अद्याप ९७ रुग्ण प्रतीक्षा यादीत

पणजी : राष्ट्रीय नोंदणी पोर्टलनुसार राज्यात (Goa) मागील पाच वर्षांत अवयव प्रत्यारोपणासाठीच्या (organ transplant) प्रतीक्षा यादीतील १० रुग्णांचा मृत्यू झाला आहे. कमी मृत्यूंची नोंद असण्याच्या यादीत गोवा देशात ७ व्या स्थानी होता. ८ डिसेंबर २०२५ अखेरीस राज्यातील ९७ रुग्ण प्रतीक्षा यादीत आहेत. केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री प्रतापराव जाधव (Prataprav Jadhav) यांनी राज्यसभेत दिलेल्या लेखी उत्तरातून ही माहिती मिळाली आहे. याबाबत खासदार स्वाती महिवाल यांनी अतारांकित प्रश्न उपस्थित केला होता.
२०२० ते २०२४ दरम्यान अवयव प्रत्यारोपणासाठी प्रतीक्षा यादीत असणाऱ्या २,८०५ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. वरील कालावधीत महाराष्ट्रात सर्वाधिक २९७ रुग्णांचा मृत्यू झाला होता, तर तमिळनाडू (२३३), हरियाणा(२१५), मध्य प्रदेश (१६९) या राज्यात हे प्रमाण अधिक होते. आंध्र प्रदेशात केवळ एका रुग्णाचा मृत्यू झाला होता. कर्नाटक (८), छत्तीसगढ (६), बिहार आणि पंजाब प्रत्येकी ५, जम्मू आणि काश्मीर (४) येथे मृत्यूचे प्रमाण तुलनेने कमी होते.
गोव्यातील प्रतीक्षा यादीतील सर्व ९७ रुग्ण हे किडनी प्रत्यारोपणासाठी प्रतीक्षा यादीत आहेत. ८ डिसेंबर अखेरीस देशभरातील ८२ हजार २८५ रुग्ण प्रतीक्षा यादीत होते. यातील २० हजार ५५३ रुग्ण महाराष्ट्रातील होते. अवयवानुसार सर्वाधिक ६० हजार ५९० रुग्ण किडनी प्रत्यारोपणासाठी प्रतीक्षा यादीत होते. यकृत प्रत्यारोपणासाठी १८ हजार ७२४, हृदयासाठी १,६९५, फुफ्फुसांसाठी ९७०, तर पॅनक्रियासाठी ३०६ रुग्ण प्रतीक्षा यादीत असल्याचे उत्तरात नमूद केले आहे.
राज्यात ४९ अवयव प्रत्यारोपण
राष्ट्रीय नोंदणी पोर्टलनुसार, राज्यात ५ वर्षांत ३१ किडनी, तर १८ कॉर्नियल असे एकूण ४९ अवयव प्रत्यारोपण करण्यात आले आहेत. संपूर्ण देशात पाच वर्षांत ७२ हजार ९९३ अवयव प्रत्यारोपण झाले आहेत. यामधील सर्वाधिक ५३ हजार १९८ किडनी प्रत्यारोपण होते. यानंतर १७ हजार ९३९ लिव्हर प्रत्यारोपण असल्याचे उत्तरात नमूद केले आहे.
‘सोटो’ला ५९ लाखांचा निधी
केंद्र सरकारतर्फे राज्य सरकारांना अवयव दानाबद्दल जागृती करणे व अन्य कामांसाठी निधी दिला जातो. गोव्यातील अवयव व पेशी प्रत्यारोपण संस्थेला (सोटो) २०२१- २२ ते २०२५- २६ दरम्यान ५९.७० लाख रुपयांचा निधी देण्यात आला आहे.