ग्राहक तक्रार निवारण आयोगाकडून २०२२ ते २०२४ दरम्यान ८०४ प्रकरणे निकाली

पणजी : राज्य ग्राहक तक्रार निवारण आयोगाने (Goa state consumer commission) २०२२ ते २०२४ दरम्यान ८०४ प्रकरणे निकाली काढली आहेत. याचाच अर्थ आयोगाने वर्षाला २६८, तर महिन्याला सरासरी २२ प्रकरणांचा निकाल लावला आहे. केंद्रीय सार्वजनिक पुरवठा राज्यमंत्री बी. एल. वर्मा (B. L. Varma) यांनी लोकसभेत (Loksabha) दिलेल्या लेखी उत्तरातून ही माहिती मिळाली आहे. याबाबत खासदार जेनीबेन ठाकूर (Jeniben Thakur) यांनी प्रश्न विचारला होता.
उत्तरातील माहितीनुसार, गोव्यात २०२२ मध्ये आयोगाकडे १७७ तक्रारी दाखल झाल्या होत्या. आयोगाने या वर्षात मागील प्रलंबित मिळून १८० प्रकरणे निकाली काढली. २०२३ मध्ये २१४ तक्रारी दाखल झाल्या. आयोगाने त्या वर्षी मागील प्रलंबित धरून ३७९ प्रकरणे निकाली लावली, तर २०२४ मध्ये २५० तक्रारी दाखल झाल्या होत्या. आयोगाने त्या वर्षात मागील प्रलंबित मिळून २४५ प्रकरणे निकाली काढली.
वरील कालावधीत आयोगाच्या राष्ट्रीय हेल्पलाईनकडे गोव्यातून ८,४९५ तक्रारी आल्या होत्या. यामध्ये २०२२ मधील २१००, २०२३ मधील २९८०, तर २०२४ मधील ३४१५ तक्रारींचा समावेश होता. हेल्पलाईनद्वारे या सर्व तक्रारींचे निवारण करण्यात आले. वरील कालावधीत संपूर्ण देशातून हेल्पलाईनकडे आलेल्या ३५ लाखाहून अधिक तक्रारी निकली काढण्यात आल्या आहेत. वरील कालावधीत हेल्पलाईनकडे उत्तर प्रदेश, महाराष्ट्र येथून अधिक तक्रारी आल्या होत्या.
केंद्र सरकारने राष्ट्रीय ग्राहक हेल्पलाईन अधिक सुलभ केली आहे. यानुसार वॉट्सअपद्वारेदेखील तक्रारी दाखल करण्याची सोय उपलब्ध करून देण्यात आली आहे. ऑक्टोबर २०२३ मध्ये एकूण तक्रारींपैकी ११ टक्के या वॉट्सअपद्वारे करण्यात आले होत्या. ऑक्टोबर २०२५ अखेरीस ही संख्या वाढून ३० टक्के झाली असल्याचे उत्तरात म्हटले आहे.
तीन वर्षांत ५.३६ लाख तक्रारींचे निवारण
तीन वर्षांत देशातील विविध राज्यांच्या ग्राहक तक्रार निवारण आयोगांकडे ५.१४ लाख तक्रारी दाखल झाल्या होत्या. मागील प्रलंबित मिळून विविध राज्य आयोगांनी ५.३६ लाख तक्रारी निकाली काढल्याचे उत्तरात म्हटले आहे.