कर्मचारी भीतीच्या छायेखाली : पाचव्या मजल्यावरील स्लॅबचा भाग कोसळला

पणजी : जुन्ता हाऊस (Junta House) इमारतीचा पहिल्या लिफ्टच्या पाचव्या मजल्यावरील जिन्यावरचा स्लॅबचा (slab) काही भाग मंगळवारी कोसळला. त्यामुळे जुन्ता हाऊसमध्ये असलेल्या सरकारी कर्मचाऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. सामान्य प्रशासन विभागाकडून (जीएडी) कार्यालयांचे स्थलांतर करण्याची हालचाल होत नसल्याने जीव धोक्यात घालून या इमारतीत काम करावे लागते, असे येथे असलेल्या कर्मचाऱ्यांनी सांगितले.
इमारतीचा एखादा भाग कोसळून जीवितहानी होणार तेव्हाच सरकारला जाग येणार आहे का, असा सवाल या कर्मचाऱ्यांनी केला आहे. हडफडे येथे क्लबला आग लागल्यानंतर सरकारला राज्यात बेकायदा चालणारे क्लब बंद करण्याचे सुचले, तसेच या ठिकाणी जीवितहानी झाल्यानंतरच या इमारतीतील कार्यालये दुसऱ्या ठिकाणी स्थलांतरित केली जाणार आहेत का, असा प्रश्न कर्मचाऱ्यांनी उपस्थित केला.
जुन्ता हाऊसमधील काही कार्यालये जुन्या अबकारी कार्यालयाच्या इमारतीत स्थलांतरित करण्यात येणार होती. पण या इमारतीचे दुरुस्तीचे काम करण्यात येणार असल्याने त्यासाठी सहा महिन्यांचा अवधी लागू शकतो. यासाठी जुंता हाऊसमधील सर्व सरकारी कार्यालये त्वरित खासगी किंवा सरकारी इमारतीत स्थलांतरित करण्यात यावीत, असा आदेश २० दिवसांपूर्वी मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी ‘जीएडी’च्या अधिकाऱ्यांबरोबर घेतलेल्या खास बैठक दिला होता. मात्र ‘जीएडी’कडून कसलीच हालचाल होत नसल्याने कर्मचाऱ्यांनी नाराजी व्यक्त केली आहे.
जुन्ता हाऊसमध्ये कार्यरत असलेली कार्यालये
- सध्या जुंता हाऊसमध्ये पीडब्ल्यूडी, वाहतूक संचालनालय, नागरी पुरवठा आणि ग्राहक व्यवहार विभाग, राज्य ग्राहक तक्रार निवारण आयोग, राजभाषा संचालनालय अशी मोठी जागा वापरत असलेली कार्यालये आहेत.
- यात स्वामी विवेकानंद सोसायटी, सार्वजनिक हौशी वेधशाळा विभाग अशी कार्यालये आहेत.
- पीडब्ल्यूडी डीव्हीजन १ आल्तिनो येथे, तर वाहतूक संचालनालय पर्वरी येथील गोवा हाऊसिंग बोर्ड इमारतीत स्थलांतरित करण्यात येणार आहे.
- काही कार्यालये सरकारी क्वार्टर्समध्ये स्थलांतरित करण्याचाही विचार आहे. मात्र ‘जीएडी’कडून कसलीच हालचाल होत नसल्याने काही सरकारी कार्यालये जुन्ता हाऊसमध्ये अडकून पडली आहेत.