आग दुर्घटना; गौरव, सौरभ लुथरा विरोधात रेड कॉर्नर नोटीस

अजय गुप्ता, सुरींदर कुमार खोसला विरोधात लूक आऊट नोटीस

Story: प्रतिनिधी।गोवन वार्ता |
09th December, 05:34 pm
आग दुर्घटना; गौरव, सौरभ लुथरा विरोधात रेड कॉर्नर नोटीस

पणजी : गोव्यातील (Goa) हडफडे येथील बर्च बाय रोमिओ लेनचे मालक थायलंडला (Thailand) पसार झाल्याने पोलिसांनी त्यांच्या विरोधात ‘रेड कॉर्नर’ नोटीस (Red Corner Notice) जारी केली आहे. तसेच अजय गुप्ता व सुरींदर कुमार खोसला हे सापडत नसल्याने; त्यांच्याविरूद्ध ‘लूक आऊट’ नोटीस (Look out notice) जारी केली आहे. पोलीस उपमहानिरीक्षक वर्षा शर्मा यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली.

हडफडे येथील बर्च बाय रोमिओ लेन क्लब दुर्घटनेप्रकरणी पोलिसांनी आतापर्यंत ५ जणांना अटक केली आहे. गौरव व सौरभ लुथरा हे थायलंडमध्ये पळाल्याने इंटरपोलच्या मदतीने त्यांच्या अटकेचे प्रयत्न सुरू आहेत. अजय गुप्ता व सुरींदर कुमार खोसला हे सुद्धा दिल्लीत सापडले नसल्याने पोलिसांनी दोघांविरूद्ध लूक आऊट नोटीस जारी केली आहे.

पोलीस उपमहानिरीक्षक वर्षा शर्मा यांनी पत्रकार परिषद घेऊन ही माहिती दिली. शनिवारी रात्री क्लबला आग लागून २५ जणांचा मृत्यू झाला होता. हणजूण पोलिसांनी गुन्हा नोंद करून तपास सुरू केला आहे.

दोन निलंबित अधिकारी चौकशीसाठी उपस्थित

या दुर्घटनेप्रकरणी सरकारने निलंबित केलेल्या तत्कालीन पंचायत संचालक सिद्धी हळर्णकर व प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या तत्कालीन सदस्य सचिव शमिला मोंतेरो यांनी चौकशीसाठी हणजूण पोलीस स्थानकात आज हजेरी लावली. हडफडे - नागवाचे तत्कालीन पंचायत सचिव रघुवीर बागकर हे मात्र उपस्थित राहिले नाहीत.

पर्यटन व्यवसायाशी निगडीत हॉटेल्स, क्लब्स व इतर आस्थापनांच्या आगप्रतिबंधक व इतर सुरक्षा उपायांच्या तपासासाठी सरकारने वरिष्ठ नागरी सेवा अधिकाऱ्याच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन केली आहे. समितीचे सदस्य असे :

अध्यक्ष : वरिष्ठ श्रेणी नागरी सेवा अधिकारी 

सदस्य : पोलीस निरीक्षक, स्टेशन फायर ऑफीसर, कार्यकारी अभियंता (पीड्ब्लूडी), कार्यकारी अभियंता (वीज खाते)

ही समिती पर्यटन व्यवसायाशी निगडीत असलेल्या आस्थापनांची तपासणी करेल. तपासणीसाठी तालुका पातळीवरही समित्या स्थापन झाल्या आहेत.

हेही वाचा