भाजपचे उमेदवार उद्या जाहीर करणार

पणजी : जिल्हा पंचायत निवडणुकीसाठी (Zilla Panchayat Election) भाजप मगो युती (BJP-MGP alliance) होऊन मगो पक्षाला ३ जागा मिळणार. भाजपच्या इतर मतदारसंघातल्या उमेदवारांची यादी उद्या जाहीर करण्यात येणार. काही जागांवर अपक्ष उमेदवारांना पाठिंबा दिला जाणार असल्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी सांगितले.
भारती जनता पक्षाच्या नेत्यांची पणजीत बैठक झाली. त्या बैठकीनंतर मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत (Chief Minister Dr. Pramod Sawant) यांनी माहिती दिली. भारतीय जनता पक्षाने १९ मतदारसंघांतील उमेदवार जाहीर केले आहेत.
या मतदारसंघांतील उमेदवारांसोबत भाजप नेत्यांची बैठक झाली. निवडणुकीचा प्रचार, रणनिती तसेच पुढील वाटचाल या विषयी उमेदवारांना मार्गदर्शन केले. मार्गदर्शन करण्यासाठी आजची बैठक होती. उद्या मंगळवारी पक्षाची बैठक होणार. या बैठकीत इतर उमेदवारांविषयी चर्चा होऊन उमेदवारांची घोषणा करण्यात येणार असल्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी सांगितले.
मडकई २ व मांद्रेची जागा मगोला : दामू
जिल्हा पंचायत निवडणुकीसाठी मगो पक्षाकडे आमची युती निश्चितपणे होणार आहे. मडकईच्या २ व मांद्रेची जागा मगो पक्षाला देण्याचा निर्णय झाला आहे. इतर ४७ जाग्यांपैकी काही ठिकाणी पक्ष उमेदवार ठेवणार तर काही ठिकाणी अपक्षांना पाठिंबा देणार. उद्या मंगळवारी इतर मतदारसंघांतील उमेदवार निश्चित करण्यासाठी बैठक होणार आहे.
बुधवारपर्यंत सर्व मतदारसंघांतील उमेदवार निश्चित होणार आहेत. भारतीय जनता पक्षाचे कार्य वर्षभर सुरू असते. केंद्र तसेच राज्य सरकारच्या योजना लोकापर्यंत पोचतात. त्याची उमेदवारांना प्रचारात मदत होणार आहे, असे अध्यक्ष दामू नाईक यांनी सांगितले. कॉंग्रेस पक्षाने सरकारात असताना जी वाईट कर्मे केली. त्याचा परिणाम आता पक्षाला भोगावा लागत आहे. दोन्ही जिल्हा पंचायत निवडणुकीत भाजप पक्षाचा विजय निश्चित असल्याचा विश्वास दामू नाईक यांनी व्यक्त केला.