गोवा : ओंकार हत्तीचा बंदोबस्त करा, अन्यथा आंदोलन करावे लागेल!

उगवे भागातील शेतकऱ्यांचा इशारा : केळी, पोफळींसह केले वाहनांचेही नुकसान

Story: प्रतिनिधी। गोवन वार्ता |
just now
गोवा : ओंकार हत्तीचा बंदोबस्त करा, अन्यथा आंदोलन करावे लागेल!

मोपा-उगवे भागातील केळीची नासधूस करताना ओंकार हत्ती. (निवृत्ती शिरोडकर)

पेडणे : मोपा-उगवे (Mopa-Ugve) परिसरात ओंकार हत्तीने (Omkar the elephant) तिसऱ्या दिवशीही बागायतीचे आणि वाहनांचे मोठे नुकसान केल्यामुळे स्थानिक शेतकऱ्यांमध्ये संतापाचे वातावरण आहे. या ‘ओंकार हत्तीचा खेळ कधी संपणार?’ आणि ‘वाईट कृत्य दुर्घटनेची वाट तर पाहत नाही ना?’ असा संतप्त सवाल करत मोपा-उगवेचे सरपंच सुबोध महाले यांनी सरकारला त्वरित बंदोबस्त करण्याची मागणी केली आहे. मागणी पूर्ण न झाल्यास जनतेसोबत रस्त्यावर उतरण्याचा इशारा त्यांनी दिला आहे.
ओंकार हत्तीने उगवे परिसरात सरपंच सुबोध महाले, माजी सरपंच शशिकांत महाले, पंच दयानंद गवंडी आणि शांताराम राणे यांच्या बागायतींमधील कवाथे केळी, पोफळी यांचे मोठे नुकसान केले. बागायती नुकसानीसह हत्तीने दोन चारचाकी वाहनांचीही मोठ्या प्रमाणात नासधूस केली आहे. माजी सरपंच शशिकांत महाले यांनी सांगितले की, पाच वर्षांची कवाथे हत्तीने नष्ट केली. सरकारकडून नुकसानभरपाई घेऊन उपयोग नाही, कारण नवीन कवाथे तयार होण्यासाठी पुन्हा पाच वर्षे लागतील.
कुठेतरी हत्ती मरणार, कुठेतरी मनुष्य मरणार, याची वाट आता सरकारने पाहू नये. आम्ही सत्तेत असलो तरी लोकांसोबत राहू आणि निर्णय होईपर्यंत गप्प बसणार नाही, असा इशारा सरपंच महाले यांनी वनमंत्री आणि मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांना दिला आहे. दरम्यान, स्थानिक पंच दया गवंडी यांनी पेडणे उपजिल्हाधिकाऱ्यांनी त्वरित उपाययोजना करावी, अशी मागणी केली आहे.
वन खात्याला अडचणी
वन खात्याचे कर्मचारी हत्तीचा मागोवा घेत आहेत, मात्र सकाळच्या वेळी तो पाण्याजवळ किंवा दाट झाडीत तीन-चार तास एकाच जागी थांबत असल्याने त्याचा शोध घेणे कठीण झाले आहे. पावसाळ्याप्रमाणे आता पायांचे ठसे ओळखणेही सहज शक्य होत नाही.
मनुष्यहानी होण्यापूर्वी उपाययोजना करा!
सरपंच सुबोध महाले यांनी या घटनेबाबत चिंता व्यक्त केली. ओंकार हत्तीमुळे सध्या मनुष्यहानी झाली नसली तरी भविष्यात मनुष्यहानी झाल्यास त्याला जबाबदार कोण? असा सवाल त्यांनी केला. बेकायदेशीर वाळू उत्खननावेळी नागरिकांना कायदा हातात घ्यावा लागला होता. त्याची पुनरावृत्ती ओंकार हत्तीच्या बाबतीत होऊ नये. त्यापूर्वीच वन खात्याने हत्तीचा बंदोबस्त करावा, अशी जोरदार मागणी महाले यांनी केली.

हेही वाचा