ज्ञानेश्वर शिवजींनी दाखल केली अपक्ष उमेदवारी

पेडणे : धारगळ जिल्हा पंचायत मतदारसंघातून काँग्रेसचे इच्छुक उमेदवार म्हणून ज्ञानेश्वर शिवजी यांच्या नावाची चर्चा होती. त्यांनी काँग्रेसतर्फे प्रचारालाही सुरुवात केली होती. मात्र सोमवारी काँग्रेसने ज्ञानेश्वर शिवजी यांना उमेदवारी नाकारली. हा मतदारसंघ गोवा फॉरवर्डला देण्यात आला, असे देवेंद्र प्रभुदेसाई यांनी सांगितले. दरम्यान, देवेंद्र प्रभुदेसाई यांच्यासह अनेक काँग्रेस कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत ज्ञानेश्वर शिवजी यांनी अपक्ष उमेदवार म्हणून उमेदवारी अर्ज दाखल केला.
देवेंद्र प्रभुदेसाई म्हणाले, मागच्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेसच्या स्थानिक कार्यकर्त्यांना विश्वासात न घेता याच मतदारसंघातून गोवा फॉरवर्डला उमेदवारी देण्याचा घाट काँग्रेसने घातला होता. त्यावेळी गोवा फॉरवर्डला केवळ १,६०० मते मिळाली होती. काँग्रेसने ज्ञानेश्वर शिवजी यांना उमेदवारी देण्याची ग्वाही दिली होती. त्यानुसार त्यांनी एक महिन्यापासून आपला प्रचार धारगळ मतदारसंघातून केला होता. मात्र ऐनवेळी काँग्रेसने उमेदवारी नाकारल्याने अनेक समर्थकांनी शिवजी यांना पाठिंबा देत अपक्ष म्हणून उमेदवारी दाखल केली.
यावेळी काँग्रेसचे ज्येष्ठ कार्यकर्ते तथा माजी सरपंच प्रदीप देसाई, पंच सदस्य सुनिता देसाई आणि इतर कार्यकर्ते उपस्थित होते.
उमेदवार निवडून आल्यानंतरच निर्णय!
देवेंद्र प्रभुदेसाई यांनी पुढे सांगितले की, मी सध्या काँग्रेस पक्षातच आहे. अपक्ष उमेदवाराला विजयी करण्याचे आमचे ध्येय आहे. शिवजी यांना विजयी केल्यानंतर आम्ही पुढील निर्णय घेणार आहोत. लोकशक्तीच्या बळावर ही निवडणूक आम्ही लढवत आहोत आणि आम्हाला विजयाची खात्री आहे.