फोंडा : केतन भाटीकरांचा मगोला ‘रामराम’

ढवळीकरांची साथ सोडली : कुर्टी झेडपी मतदारसंघ भाजपला दिल्याने नाराज

Story: प्रतिनिधी। गोवन वार्ता |
16 hours ago
फोंडा : केतन भाटीकरांचा मगोला ‘रामराम’

फोंडा : कुर्टी जिल्हा पंचायत मतदारसंघ भाजपला दिल्याने नाराज झालेल्या डॉ. केतन भाटीकर (Dr. Ketan Bhatikar) यांनी मंत्री सुदिन ढवळीकर (Sudin Dhavalikar) यांची साथ सोडली असून गुरुवारी त्यांनी मगो पक्षाला (MGP) सोडचिठ्ठी दिल्याचे जाहीर केले. जिल्हा पंचायत सदस्य प्रिया चारी व पंच बाबू चारी यांनीही पक्षाला रामराम केला आहे.
कुर्टी जिल्हा पंचायत मतदारसंघ सध्या मगोकडे आहे. मात्र हा मतदारसंघ युतीमुळे भाजपला देण्यात आला. त्यामुळे केतन भाटीकर नाराज बनले होते. ही जागा भाजपला दिल्याच्या दिवसापासूनच त्यांनी स्वतंत्रपणे निवडणुकीत उतरण्याची भाषा केली होती. नंतर ती त्यांनी खरी ठरवली व कुर्टी खांडेपार ग्रामपंचायतीचे ज्येष्ठ पंच भिका केरकर यांना अपक्ष म्हणून मैदानात उतरवले. ही जागा एसटी प्रवर्गासाठी राखीव आहे.
भाटीकर म्हणाले की, मगो जिल्हा पंचायत सदस्य प्रिया चारी यांच्यावर अन्याय झाला आहे. जी जागा मगोकडे होती, ती भाजपला का देण्यात आली, याचे कोडे अजून सुटलेले नाही. त्यातूनच या संदर्भात आम्हाला योग्य असे उत्तर न मिळाल्याने आम्ही अपक्ष म्हणून पुढे जात आहोत. त्यामुळेच पक्षाला सोडचिट्टी दिलेली आहे. सुदिन ढवळीकर यांना मी कालसुद्धा माझा राजकीय गुरू मानत होतो. भविष्यातसुद्धा त्यांनाच माझा राजकीय गुरू मारणार आहे.

काही फरक पडत नाही : ढवळीकर
भाटीकरांच्या राजीनाम्यावर प्रतिक्रिया देताना वीजमंत्री सुदिन ढवळीकर म्हणाले की, भाटीकर यांनी मगो पक्ष सोडला असला, तरी त्याचा फोंड्यातील मगोच्या राजकारणावर काही फरक पडणार नाही. या मतदारसंघात आमच्या कार्यकर्त्यांचे जाळे विस्तारलेले आहे. येथे आमचे चांगलेच वर्चस्व आहे. ते कोणी हिरावून नेऊ शकत नाही.

हेही वाचा