरणे आंदोलन दुसऱ्या दिवशीही जोमाने सुरू राहिले. चालू हिवाळी अधिवेशनात आमदार जीत आरोलकर यांनी या प्रश्नी मुख्यमंत्री आणि आरोग्यमंत्र्यांकडून ठोस आश्वासन मिळवावे, अन्यथा आंदोलन अधिक तीव्र करण्याचा इशारा आंदोलकांनी दिला आहे.
आंदोलकांचे म्हणणे आहे की, माजी मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर यांनी १०० कोटींहून अधिक खर्च करून हा प्रकल्प उभारला आहे. बांबोळी रुग्णालयात ज्या प्रकारे तज्ज्ञ डॉक्टर, सर्जन आणि अत्याधुनिक साधनसुविधा आहेत, तशीच सेवा तुयेच्या या नवीन रुग्णालयात मिळायला हवी. केवळ सामुदायिक आरोग्य केंद्र येथे हलवून आमची बोळवण करू नये, असे मत कृती समितीचे सदस्य जुजे लोबो आणि विवेक गावकर यांनी व्यक्त केले.
ज्येष्ठ नागरिक चंद्रकांत जाधव यांनी सांगितले की, पेडणे तालुक्यातील रुग्णांना उपचारासाठी तासनतास प्रवास करून बांबोळीला जावे लागते, ज्यामुळे अनेकदा गंभीर रुग्णांचा वाटेतच जीव जातो. हे रुग्णालय सुरू झाल्यास केवळ वेळेवर उपचार मिळणार नाहीत, तर तालुक्यातील सुशिक्षित बेरोजगारांना नोकरीच्या संधीही उपलब्ध होतील, असा विश्वास रुची सावंत आणि जगन्नाथ पार्सेकर यांनी व्यक्त केला.
प्रशासनाने या मागणीची दखल घेऊन लेखी आश्वासन न दिल्यास हजारो नागरिक रस्त्यावर उतरून तीव्र आंदोलन छेडतील. या धरणे आंदोलनात देवू प्रभुदेसाई, सुहासिनी नाईक, व्यंकटेश नाईक आणि इतर अनेक सामाजिक कार्यकर्त्यांनी पाठिंबा दर्शवला आहे.
लोकप्रतिनिधींच्या अनुपस्थितीवर प्रश्नचिन्ह
आम आदमी पक्षाच्या नेत्या सुवर्णा हरमलकर यांनी या आंदोलनात सहभागी होत स्थानिक लोकप्रतिनिधींवर कडाडून टीका केली. निवडणुकीच्या काळात आम्ही तुमच्या सोबत आहोत असे म्हणणारे सरपंच, पंच आणि जिल्हा पंचायत सदस्य आता या जनसामान्यांच्या आरोग्याच्या लढ्यात कुठे आहेत? असा सवाल त्यांनी उपस्थित केला. तसेच आगामी मशाल मिरवणुकीत हजारो नागरिकांनी सहभागी होऊन पेडणेकरांचा आवाज सरकारपर्यंत पोहोचवावा, असे आवाहनही त्यांनी केले.